परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने पू. शिवाजी वटकर यांना लाभलेला संतांचा सत्संग आणि त्यामुळे साधनेसाठी झालेले साहाय्य !
सनातनचे १०२ वे संत पू. शिवाजी वटकर (वय ७६ वर्षे) यांचा साधनाप्रवास
‘पू. वटकर यांना मनात परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती निर्माण झालेले दैवी आकर्षण आणि अपार भाव’, याविषयी आपण १७.७.२०२३ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या भागात पाहिले. आजच्या भागात ‘पू. वटकर यांना संतांचा लाभलेला अनमोल सहवास’ यांविषयीची सूत्रे बघणार आहोत.
(भाग ४)
भाग ३ वाचण्यासाठी येथे क्लिक करा. https://sanatanprabhat.org/marathi/702253.html |
११. संतांचा लाभलेला अनमोल सहवास
परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने मला अनेक संतांच्या सहवासातून शिकता आलेे.
११ अ. प.पू. रघुवीर काणे महाराज : नारायणगावचे प.पू. रघुवीर काणे महाराज यांचा मला अनेक वर्षे सत्संग लाभला. ते ज्ञानगुरु होते. मी त्यांच्या समवेत असतांना ते माझ्याकडून नामजपादी साधना करून घेत. ते मला त्यांच्या पुढ्यात बसवून अध्यात्माविषयी शिकवत असत.
११ आ. डॉ. आठवले यांचे गुरु प.पू. भक्तराज महाराज
११ आ १. पत्नीची शिर्डीच्या साईबाबांवर श्रद्धा असणे आणि ‘प.पू. भक्तराज महाराज घरी आल्यावर ‘ते साईबाबा आहेत’, याची पत्नीला अनुभूती येणे : वर्ष १९९२ मध्ये प.पू. भक्तराज महाराज (प.पू. बाबा) प.पू. डॉक्टरांच्या घरी मुंबई येथे आले होते. मी आणि माझी पत्नी पहाटे ५ वाजता प.पू. बाबांसाठी अल्पाहाराचे पदार्थ घेऊन गेलो होतो. पत्नीने प.पू. बाबांना आमच्या घरी येण्यासाठी आग्रह केला. मी पत्नीला सांगत होतो, ‘‘अशा उच्च कोटीच्या संतांना आपण आग्रह करून घरी बोलवू नये. त्यांची इच्छा असेल, तर ते स्वतःहून येतील.’’
पूर्वी आम्ही वर्षातून २ – ३ वेळा शिर्डीला जायचो. त्यामुळे पत्नीची शिर्डीच्या साईबाबांवर श्रद्धा होती. पत्नी मला म्हणाली, ‘‘मी अनेक वर्षे साठवलेले पैसे शिर्डीला जाऊन साईबाबांच्या चरणी अर्पण करणार होते; परंतु प.पू. बाबा जर साईबाबा असतील, तर ते आपल्या घरी येतील आणि तेव्हा मी त्यांना माझ्याकडील पैसे अर्पण करीन.’’
परात्पर गुरु डॉक्टरांच्या घरी सकाळी अल्पाहार केल्यानंतर प.पू. बाबा तिथून निघाले. निघतांना ते आम्हाला म्हणाले, ‘‘मी आज दुपारपर्यंत तुमच्याकडे येतो.’’ नंतर दुपारी प.पू. बाबा आणि त्यांच्या समवेत त्यांचे २५ भक्त आमच्याकडे आले. आम्ही
प.पू. बाबांची पाद्यपूजा केली. पत्नीने ठरवल्याप्रमाणे प.पू. बाबांना जमवलेले पैसे अर्पण केले. ‘प.पू. बाबा हे शिर्डीचे साईबाबा आहेत’, याची पत्नीला अनुभूती आली. त्यानंतर प.पू. बाबा आमच्या घरी ३ वेळा आले.
११ आ २. प.पू. भक्तराज महाराज यांनी साधनेसाठी केलेले साहाय्य !
११ आ २ अ. पत्नीने ‘यजमान उशिरा घरी येतात’, असे प.पू. भक्तराज महाराजांना सांगितल्यावर प.पू. बाबांनी तिला समजावून सांगणे : मी माझे कार्यालयीन कामकाज करून सायंकाळी ७ ते रात्री ११ वाजेपर्यंत सेवा करत असे. त्या वेळी मी मुंबई सेवाकेंद्रात किंवा मुंबईत अध्यात्मप्रचारासाठी जात असे. त्यामुळे मला घरी जायला उशीर होत असे आणि माझ्या पत्नीला हे आवडत नसेे. एकदा प.पू. बाबांच्या दर्शनासाठी आम्ही मुंबई सेवाकेंद्रात गेलो असतांना तिने सांगितले, ‘‘यजमान रात्री घरी उशिरा येतात.’’ तेव्हा प.पू. बाबा तिला म्हणाले, ‘‘उद्यापासून तुझे यजमान सायंकाळी ७ वाजता घरी येतील; मात्र येतांना ते दारूची बाटली घेऊन येतील आणि घरी दारू पीत बसतील. हे तुला चालेल का ? त्याऐवजी ‘ते सत्संग घेणे’, हे अध्यात्माचे कार्य करतात, हेे किती चांगले आहे.’’ तेव्हा पत्नीच्या हे लक्षात आले. काही दिवसांनी पत्नीही अध्यात्मप्रसार करायला लागली.
११ आ २ आ. पत्नीला सेवेमुळे घरी येण्यास उशीर होणे आणि तसे परात्पर गुरु डॉक्टरांना सांगितल्यावर त्यांनी ‘प.पू. बाबांनी कसे उलट केले आहे’, हे लक्षात आणून देणे : माझी मुले शाळेत शिकत होती. ‘त्यांच्याकडे दुर्लक्ष होऊ नये’; म्हणून मी काही वेळा घरी लवकर जाऊ लागलो. पत्नी सत्संग घेण्यासाठी जात असल्यामुळे तिला घरी येण्यास उशीर होत असे. एकदा प.पू. रामानंद महाराज, मी आणि माझी पत्नी मुंबई येथे परात्पर गुरु डॉक्टरांच्या घरी बोलत बसलो होतो. तेव्हा मी म्हटले, ‘‘सध्या काही वेळा पत्नी घरी उशिरा येते.’’ तेव्हा परात्पर गुरुदेव म्हणाले, ‘‘आता तुम्ही पत्नीविषयी गार्हाणे करत आहात. पूर्वी त्या तुमच्याविषयी प.पू. बाबांकडे गार्हाणे करत होत्या. प.पू. बाबांनी कसे उलट केले आहे, पहा !’’
असा विनोद केल्यावर सर्व जण हसले. यातून ‘प.पू. बाबांसारखे उच्च कोटीचे संत साधकांची साधना होण्यासाठी कसे साहाय्य करतात’, हे शिकायला मिळाले.
वर्ष १९९१ ते १९९५ पर्यंत परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने मला प.पू. भक्तराज महाराज यांच्या गुरुपौर्णिमा महोत्सवांत सहभागी होण्याची आणि ते जेव्हा मुंबईला येत असत, तेव्हा मला त्यांच्या समवेत रहाण्याची संधी लाभली.
११ इ. देवद, पनवेल आश्रमात परात्पर गुरु पांडे महाराज यांचा लाभलेला अनमोल सत्संग ! : परात्पर गुरु पांडे महाराज हे ज्ञानयोगी संत होते. वर्ष २०१६ ते वर्ष २०१९ या कालावधीत मला त्यांचा देवद येथील सनातनच्या आश्रमात प्रतिदिन सकाळी अर्धा घंटा सत्संग मिळाला. तेव्हा ते माझ्याशी अध्यात्म, साधना, राष्ट्र, धर्म आदी अनेक विषयांवर बोलायचे. मी ते बोलणे ध्वनीमुद्रित करून त्याचे टंकलेखन करत असे. ते ज्ञानयोगी असूनही त्यांनी मला ‘व्यष्टी आणि समष्टी साधना करण्यासाठी कसे प्रयत्न करायचे ?’, हे हसत-खेळत आणि सोप्या भाषेत शिकवले. मला त्यांच्या चैतन्यमय वाणीतून शिकता आले.
– (पू.) शिवाजी वटकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२.५.२०२०)
(क्रमशः)
मंदिराच्या गाभार्यातील निरांजन होण्यासाठी करतो प्रार्थना गुरुदेवांना ।
‘पूर्वी मला ‘नावाजलेला कार्यकर्ता’ होण्याची हौस होती. सनातनच्या मार्गदर्शनानुसार साधना करतांना मला सतत आनंद मिळू लागला. याविषयी विचार करत असतांना गुरुकृपेने सुचलेली सूत्रे आणि स्फुरलेली कविता पुढे दिली आहे.
मायेतील जीवन जगत असतांना काही समाजसेवक काही कालावधीसाठी धडाडीचे आणि दिखाऊ कार्य करून समाजाकडून स्वकौतुक करून घेत असतात; कारण त्यांचे कार्य आकाशात अकस्मात् कडाडणार्या विजेप्रमाणे किंवा डोंगरावर लागलेल्या वणव्याप्रमाणे डोळे दिपून टाकणारे असते. ते काही वेळच टिकते, तसेच समाजाला त्याचा उपयोग न होता हानी होण्याची शक्यता असते. असे असले, तरी मला पूर्वी मायेत असतांना त्यांच्याप्रमाणे कार्यकर्ता व्हावेसे वाटायचे. सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना चालू केल्यावर त्यातील क्षणभंगूरता, असत्य आणि अपावित्र्य माझ्या लक्षात आले अन् काही समाजसेवकांप्रमाणे ‘दूरच्या गावात जाऊन सातत्याने आणि निरपेक्ष भावाने समाजसेवा करावी’, असे मला वाटले. आता मात्र मला वीज किंवा वणवा होण्यापेक्षा ‘मंदिराच्या गाभार्यातील दीप व्हावे’, असे वाटते. तो दीप स्वतः जळून इतरांना प्रकाश देण्याचे पवित्र, सात्त्विक आणि समष्टी कार्य करतो.
हे गुरुदेवा (टीप),
स्वभावदोषरूपी आकाशात कडाडणारी वीज करू नका मजला ।
मंदिराच्या गाभार्यातील दिवा
होण्यासाठी करतो प्रार्थना तुम्हाला ॥ १ ॥
अहंकाराने पेटलेल्या वणव्यातील ज्वाळा करू नका मजला ।
मंदिरातील मंद जळणारा दिवा
होण्यासाठी करतो प्रार्थना तुम्हाला ॥ २ ॥
आकाशामध्ये अकस्मात् चमकणारा तारा करू नका मजला ।
मंदिरातील सतत तेवणारा दिवा
होण्यासाठी करतो प्रार्थना तुम्हाला ॥ ३ ॥
सनातनच्या विश्वव्यापी मंदिरातील
मिणमिणती पणती करा मजला ।
मंदिराच्या गाभार्यातील निरांजन
होण्यासाठी करतो प्रार्थना गुरुदेवांना ॥ ४ ॥
टीप – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले
‘हे गुरुदेवा, सनातन संस्थेच्या जगभरातील अफाट कार्यात मला मंद प्रकाश देणार्या एका लहान दीपाप्रमाणे होता येऊ दे’, अशी आपल्या चरणी शरणागतभावाने प्रार्थना करतो.’
– (पू.) शिवाजी वटकर (वय ७६ वर्षे) (१.२.२०२३)
भाग ५ वाचण्यासाठी येथे क्लिक करा. https://sanatanprabhat.org/marathi/702812.html |