सर्व वाहनांना पथकरातून सवलत मिळणे अशक्य ! – भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाहनांना पथकरातून सूट मिळण्याची होती मागणी
सिंधुदुर्ग – केंद्रशासनाच्या नियमानुसार राष्ट्रीय महामार्गावरील पथकर (टोल) नाक्यावर सरसकट सर्व वाहनांना पथकरातून सूट (सवलत) देण्याचे प्रावधान (तरतूद) नाही. त्यामुळे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील ओसरगाव पथकर नाक्यावर जिल्ह्यातील सरसकट सर्व वाहनांना पथकरातून सूट देणे नियमानुसार शक्य नाही. त्यामुळे येथे पथकर वसुलीसाठी आवश्यक ते सहकार्य करावे, अशी विनंती ‘भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण कोल्हापूर’चे प्रकल्प संचालक व्ही.डी. पंदरकर यांनी ‘टोलमुक्त सिंधुदुर्ग कृती समिती’चे अध्यक्ष द्वारकानाथ घुर्ये यांना पाठवलेल्या पत्राद्वारे केली आहे.
‘टोलमुक्त सिंधुदुर्ग कृती समिती’च्या वतीने मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील ‘ओसरगाव पथकर नाक्या’वर पथकर वसुलीला विरोध असल्याविषयीचे पत्र राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला पाठवले होते. त्याला दिलेल्या उत्तरात पंदरकर यांनी म्हटले आहे की,
१. केंद्रशासनाच्या सध्याच्या प्रचलित नियमानुसार राष्ट्रीय महामार्गावरील पथकर नाक्यांच्या २० कि.मी. परिघात रहाणारे वाहनमालक आवश्यक कागदपत्रांसह अर्ज देऊन पथकर भरण्यापासून सूट मागू शकतात.
२. शासनाच्या नियमानुसार आर्थिक वर्ष २०२३-२४ साठी पथकर नाक्यापासून २० कि.मी. अंतरावर रहाणार्या स्थानिक बिगर व्यावसायिक वाहनांसाठी मासिक पासचा दर ३३० रुपये असेल, तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये नोंदणीकृत वाणिज्य प्रकारातील वाहनांना पथकरामध्ये ५० टक्के सवलत देण्यात येईल. त्याकरता पथकर वसूल करणार्या ठेकेदाराकडे संबंधित वाहनाचे नोंदणीपत्र आणि आधारकार्ड यांची प्रत सादर करावी लागते.
३. राष्ट्रीय महामार्गावरील पथकराची वसुली केंद्रशासनाच्या ‘राष्ट्रीय महामार्ग शुल्क नियम २००८’ नुसार केली जाते. त्यामधून महामार्गाच्या बांधणीच्या खर्चाची वसुली आणि राष्ट्रीय महामार्गाची देखभाल अन् दुरुस्ती करून महामार्ग सुस्थितीत ठेवले जातात. त्यामुळे सर्वांनी सहकार्य करावे.