तेलुगु चित्रपटातून होणारा देवतांचा अवमान हिंदुत्वनिष्ठांनी रोखला !
चित्रपटाच्या निर्मात्याने क्षमायाचना करत आक्षेपार्ह प्रसंग हटवला !
भाग्यनगर (तेलंगाणा) – ‘राजुगारी कोडी पुलाव’ (राजाचा कोंबडा पुलाव) या आगामी तेलुगु चित्रपटामध्ये देवता आणि संत यांच्या करण्यात आलेल्या अवमानाला हिंदुत्वनिष्टांनी विरोध केला. त्यानंतर चित्रपटातून आक्षेपार्ह दृश्य काढून टाकण्यात आले असल्याची माहिती निर्मात्याने दिली. हा चित्रपट २९ जुलैला प्रदर्शित होणार आहे.
या चित्रपटाचा काही भाग सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला होता. यात देवतांचा अवमान करणारा प्रसंग होता. हे पाहून भाग्यनगरमधील हिंदुत्वनिष्ठ श्री. चिकोटी प्रवीण, राष्ट्रीय दलित सेनेचे अध्यक्ष वरप्रसाद आणि हिंदुत्वनिष्ठ अन् अभिनेत्री कराटे कल्याणी यांनी यास विरोध करत प्रसंग काढून टाकण्याची मागणी केली होती. यासह कराटे कल्याणी यांनी पोलीस ठाण्यात तक्रारही प्रविष्ट केली. यानंतर चित्रपटाचे निर्माते शिवा कोना आणि अभिनेते कुणाला कौशिक बहिरंग यांनी क्षमायाचना करत आक्षेपार्ह दृश्य काढून टाकल्याची माहिती दिली.