महाराष्ट्र लंपी रोगावरील लस देशाला पुरवणार ! – राधाकृष्ण विखे पाटील, पशूसंवर्धन मंत्री

उजवीकडे राधाकृष्ण विखे पाटील

मुंबई, १९ जुलै (वार्ता.) – लंपी रोगावरील लस सिद्ध करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने केंद्रशासनासमवेत सामंजस्य करार केला आहे. ही लस सिद्ध करण्यासाठी पुणे येथे एका प्रयोगशाळेची निर्मिती करण्यात आली आहे. या प्रयोगशाळेत लसीची निर्मिती करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य लंपी रोगावरील लसीचा पुरवठा देशाला करेल, अशी माहिती पशूसंवर्धनमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेत दिली.

१९ जुलै या दिवशी काँग्रेसचे आमदार अमित देशमुख यांनी लातूर येथे लंपी रोगामुळे जनावरांचा मृत्यू झाल्याचा प्रश्न सभागृहात उपस्थित करून शेतकर्‍यांना आर्थिक साहाय्य करण्याचे आवाहन केले. यावर विखे पाटील यांनी विधीमंडळाचे अधिवेशन संपण्यापूर्वी उर्वरित शेतकर्‍यांना आर्थिक साहाय्य करण्याचे आश्वासन दिले. लंपी रोगामुळे राज्यात एकूण ३९ सहस्र ६५४ पशूधनाचा मृत्यू झाला असून ३७ सहस्र ५२८ शेतकर्‍यांना आर्थिक साहाय्य करण्यात आले आहे. लंपी रोगावरील दुसर्‍या टप्प्यातील लसीकरण चालू करण्यात आले असल्याचे या वेळी विखे पाटील यांनी सांगितले.