पुणे महापालिकेची आरोग्‍य सेवा ठरत आहे कुचकामी !

प्रतिवर्षी ५०० कोटी खर्चूनही आरोग्‍यसेवा दुर्लक्षित !

प्रतीकात्मक छायाचित्र

पुणे – नागरिकांना सक्षम आरोग्‍य सेवा देणे, हे प्राथमिक कार्य असले, तरी महापालिकेच्‍या रुग्‍णालयांची स्‍थिती आणि सुविधा कुचकामी ठरत आहेत. शहरात महापालिकेच्‍या २२ रुग्‍णालयांमध्‍ये रुग्‍णांना उपचारांसाठी भरती करून घेण्‍याची सुविधा आहे. येथील बेडची क्षमता अनुमाने १ सहस्र ३७६ असली, तरी त्‍यातील केवळ ५७७ खाटा कार्यान्‍वित आहेत. पुणेकरांना चांगल्‍या दर्जाची वैद्यकीय सेवा देण्‍यासाठी पालिका प्रतिवर्षी ५०० कोटी रुपयांहून अधिक व्‍यय करत असली, तरी सर्वसामान्‍यांपासून ही आरोग्‍यसेवा दुरावल्‍याचे  चित्र आहे.

सर्वसामान्‍य रुग्‍णांसाठी सध्‍या प्रसूती, हाडांचे उपचार, डोळ्‍यांचे उपचार, डायलिसिस, हृदयरोगाचे उपचार सवलतीच्‍या दरात उपलब्‍ध करून दिले जातात. त्‍या व्‍यतिरिक्‍त इतर गंभीर आजार आणि शस्‍त्रक्रियांसाठी नागरिकांना खासगी रुग्‍णालयांचा आधार घ्‍यावा लागतो. प्रत्‍यक्षात महापालिकेचा आरोग्‍य सेवेवरील व्‍यय पहाता, सर्व प्रकारच्‍या आजारांसाठी पालिका वैद्यकीय सेवा पुरवू शकते; मात्र शहरी गरीब योजनेच्‍या नावाखाली महापालिकेने हे दायित्‍व झटकले आहे.

संपादकीय भूमिका

आरोग्‍य सेवा ही जनतेच्‍या जिवाशी संबंधित आहे. असे असतांना आरोग्‍य सेवाच कुचकामी ठरते, यावरून प्रशासनाचा कारभार कसा आहे, हे लक्षात येते. या विभागाशी संबंधित असणार्‍यांना कठोर शिक्षा व्‍हायला हवी !