विसापूर (दापोली) येथे वृद्धेचा खून करून सोन्याची माळ चोरली : १२ घंट्यांत महिला आरोपीला पोलिसांनी केली अटक
दापोली – तालुक्यातील विसापूर मधलीवाडी येथे वयोवृद्ध महिला दीपावती घाग (वय ८७ वर्षे ) यांचा चोरीच्या उद्देशाने वाडीतीलच महिला सृष्टी संतोष कदम हिने खून केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणात संशयित आरोपी सृष्टी कदम हिला १२ घंट्यांत पोलिसांनी अटक केली.
दीपावती घाग या महिलेचा खून करून तिच्या अंगावरील सोन्याची माळ चोरून नेल्याची घटना १७ जुलै या दिवशी घडली होती. दागिन्यासाठी हा खून करण्यात आल्याचा प्राथमिक संशय व्यक्त करण्यात येत होता. या घटनेविषयी त्यांच्या मुलाने पोलिसांत फिर्याद दिली. या फिर्यादीत म्हटले आहे की, दीपावती घाग या आजारी होत्या. त्या घरी एकट्याच रहात होत्या. त्यांचा खून १६ जुलै ते १७ जुलैला सकाळी ७ वाजण्याच्या दरम्यान झाला आहे. या घटनेत ७८ सहस्र रुपये किमतीची सोन्याची बोरमाळ चोरून नेल्याचे समोर आले आहे. याविषयी दापोली पोलिसांनी भा.दं.वि.क. ३०२, ४५२, ३९७ प्रमाणे गुन्हा नोंद करून तत्परतेने अन्वेषणाला प्रारंभ केला.
पोलिसांनी तात्काळ घटनास्थळाची पहाणी करून दीपावती घाग यांचे नातेवाईक आणि स्थानिक ग्रामस्थांकडे याविषयी सातत्याने चौकशी केली. या चौकशीत पोलिसांना सृष्टी कदम हिचा दाट संशय आला. तिच्याकडे गुन्ह्याचे अनुषंगाने चौकशी करता सृष्टी कदम यांनी प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर तिची अधिक चौकशी केली असता तिनेच गुन्हा केल्याची निश्चिती झाली. या गुन्ह्याचे अधिक अन्वेषण पोलीस निरीक्षक विवेक अहिरे करत आहेत.