हिंदु जनजागृती समितीच्या वतीने अक्कलकोटसह ५ ठिकाणी हिंदूसंघटन मेळावे उत्साहात साजरे !
हिंदूंनी धर्मावरील आघात रोखण्यासाठी धर्मशिक्षण घेण्याची आवश्यकता ! – राजन बुणगे, हिंदु जनजागृती समिती
सोलापूर, १७ जुलै (वार्ता.) – मंदिर सरकारीकरणाच्या माध्यमातून मंदिर संस्कृतीवर आघात होत आहेत. सरकारीकरण झालेल्या देवस्थानांमध्ये भूमीचा अपहार होणे, मंदिरांमध्ये चालणार्या धर्मपरंपरावर निर्बंध आणणे, असे प्रकार होत आहेत. देशभरात केवळ हिंदूंच्या मंदिरांचेच सरकारीकरण झालेले आहे; पण अन्य पंथियांच्या एकाही प्रार्थनास्थळाचे नाही, हे हिंदूंनी लक्षात घ्यायला हवे. यापुढे हिंदु धर्मावरील आघात रोखण्यासाठी मंदिरांचे पावित्र्य टिकवणे आणि मंदिरे सरकारमुक्त करणे आवश्यक आहे. हिंदूंनी धर्मशिक्षण घेण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे श्री. राजन बुणगे यांनी केले.
हिंदु धर्माच्या रक्षणाचे महत्त्व हिंदु समाजमनामध्ये निर्माण व्हावे, यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट, सांगोला, तुळजापूर (जिल्हा धाराशिव), लातूर, बीड यांठिकाणी हिंदूसंघटन मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद़्गुरु स्वाती खाडये आणि पू. (कु.) दीपाली मतकर, हिंदु जनजागृती समितीच्या कु. वर्षा जेवळे यांनीही उपस्थितांना संबोधित केले. या मेळाव्याचा १ सहस्र २०० हून अधिक हिंदूंनी लाभ घेतला. या प्रसंगी मान्यवर वक्त्यांचे सत्कार करण्यात आले, तसेच महिलांना स्वसंरक्षण प्रशिक्षणाचे महत्त्व लक्षात यावे, यासाठी अक्कलकोट आणि तुळजापूर या ठिकाणी स्वरक्षण प्रशिक्षणाची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली, तर अन्य ठिकाणी प्रात्यक्षिकांचा ‘व्हिडिओ’ दाखवण्यात आला.
हिंदु स्त्रियांनो, धर्मशिक्षण घेऊन धर्माचरणी व्हा ! – सद़्गुरु स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्थासध्या हिंदु मुलींना खोट्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांचे धर्मांतर केले जात आहे. त्यांच्यावर अत्याचार केले जात आहेत. हे थांबवण्यासाठी हिंदु मुली आणि महिला यांनी धर्मशिक्षण घेऊन धर्माचरणी होणे आवश्यक आहे. जीवनात खर्या अर्थाने आनंदी होण्यासाठी नामसाधनाही महत्त्वाची आहे. त्यासाठी ‘श्री गुरुदेव दत्त ।’ आणि ‘श्री कुलदेवतायै नमः ।’ हे नामजप प्रत्येकाने प्रतिदिन करावेत. |
उपस्थित मान्यवर
लातूर येथील मेळाव्याला ममता हॉस्पिटलच्या अध्यक्षा डॉ. माया कुलकर्णी, लोकाधिकार वार्ताचे प्रमुख श्री. वेंकट पन्हाळे, हिंदु रक्षक दलाचे श्री. मनोज डोंगरे, भाजपचे प्रांत अध्यक्ष श्री. मनोज सूर्यवंशी, श्रीरामचंद्र प्रतिष्ठानचे श्री. संदीप तिवारी यांच्यासह मोठ्या संख्येने धर्मप्रेमी आणि राष्ट्रप्रेमी उपस्थित होते.
विशेष
१. लातूर जिल्ह्यातील औसा येथील धर्मप्रेमी श्री. गिरीधर कठारे हे वाहन करून ७ जणांना हिंदूसंघटन मेळाव्यास घेऊन आले.
२. सांगोला येथील मेळाव्याला शहराच्या आसपासच्या खेडेगावांतील धर्मप्रेमी चारचाकी वाहन करून उपस्थित राहिले.