‘बाईपणा’चे श्रेष्ठत्व दाखवून द्या !
सध्या सर्वत्र ‘बाईपण भारी देवा’ हा मराठी चित्रपट पहाण्यासाठी चित्रपटगृहांमध्ये महिलांची गर्दी पहायला मिळत आहे. प्रत्येक महिलेच्या तोंडी याच चित्रपटाचे नाव आहे. एका चित्रपटाच्या निमित्ताने का होईना; पण सर्वत्रच्या महिलांचे संघटन पहायला मिळत आहे. सामाजिक संकेतस्थळे, प्रसारमाध्यमे अशा सर्वच ठिकाणी महिलांच्या या संघटनाचे कौतुक केले जात आहे. ‘बाईपण…’ हा चित्रपट ३० जून या दिवशी प्रदर्शित होऊन १९ दिवस उलटूनही महिलांचा उत्साह टिकून आहे. मनोरंजनाच्या स्तरावर हे ठीक आहे; पण समाज, राष्ट्र आणि धर्म यांच्या दृष्टीने महिला इतक्या मोठ्या प्रमाणात संघटित झाल्याचे आपण कुठे पाहिले आहे का ? याचे उत्तर दुर्दैवाने ‘नाही’, हेच असेल. एखाद्या महिलेवर अन्याय किंवा अत्याचार झाल्यास महिला एकत्रित येऊन आवाज उठवतात, आंदोलने करतात, मेणबत्ती मोर्चे काढतात; पण ही खदखद केवळ १ ते २ दिवसच टिकते. त्यानंतर मग कुणावर कुठला अत्याचार झाला ? याविषयी तिला देणे-घेणे नसते. ‘महिलेवर अत्याचार होऊ नये’, हा विचार मनातच रहातो. जर हे असेच चालू राहिले, तर महिलांवरील अत्याचारांना पूर्णविराम कधी मिळणार ?
महिलांनी झाशीची राणी लक्ष्मीबाई, राणी पद्मावती यांचा आदर्श घेऊन अंगी लढाऊवृत्ती जागृत करायला हवी. प्रत्येक महिला जर स्वसंरक्षण घेऊन प्रशिक्षित झाली, तर ती वासनांधांचा आणि अत्याचार्यांचा सोक्षमोक्ष लावेल ! अर्थात् यासाठी अपेक्षित आहे, ते महिलांचे संघटन ! हेच राष्ट्रोत्थान घडवून आणेल. सध्याची महिलांची दुःस्थिती पहाता आपल्या हातांची वज्रमूठ आवळली जाणे आवश्यक आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून संघटित झालेल्या प्रत्येक महिलेने यावर गांभीर्याने विचार करावा. मनोरंजनाला विरोध नाही; परंतु महिला म्हणून स्वतःचे समाजकर्तव्य विसरून चालणार नाही. प्रतिवर्षी शेकडोंच्या संख्येने महिला किंवा मुली हरवतात, त्याविरोधात कोण आवाज उठवणार ? वासनांधांना धडा कोण शिकवणार ? ‘लव्ह जिहाद’च्या षड्यंत्रात अडकणार्या मुलींना कोण सोडवणार ? पाश्चात्त्यांच्या अंधानुकरणामुळे स्वतःचे आयुष्य उद़्ध्वस्त करणार्या तरुणींना कोण वाचवणार ? राजकीय पक्ष, पोलीस, प्रशासन यासाठी कुणी काहीही करणार नाहीत, हे लक्षात घेऊन प्रत्येक महिलेने व्रजमूठ आवळून संघटित व्हावे आणि ‘बाईपणा’चे (स्त्रीत्वाचे) श्रेष्ठत्व दाखवून द्यावे !
– सौ. नम्रता दिवेकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल.