केवळ स्वयंपाकघर नव्हे, हे तर एक औषधालयच !
आपण जे अन्नग्रहण करतो त्या अन्नामध्ये जे जे घटक मिसळलेले असतात, त्यात कोणता ना कोणता औषधी उपयोग नक्कीच असतो; म्हणूनच आपली भारतीय पाककला ही आरोग्याच्या दृष्टीने सर्वश्रेष्ठ आहे. आता हे घटक कोणते आणि त्यांचा औषधी उपयोग कसा करायचा ? हे आपण आजच्या लेखांमध्ये समजून घेणार आहोत. या माहितीचा उपयोग किरकोळ आरोग्याच्या तक्रारीवर घरच्या घरी सोपे इलाज करण्यासाठी आपण करू शकतो. किरकोळ आरोग्याच्या तक्रारींवर असे घरगुती उपचार करण्यास काहीच हरकत नसते; परंतु सर्वांनी एक महत्त्वाचे सूत्र येथे लक्षात घ्यायला हवे की, एखाद्या व्यक्तीला गंभीर आजार असल्यास त्याने पूर्णपणे याच घरगुती उपचारांवर अवलंबून रहाणे चुकीचे आहे. हे उपचार प्राथमिक स्वरूपाचे आहेत. तेव्हा तारतम्याने या माहितीचा उपयोग आपण विकार निर्मूलनासाठी करावा.
१२ जुलै २०२३ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण मोहरी, जिरे, हिंग आणि हळद यांचे औषधी उपयोग वाचले. आजच्या लेखात धने, ओवा, लवंग, वेलची यांचे औषधी उपयोग येथे देत आहे.
भाग १ वाचण्यासाठी येथे क्लिक करा. https://sanatanprabhat.org/marathi/700645.html |
एक-दोन दिवसांत घरगुती उपचारांचा परिणाम आपल्याला न दिसल्यास केवळ त्यांवर अवलंबून न रहाता वैद्यांचा योग्य समादेश (सल्ला) घेणे आवश्यक आहे. |
(भाग २)
५. धने
अ. मसाल्याच्या पदार्थांमध्ये धन्याचा समावेश होतो. आपला जठराग्नी वाढवण्यात धने उत्तम कामगिरी बजावतात. धने पित्त वाढवत नाहीत. त्यामुळे पित्त प्रकृतीच्या व्यक्तींनी धन्याचा वापर सढळ हस्ताने करण्यास हरकत नाही.
आ. तोंड आले असल्यास कोथिंबिरीच्या रसाने गुळण्या कराव्यात.
इ. घोळणा फुटल्यास (नाकातून रक्त येत असल्यास) कोथिंबिरीच्या रसाचे ३-४ थेंब नाकात घालावेत.
ई. उलट्या होत असल्यास अर्धा चमचा धने पावडर आणि चमचाभर खडीसाखर खावी.
उ. डोळे आल्यावर डोळ्यांची आग होत असते आणि डोळ्यांमध्ये सारखे खुपत असल्याची जाणीव होत असते. अशा वेळी औषधोपचारांसह धने पावडरची पुरचुंडी बांधून ती पाण्यात भिजवून थोड्या थोड्या वेळाने डोळ्यांवर फिरवावी.
ऊ. वारंवार पित्ताने घशाशी जळजळणे, अंगाचा दाह होणे, डोळ्यांची आग होणे, असे त्रास होत असल्यास रात्री एक पेला पाण्यात अर्धा चमचा धने पावडर आणि अर्धा चमचा जिरे पावडर रात्री भिजत घालावी. हे पाणी सकाळी गाळून अनशापोटी प्यावे.
ए. खोकल्याची ढास लागत असल्यास धने आणि खडीसाखर चावून चघळावे.
ऐ. लघवी करतांना जळजळणे, लघवी साफ न होणे यांवर उपचार म्हणून अर्धा चमचा धने पावडर पेलाभर पाण्यात रात्रभर भिजत घालावी. हे पाणी सकाळी अनशापोटी गाळून प्यावे.
६. ओवा
ओवा हा उष्ण गुणधर्माचा असल्यामुळे जठराग्नी वाढवण्यात उत्तम कार्य करतो.
अ. पोटात ‘गॅसेस’ने (वायूमुळे) दुखत असल्यास, अपचन झाल्यास पाव चमचा ओवा खाऊन त्यावर गरम पाणी प्यावे. पोटावर ओव्याच्या पुरचुंडीने शेकू शकतो.
आ. पोटात जंत होत असतील, तर ओवा विड्याच्या पानातून खायला द्यावा.
इ. उलट्या होत असतील, तर ओवा आणि लवंग यांचे चूर्ण चिमूटभर घेऊन मधातून चाटावे.
ई. भूक लागत नसल्यास पाव चमचा ओवा आणि चिमूटभर सैंधव कोमट पाण्याबरोबर घ्यावे.
७. लवंग
अ. लवंगची चव ही तिखट आणि कडू असली, तरी ती थंड आहे.
आ. मुखदुर्गंधी असल्यास लवंग चघळावी.
इ. दात पुष्कळ दुखत असल्यास लवंग तेल कापसावर घेऊन ते दातावर दाबून धरावे. यामुळे दातात येणारी कळ न्यून होते.
ई. वारंवार खोकला येत असेल, दम्याच्या त्रासाने खोकल्याची उबळ येत असेल, तर लवंगीचे चिमूटभर चूर्ण मधातून चाटावे.
उ. पावटा, हरभरा, मसूर असे पदार्थ खाण्यात भरपूर आल्यावर पोट फुगून अपचन झाल्यास भाजलेल्या लवंगांचे चिमूटभर चूर्ण मधातून घ्यावे. यामुळे पोटातील वायूला गती मिळून पोट हलके होते. सध्या बरेच जण पुष्कळ जेवण झाले की, सोडा असलेले शीतपेय पितात. उपाहारगृहामध्ये सुद्धा एक प्रथा असल्याप्रमाणे ‘कोल्ड ड्रिंक हवे का ?’, असे विचारले जाते. त्या माध्यमातून अतिप्रमाणात साखर शरिरात जाते. खरे तर जेवण प्रमाणात घेतले, तर ही वेळ येत नाहीच; पण जिभेवरील नियंत्रण कधीतरी सुटून हा त्रास झाला, तर साधे लवंग चूर्ण घेणे, हे आरोग्यासाठी कधीही चांगलेच !
८. जायफळ
अ. आपल्याकडे गोड पदार्थांमध्ये सुगंध येण्यासाठी जायफळ वापरले जाते. जायफळ उष्ण गुणधर्माचे आहे.
आ. डोके दुखत असल्यास जायफळ उगाळून लावावे.
इ. झोप लागत नसेल, तर कपाळ आणि पायाचे तळवे यांवर जायफळ उगाळून लेप लावावा.
ई. पोटात मुरडा येऊन जुलाब होत असतील, तर जायफळ किसावे. किसलेले जायफळ पाव चमचा तूप साखरेसह घेतल्यास पोटात मुरडा येण्याचे प्रमाण न्यून होते आणि जुलाबही थांबतात.
उ. चेहर्यावर तारुण्यपीटिका (पुरळ) येत असतील, तर जायफळ दुधात उगाळून त्याचा लेप करावा. यामुळे तारुण्यपीटिकेचे डाग चेहर्यावर उमटत नाहीत आणि त्वचा स्वच्छ होते.
९. दालचिनी
अ. सर्दीने डोके दुखत असल्यास दालचिनी उगाळून कपाळावर लेप करावा.
आ. दालचिनी हिरड्यांना मजबूत करणारी आहे. त्यामुळे दालचिनीचा एक तुकडा तोंडात ठेवणे, हे हिरड्यांसाठी आरोग्यदायक आहे.
इ. दालचिनीचा तुकडा तोंडात ठेवल्यास मळमळणेही न्यून होते.
ई. दात किडल्यास दालचिनीच्या तेलात भिजवलेला कापसाचा बोळा दाताच्या ठिकाणी ठेवला, तर वेदना न्यून होतात.
उ. दालचिनी उष्ण असल्यामुळे खोकला, दमा यांसारख्या आजारांवर वापरण्यात येणार्या औषधांमध्ये तिचा वापर अवश्य केला जातो.
(क्रमशः पुढच्या बुधवारी)
– वैद्या (सौ.) मुक्ता लोटलीकर, पुणे (१६.७.२०२३)