रशिया भारताकडून ब्रह्मोस क्षेपणास्त्रे विकत घेण्याची शक्यता !
युक्रेन युद्धात रशियाच्या शस्त्रास्त्रांमध्ये घट झाल्याचा परिणाम !
नवी देहली – रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाला १ वर्षाहून अधिक काळ उलटला आहे. या युद्धामुळे दोन्ही देशांच्या शस्त्रांमध्ये घट झाली आहे. अमेरिका आणि युरोपमधील देश यांनी रशियावर घातलेल्या अनेक प्रतिबंधांमुळे रशियाला शस्त्रनिर्मितीमध्ये अडथळे येत आहेत. अशा परिस्थितीत रशियाला भारताच्या ‘ब्रह्मोस’ क्षेपणास्त्रांची आवश्यकता भासत आहे, असे तज्ञांचे म्हणणे आहे. ब्रह्मोस क्षेपणास्त्रांचे उत्पादन करणार्या आस्थापनाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि महाव्यवस्थापक अतुल दिनकर राणे यांचे म्हणणे आहे, ‘या संदर्भात आम्ही रशियाकडे एका बाजारापेठेप्रमाणेच पहात आहोत. तसेच रशियाकडे याहून दुसरा चांगला पर्यायही नाही.’’
सौजन्य टाईम्स नाऊ
१. ‘यूरेशियन टाइम्स’ या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार भारत रशियाला ब्रह्मोस क्षेपणास्त्र विकण्याचा विचार करत आहे. यामुळे दोन्ही देशांतील सैन्यविषयक सहकार्यामध्ये पालट होणार आहेत; कारण आतापर्यंत भारत रशियाकडून शस्त्रे विकत घेत आला आहे आणि आता रशिया भारताकडून शस्त्र विकत घेण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे ब्रह्मोस क्षेपणास्त्र भारत आणि रशिया या दोघांनी मिळून विकसित केले आहे.
२. काही प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार जर रशियाने ब्रह्मोस पूर्वीच विकत घेतले असते, तर सध्याच्या स्थितीत युक्रेन युद्धात त्याला याचा वापर करता आला असता. अतुल राणे यांच्या म्हणण्यानुसार युरोपमधील सध्याच्या स्थितीवरून वाटते की, रशियाकडून आम्हाला मागणी मिळू शकते. विशेष करून हवेतून मारा करणार्या ब्रह्मोस क्षेपणास्त्रांची मागणी येऊ शकते.