दापोली (जिल्‍हा रत्नागिरी) येथील सौ. सुहासिनी डोंगरकर (वय ६८ वर्षे) यांनी गाठली ६१ टक्‍के आध्‍यात्मिक पातळी !

सौ. सुहासिनी डोंगरकर यांचा सत्‍कार करतांना श्री. महेंद्र चाळके

दापोली – येथील सनातनच्‍या साधिका सौ. सुहासिनी डोंगरकर (वय ६८ वर्षे) यांनी ६१ टक्‍के आध्‍यात्मिक पातळी गाठून त्‍या जन्‍म-मृत्‍यूच्‍या फेर्‍यांतून मुक्‍त झाल्‍या आहेत, अशी आनंदवार्ता सद़्‍गुरु सत्‍यवान कदम यांनी येथील एका कार्यक्रमात भ्रमणभाषच्‍या माध्‍यमातून करून दिली. १६ जुलै २०२३ या दिवशी झालेल्‍या या कार्यक्रमात सौ. डोंगरकर यांचा सत्‍कार सनातनचे ६२ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीचे साधक श्री. महेंद्र चाळके यांनी केला. या वेळी तालुक्‍यातील साधक उपस्‍थित होते.

मनोगत व्‍यक्‍त करतांना सौ. डोंगरकर म्‍हणाल्‍या की, प.पू. गुरुदेवांना अपेक्षित असे प्रयत्न मी सातत्‍याने करत होते. मला असे कधीही वाटले नव्‍हते की, माझी आध्‍यात्‍मिक पातळी होईल; परंतु आज मला खूप कृतज्ञता वाटत आहे. गुरुदेवांनी माझ्‍याकडून सेवा करून घेतली आणि त्‍यांनीच मला हा आनंद दिला.


आनंदी आणि झोकून देऊन भावपूर्ण सेवा करणार्‍या सौ. सुहासिनी डोंगरकर !

सौ. सुहासिनी डोंगरकर

१. आनंदी आणि उत्‍साही

‘सौ. सुहासिनीकाकू नेहमी आनंदी असतात. मी त्‍यांना कधीही थकलेल्‍या किंवा कंटाळलेल्‍या स्‍थितीत पाहिले नाही.

२. वेळेचे गांभीर्य

काकू सत्‍संगासाठी ५ मिनिटे आधीच उपस्‍थित असतात. सेवेचे नियोजन असेल, त्‍या वेळीही काकूंना कधी उशीर झाला आहे, असे होत नाही. त्‍या ठरलेल्‍या वेळेच्‍या ५ मिनिटे आधी उपस्‍थित असतात.

३. घरातील कामे गतीने करणे

काकू त्‍यांच्‍या यजमानांचे पथ्‍य-पाणी सांभाळून सेवेसाठी वेळ देतात. काकूंचे वय ६८ वर्षे असूनही त्‍यांची घरातील कामांची गती पुष्‍कळ आहे.

४. व्‍यष्‍टी साधनेचे गांभीर्य

काकूंचे व्‍यष्‍टी साधनेच्‍या संदर्भात पुष्‍कळ गांभीर्य आहे. त्‍या व्‍यष्‍टी साधनेची अधिकाधिक सूत्रे तळमळीने पूर्ण करण्‍याचा प्रयत्न करतात. त्‍या व्‍यष्‍टी साधनेचा नियमित आढावा देतात.

५. सेवाभाव

५ अ. सेवा उत्‍साहाने आणि तळमळीने करणे : काकूंची कोणतीही सेवा करण्‍याची सिद्धता असते. स्‍वच्‍छतासेवा असू दे किंवा विज्ञापने मिळवण्‍याची सेवा असू दे, काकू प्रत्‍येक सेवा उत्‍साहाने आणि तळमळीने करतात. त्‍यांची या वयातही प्रसारासाठी कितीही अंतर चालण्‍याची सिद्धता असते. त्‍या स्‍वत: साधकांना भ्रमणभाष करून सेवेचे नियोजन सांगतात.

५ आ. काकूंना आयत्‍या वेळी कोणतीही सेवा सांगितली, तरीही त्‍या सेवा करायला सिद्ध असतात.

५ इ. तहान-भूक विसरून भावपूर्ण सेवा करणे : काकू दिवसभर गुरुपौर्णिमेसंबंधी सेवा करतात. त्‍या वेळी त्‍यांना तहान-भूक यांचा विसर पडतो. त्‍या सेवेशी एकरूप होतात. ‘कितीही ऊन किंवा पाऊस असला, तरी प्रसार पूर्ण कसा होईल ?’, हे त्‍यांचे एकच ध्‍येय असते. त्‍यांचा ‘गुरुदेव माझ्‍याकडून प्र्रत्‍येक सेवा करून घेत आहेत’, असा भाव असतो.’

– अधिवक्‍त्‍या (सौ.) अपर्णा कुलकर्णी, दापोली, जिल्‍हा रत्नागिरी. (११.६.२०२३)