सोमवती अमावास्येच्या निमित्ताने लाखो भाविकांनी घेतले जेजुरीतील खंडोबाचे दर्शन !
जेजुरी (जिल्हा पुणे) – ‘येळकोट येळकोट जय मल्हार’ असा जयघोष आणि भंडार्याची उधळण करत ४ लाख भाविकांनी महाराष्ट्राचे कुलदैवत तीर्थक्षेत्र खंडाबाचे दर्शन घेतले. सोमवती अमावास्येचा पर्वकाळ असल्याने जेजुरीमध्ये ‘सोमवती यात्रा’ भरली होती. सोमवारी उगवत्या सूर्याला अमावास्या असली की, त्या दिवशी जेजुरीच्या खंडोबा देवाची सोमवती अमावास्या यात्रा भरते.
दुपारी १ वाजता पेशवे, खोमणे आणि माळवदकर पाटील या मानकर्यांच्या उपस्थितीत खांदेकरी, मानकरी, सेवक यांकडून पालखी कर्हा स्नानासाठी काढण्यात आली. या वेळी देवाचा जयघोष करत भाविकांकडून खोबर्याची मुक्त हस्ताने उधळण होत होती.