जिल्‍हा परिषदेच्‍या अखत्‍यारीतील ८० शाळा शिक्षकांविना !

पुणे – येथील जिल्‍हा परिषदेच्‍या अखत्‍यारीतील ३ सहस्र ५६३ शाळांपैकी ८० शाळा शिक्षकांविना आहेत. या शाळांमध्‍ये १ सहस्र २४० शिक्षक अल्‍प आहेत. पुणे महापालिकेमध्‍ये समाविष्‍ट झालेल्‍या ३४ गावांतील जिल्‍हा परिषद शाळेतील ५३४ शिक्षक जिल्‍हा परिषदेकडेच ठेवण्‍याचा प्रस्‍ताव जिल्‍हा परिषदेने राज्‍य सरकारला दिला आहे. पुणे जिल्‍हा परिषदेच्‍या अखत्‍यारीत ३ सहस्र ५६३ शाळांमध्‍ये साहाय्‍यक शिक्षक, पदवीधर शिक्षक आणि मुख्‍याध्‍यापक यांची एकूण ११ सहस्र ७७४ पदे संमत आहेत. त्‍यांपैकी १० सहस्र ५०२ शिक्षक उपलब्‍ध आहेत; मात्र जिल्‍हा परिषद शाळांपैकी ८० शाळांमध्‍ये एकही शिक्षक उपलब्‍ध नाही. यामुळे दुर्गम आणि आदिवासी भागांतील विद्यार्थ्‍यांची शैक्षणिक हानी होण्‍याची शक्‍यता आहे. असे होऊ नये; म्‍हणून महापालिकेत समाविष्‍ट झालेल्‍या ३४ गावांतील शाळांमधील ५३४ शिक्षकांचे हस्‍तांतरण न करता त्‍यांची नियुक्‍ती जिल्‍हा परिषदेकडे ठेवण्‍याचा प्रस्‍ताव जिल्‍हा परिषद प्रशासनाने राज्‍यशासनाला दिला आहे. शाळांमध्‍ये शिक्षक उपलब्‍ध झाल्‍यास विद्यार्थ्‍यांच्‍या शैक्षणिक गुणवत्तेमध्‍ये वाढ होण्‍यास निश्‍चितच साहाय्‍य होईल.

संपादकीय भूमिका :

जिल्‍हा परिषदेच्‍या शाळांची स्‍थिती अशी का ? शाळेमध्‍ये शिक्षकच नाहीत, ही स्‍थिती गंभीर आहे. अशा स्‍थितीमुळेच जिल्‍हा परिषदेच्‍या शाळा बंद पडत आहेत, हे लक्षात घेऊन त्‍यावर त्‍वरित उपाययोजना काढणे आवश्‍यक !