न्यायमूर्तींची रेल्वेत गैरसोय : अलाहाबाद उच्च न्यायालयाकडून रेल्वे विभागाला नोटीस !

वारंवार मागूनही खाण्या-पिण्याचे पदार्थ दिले नाहीत !

अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्तीं गौतम चौधरी

प्रयागराज (उत्तरप्रदेश) – अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्तीं गौतम चौधरी हे रेल्वेने प्रवास करत असतांना रेल्वे प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे त्यांची गैरसोय झाली. त्यामुळे यास उत्तरदायी असलेल्या अधिकार्‍यांकडून उच्च न्यायालयाच्या निबंधकांनी स्पष्टीकरण मागितले आहे. न्यायमूर्तींनी ८ जुलै २०२३ या दिवशी पुरुषोत्तम एक्सप्रेसमधून नवी देहली ते प्रयागराज असा प्रवास केला होता.

उच्च न्यायालयाच्या निबंधकांनी लिहिलेल्या पत्रानुसार त्या दिवशी रेल्वेगाडीला ३ घंटे विलंब झाला होता. न्यायाधिशांनी वारंवार विचारल्यानंतरही एकाही रेल्वे कर्मचार्‍याने समाधानकारक उत्तर दिले नाही. रेल्वेच्या डब्यात एकही पोलीस कर्मचारी उपस्थित नव्हता, तसेच रेल्वेतील ‘पॅन्ट्री कार’च्या (खानावळीच्या) लोकांना अनेकदा संपर्क करूनही न्यायमूर्ती गौतम चौधरी यांना खाण्या-पिण्याचे पदार्थ देण्यासाठी कुणीही फिरकले नाही, असे आरोप या नोटीशीत करण्यात आले आहेत.

उच्च न्यायालयाच्या निबंधकांनी रेल्वेच्या उच्च अधिकार्‍यांना रेल्वे विभागाचे पोलीस आणि ‘पॅन्ट्री कार’चे कर्मचारी यांनी दिलेल्या उत्तराची प्रत न्यायालयात सादर करण्याचेही निर्देश दिले आहेत.

संपादकीय भूमिका

न्यायमूर्तींसारख्या उच्चपदस्थ व्यक्तीची इतकी गैरसोय होत असेल, तर सर्वसामान्य लोकांवर काय परिस्थिती ओढवत असेल ?, याचा विचारच न केलेला बरा !