नगर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या १६१ प्राथमिक शाळा विद्यार्थ्यांविना बंद पडण्याच्या स्थितीत !
राज्यात १५ सहस्र शाळांमध्ये २० पेक्षाही अल्प विद्यार्थीसंख्या !
अहिल्यानगर – राज्यात सर्वत्रच इंग्रजी माध्यमांतून आपल्या मुलांना शिक्षण देण्याचा पालकांचा ओढा वाढत आहे. त्यामुळे मराठी माध्यमाच्या शाळा बंद पडण्याच्या स्थितीमध्ये आहेत. नगर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या १६१ प्राथमिक शाळांमध्ये १० पेक्षाही अल्प विद्यार्थीसंख्या आहे. त्यामुळे या शाळा बंद पडण्याच्या स्थितीत आहेत. जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या दिवसेंदिवस अल्प होत आहे. (जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या अल्प का होत आहे ? याचा अभ्यास होणे आवश्यक आहे. जिल्हा परिषदांच्या शाळांचा दर्जा खालावणे अपेक्षित नाही, त्यासाठी यावर लवकरात लवकर उपाययोजना निघायला हवी ! – संपादक) राज्यामध्ये १५ सहस्रांहून अधिक जिल्हा परिषदेच्या शाळांची पटसंख्या २० पेक्षाही अल्प आहे.
जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेच्या ३ सहस्र ५६४ शाळा आहेत. त्यातील ६१२ शाळांमध्ये २० पेक्षा अल्प पटसंख्या आहे. १ ते १० पटसंख्या असणार्या सर्वाधिक शाळा अकोले तालुक्यामध्ये, तर १३ शाळा श्रीगोंदे तालुक्यात आहेत. विद्यार्थी संख्या अल्प असलेल्या शाळा बंद करू नयेत, असे निवेदन ‘शिक्षक भारती’ या संघटनेच्या वतीने देण्यात आले आहे. निवेदनातून शाळा बंद करण्याचा प्रयत्न झाल्यास आंदोलन छेडण्याची चेतावणीही दिली असल्याचे जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब जगताप यांनी सांगितले.