विवाहबाह्य संबंधांची नवरूढी !
विवाहबाह्य संबंधांसंदर्भात अलीकडेच ‘डेटिंग अॅप ग्लीडन’ने सर्वेक्षण करून एक अहवाल सिद्ध केला आहे. त्या अहवालात ‘भारतात अर्ध्याहून अधिक लोक त्यांच्या जोडीदाराची फसवणूक करतात’, अशी माहिती समोर आली आहे. आश्चर्यकारक म्हणजे यामध्ये महिलांनी पुरुषांना मागे टाकले आहे. ‘विवाहबाह्य संबंधांमध्ये पुरुषांपेक्षा महिलांचे प्रमाण अधिक आहे’, असे त्या अहवालात म्हटले आहे. अहवालानुसार ५६ टक्के महिलांचे विवाहबाह्य संबंध असतात. विवाह आणि कुटुंब संस्था हे सनातन भारतीय हिंदु संस्कृतीचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. त्यातही ‘पातिव्रत्य’ हे हिंदु संस्कृतीमधील महत्त्वाचे अंग आहे. अशा संस्कृतीची पाश्चात्त्यांच्या अंधानुकरणामुळे आज अशी दुरवस्था पहायला मिळणे, हे दुर्दैवी आहे. सध्या संपूर्ण विश्व भारताकडे ‘आदर्श संस्कृती’ म्हणून पहात असतांना केवळ चंगळवाद म्हणून कामतृप्तीसाठी पुरुषांनी आणि त्यातही अधिक महिलांनी विवाहबाह्य संबंध ठेवणे, हे लज्जास्पद आहे. कुटुंबव्यवस्था टिकवणे आणि सांभाळणे, हे स्त्रीच्या हातात असते अन् तीच व्यभिचारी झाली, तर ती व्यवस्था कोलमडणार, यात शंका नाही.
‘समाजव्यवस्था उत्तम रहावी’, यासाठी विवाहाचे महत्त्व आहे; मात्र विवाहबाह्य संबंधांसारख्या विकृतीमुळे संस्कार आणि नैतिकता यांचे वाभाडे निघून मानव पशूंच्या रांगेत उभा रहात आहे. त्यामुळे कुटुंबात आणि पर्यायाने समाजात अविश्वास, कलह, अशांतता वाढलेली आहे. स्वैराचाराने मानसिक अस्वस्थता वाढून जीवन सुखी, समाधानी आणि स्थिर रहात नाही, तर व्यभिचार, स्वैराचार यांमुळे एडस्सारखे रोग, ताण, मानसिक अस्वास्थ्य, आर्थिक समस्या आदी उत्पन्न होऊन त्याचे वाईट परिणाम पुढे भोगावे लागतात. आता पाश्चात्त्यांनाही कुटुंबसंस्थेचे महत्त्व लक्षात आल्याने अमेरिकेत विवाह आणि कुटुंब संस्था जपण्यासाठी चळवळ चालू झाली आहे. व्यभिचारातून निर्माण होणार्या संततीचेही वेगळे प्रश्न निर्माण होतात.
आधुनिकता म्हणजे प्रगती, सुधारणा आणि स्वैराचार नव्हे. ‘चारित्र्य आणि शील हा स्त्रियांचा सर्वांत मोठा दागिना आहे’, असे आपल्याकडे म्हटले आहे. समाज अशा स्त्रियांकडे आदराने पहातो. त्यामुळेच पाश्चात्त्यांच्या विकृतीचे अंधानुकरण करून पशूंप्रमाणे अनिर्बंध जीवन न जगता भारतीय संस्कृतीचा अंगीकार करायला हवा. यामुळे महिला आणि पुरुष यांनी अधःपतित होण्यापासून स्वतःला रोखण्यातच हित आहे !
– सौ. अपर्णा जगताप, पुणे