मंदिर रक्षणासाठी संघटित होण्याचा वसई येथील मंदिर विश्वस्तांचा निर्धार !
हिंदु जनजागृती समिती आणि मंदिर महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने मंदिर विश्वस्तांच्या बैठकीचे आयोजन !
वसई, १८ जुलै (वार्ता.) – मंदिरांवर होणारे आघात, मंदिरांचे सरकारीकरण रोखणे आणि धार्मिक परंपरांचे रक्षण करणे यांसाठी संघटितपणे कार्य करणे आवश्यक आहे, असे उद़्गार ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’चे आणि हिंदु जनजागृती समितीचे समन्वयक श्री. बळवंत पाठक यांनी येथे काढले. ते वसई येथील वीर मारुति मंदिर येथे झालेल्या मंदिर विश्वस्तांच्या बैठकीत बोलत होते. १६ जुलै या दिवशी हिंदु जनजागृती समिती आणि मंदिर महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने बैठक पार पडली. बैठकीत वसई, विरार, नालासोपारा परिसरातील २९ मंदिरांचे विश्वस्त आणि प्रतिनिधी उपस्थित होते. सर्वांनी मंदिर रक्षणासाठी संघटित होण्याचा निर्धार केला.
‘सर्व ठिकाणी जशी वस्त्रसंहिता लागू असते, त्याप्रमाणे मंदिरांमध्येही वस्त्रसंहिता असायला हवी’, असे स्पष्ट मत श्री. बळवंत पाठक यांनी व्यक्त केले. मंदिरांत धर्मशिक्षणवर्ग चालू करून त्याच्या जागृतीसाठी पुढाकार घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
क्षणचित्र
१० मंदिरांत वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्धार मंदिर विश्वस्तांनी केला.
अभिप्राय
१. श्री. यशवंत गावडे, पुजारी, साई मंदिर, वसई (पूर्व). – मंदिरातील पुजार्यांनी धर्माविषयी भाविकांमध्ये जागृती करावी.
२. श्री. नंदकिशोर पवार, धर्म जागरण समिती – मंदिरांमध्ये धर्मशिक्षणवर्ग चालू करण्यासाठी विश्वस्तांनी पुढाकार घ्यावा !
हिंदु राष्ट्र साकार करण्यासाठी मंदिरांचे महत्त्व अनन्यसाधारण ! – डॉ. जगदीश शास्त्री, विश्वस्त, श्री दिवाणेश्वर महादेव मंदिर
हिंदु राष्ट्र साकार करण्यासाठी मंदिरांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. मंदिरे ही संस्कृती आणि धर्म टिकवण्याचे प्रमुख केंद्र आहेत. धर्मावरील आघात, धर्मांतर रोखणे आणि धर्मशिक्षण देणे यांत मंदिरांची मुख्य भूमिका असायला हवी. वस्त्रसंहितेच्या माध्यमातून संस्कृतीरक्षणासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा. ‘एक मंदिर – एक सेवाकार्य’ असे प्रत्येकाने आरंभले, तर संस्कृतीरक्षण आणि धर्मप्रसार यांचे कार्य सहजपणे होईल.