श्रावण मासातील व्रते अधिक मासात न करता निज मासात करावीत !
सध्या चालू असलेल्या ‘अधिक मासा’च्या निमित्ताने….
‘यावर्षी अधिक श्रावण मास आहे. अधिक श्रावण मास १८.७.२०२३ ते १६.८.२०२३ या कालावधीत असून त्यानंतर निज (शुद्ध) श्रावण मास १७.८.२०२३ ते १५.९.२०२३ या कालावधीत आहे. श्रावण मासातील ‘श्रावणी सोमवार’, ‘मंगळागौरी पूजन’, ‘जिवंतिका पूजन’ आदी व्रते अधिक श्रावण मासात न करता निज (शुद्ध) श्रावण मासात करावीत.
वाढदिवस अधिक मासात साजरा न करता निज मासात साजरा करावा !
धर्मशास्त्राने अधिक मासात मंगलकार्ये वर्ज्य सांगितली आहेत. यावर्षी अधिक श्रावण मास आहे. ज्या व्यक्तींचा जन्म श्रावण मासातील आहे, त्यांचा वाढदिवस ‘अधिक श्रावण’ मासात साजरा न करता ‘निज (शुद्ध) श्रावण’ मासात साजरा करावा. निज (शुद्ध) श्रावण मास १७.८.२०२३ ते १५.९.२०२३ या कालावधीत आहे.
– श्री. राज कर्वे (ज्योतिष विशारद), महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (१७.७.२०२३)