अविश्वास ठराव प्रविष्ट केल्यानंतर उपसभापतींना पदावर बसण्याचा नैतिक अधिकार नाही ! – अनिल परब, आमदार, ठाकरे गट
मुंबई, १७ जुलै (वार्ता.) – सभागृहात अविश्वास ठराव प्रविष्ट केल्यानंतर उपसभापती डॉ. नीलम गोर्हे यांना पदावर बसण्याचा नैतिक अधिकार नाही, असे प्रतिपादन ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी १७ जुलै या दिवशी विधानभवनात पत्रकारांशी बोलतांना केले.
ते पुढे म्हणाले की, विधान परिषदेच्या उपसभापती म्हणून डॉ. नीलम गोर्हे काम पहात आहेत. त्यांनी स्वत:हून पक्षाचे सदस्यत्व सोडलेले आहे. १० व्या परिशिष्टातील कायद्याच्या २ ‘अ’ मध्ये अपात्रतेची तरतूद आहे. त्याअंतर्गत आम्ही त्यांच्या विरोधात अपात्रतेची याचिका प्रविष्ट केली आहे. सर्वोच्च न्यायालयात अपात्रतेचा निर्णय काय झाला आहे, हे सर्वांना ठाऊक आहे. न्यायालयाने ही सर्व प्रकरणे अध्यक्षांकडे पाठवली आहेत; पण सध्याच्या परिस्थितीत सभापतीच नाही. उपसभापतींवर अविश्वासाचा ठराव आहे. यासाठी आम्ही त्यांना पदावरून हटवण्याचीही नोटीस दिली आहे.
डॉ निलम गोऱ्हे यांना सभापतींच्या आसनावर बसण्याचा अधिकार नाही – अनिल परबhttps://t.co/TVzfQVmhYr
सभापती- उपसभापतींवर अविश्वास दाखवला जातो त्या वेळी त्या सदस्याला आसनावर बसण्याचा कायदेशीर वा नैतिक अधिकार नाही.#AnilParab #MonsoonSession #MaharashtraPolitics #ShivsenaUBT pic.twitter.com/LlOys5Pz2A— maharashtracity (@maharashtracity) July 17, 2023
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालात नबाम राबिया प्रकरणाचा दाखला देत स्पष्ट केले की, ज्या वेळी सभापती-उपसभापती पदावर अविश्वास दाखवला जातो, त्या वेळी त्या सदस्याला आसंदीवर बसण्याचा कायदेशीर वा नैतिक अधिकार नसतो. जोपर्यंत अपात्रतेच्या याचिकेचा निर्णय लागत नाही, पदावरून दूर करण्याच्या नोटिशीविषयी निर्णय होत नाही, तोपर्यंत सभापतींनी त्या आसंदीवर बसू नये, अशी आम्ही भूमिका घेतली; मात्र आमची भूमिका न मांडू दिल्यामुळे आम्ही सभात्याग केला.