महाराष्ट्र विधान परिषदेचा शतकोत्तर महोत्सव विविध कार्यक्रमांनी साजरा होणार !
उपसभापती डॉ. नीलम गोर्हे आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतली बैठक
मुंबई, १८ जुलै (प्रतिनिधी) – ‘महाराष्ट्र विधान परिषदेचा शतकोत्तर महोत्सव’ संस्मरणीय ठरेल, यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे, अशी सूचना विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्हे आणि संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी येथे केली.
१८ जुलै या दिवशी विधानभवनातील कक्ष क्रमांक १४५ मध्ये ‘विधान परिषदेचा शतकोत्तर महोत्सव’ विविध उपक्रमांनी साजरा करण्याविषयी चर्चा करण्यासाठी डॉ. नीलम गोर्हे यांनी विधान परिषदेतील गटनेते आणि सदस्य यांची बैठक बोलावली होती.
‘या वेळी परिसंवाद, प्रदर्शने, संदर्भसमृद्ध प्रकाशने अशा कार्यक्रमांच्या आयोजनासह उपस्थितांनी मांडलेल्या सूचना स्वीकारण्यात येऊन विषयांनुसार समिती नेमून पुढील कार्यवाही करण्यात येईल’, असे उपसभापती डॉ. नीलम गोर्हे आणि संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी निश्चित केले.
या बैठकीस विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच्यासह अन्य सदस्य, तसेच महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव विलास आठवले, उपसचिव राजेश तारवी, जनसंपर्क अधिकारी श्री. नीलेश मदाने यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.