कोपरखैरणे येथे पू. संभाजी भिडेगुरुजी यांची सभा निर्विघ्‍नपणे पार पडली !

पोलिसांच्‍या चोख बंदोबस्‍ताचा परिणाम !

पू. संभाजीराव भिडेगुरुजी

नवी मुंबई, १७ जुलै (वार्ता.) – श्री शिवप्रतिष्‍ठान हिंदुस्‍थान, नवी मुंबई विभागाच्‍या वतीने पू. संभाजी भिडेगुरुजी यांची कोपरखैरणे येथे १६ जुलै या दिवशी जाहीर सभा आयोजित करण्‍यात आली होती. वंचित बहुजन आघाडीसह अन्‍य संघटनांनी या सभेला विरोध केला होता; मात्र पोलिसांच्‍या चोख बंदोबस्‍तामुळे सभा निर्विघ्‍नपणे पार पडली. ‘पू. भिडेगुरुजी वादग्रस्‍त शब्‍दांचा वापर करत असल्‍याने त्‍यांच्‍या सभेला अनुमती देऊ नये’, अशी मागणी वंचित बहुजन आघाडी, संभाजी ब्रिगेड, रिपब्‍लिकन सेना यांनी पोलीस आयुक्‍तांकडे केली होती. पू. भिडेगुरुजी सभेच्‍या ठिकाणी येण्‍याच्‍या आधी विरोधकांनी निदर्शने चालू करताच पोलिसांनी त्‍यांना पिटाळून लावले. त्‍यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण होते. सभेच्‍या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी कोपरखैरणे बसस्‍थानक ते सभेच्‍या ठिकाणापर्यंतचा रस्‍ता वाहतुकीसाठी बंद केला होता. सभेला माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील, भाजप आयटी सेलचे महाराष्‍ट्र प्रमुख सतीश निकम, माजी नगरसेवक शंकर मोरे, कृष्‍णा पाटील आदी उपस्‍थित होते.

हिंदुस्‍थान हे राष्‍ट्र देवाने निर्माण केलेले आहे ! – पू. संभाजी भिडेगुरुजी 

पू. संभाजी भिडेगुरुजी म्‍हणाले की, हिंदुस्‍थान हे आपले राष्‍ट्र देवाने निर्माण केलेले आहे. जगात आपल्‍यापेक्षा अमेरिका दुप्‍पट आहे, अन्‍य राष्‍ट्रे त्‍याहून मोठी आहेत; पण सलग सुपीक भूमी केवळ भारतातच आहे. नापीक, ओसाड असणारे अनेक देश आहेत. १२ पैकी ७ नद्या हिंदुस्‍थानामध्‍ये आहेत. अन्‍य कोणत्‍याही एका देशात १०८ प्रकारचे धातू मिळत नाहीत, ते केवळ आपल्‍या देशात मिळतात. अशा या वैभवसंपन्‍न राष्‍ट्रावर परकियांची ७६ आक्रमणे झाली. जगात ५२ मुसलमान राष्‍ट्रे आहेत. त्‍यातील ३९ राष्‍ट्रांनी आपल्‍यावर आक्रमणे केली. स्‍वातंत्र्य मिळाल्‍यावर चीनने १९६२ मध्‍ये भारताचा १ लाख ८४ सहस्र किलो मीटरचा भूभाग बळकावला; मात्र अद्यापपर्यंत लोकसभेतील एकाही लोकप्रतिनिधीने तो पुन्‍हा मिळवण्‍यासाठी आवाज उठवला नाही. त्‍याच चीनची विविध उत्‍पादने खरेदी करून आपण प्रतिवर्षी आपले ६८ लक्ष कोटी रुपये चीनला देतो, याची खंत वाटते.

शेवटी त्‍यांनी हिंदवी स्‍वराज्‍य, ३२ मण सुवर्ण सिंहासन आणि खडा पहारा यांविषयी सविस्‍तर मार्गदर्शन केले.