वर्ष २०२२ मध्ये गुरुपौर्णिमेचा प्रचार करतांना जळगाव येथील साधकांना आलेल्या अनुभूती !
१. श्री. अनिल पाटील, चोपडा
१ अ. ‘गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमामुळे सभागृह शुद्ध होईल’, असे सभागृहाच्या मालकांनी सांगणे : ‘आम्ही २ साधक ‘परिश्रम मंगल कार्यालया’च्या सभागृहाची मोजणी करण्यासाठी गेलो होतो. तेव्हा तिथे सभागृहाचे मालक डॉ. दीपक चौधरी आले होते. त्यांनी आम्हाला विचारले, ‘‘काय नियोजन आहे ?’’ आम्ही सांगितले, ‘‘या वर्षीचा सनातन संस्थेचा गुरुपौर्णिमा महोत्सव इथे आहे.’’ आम्ही उत्सवाची जी रचना करणार आहोत, त्यासाठी आम्ही मोजमाप करत आहोत. तेव्हा ते म्हणाले, ‘‘तुम्ही छान सेवा करत आहात. इथे अनेक विवाह होतात, तीही शुभकार्येच आहेत; पण तुमच्या कार्यक्रमामुळे आमचे सभागृह शुद्ध होईल; कारण हा कार्यक्रम आध्यात्मिक आहे. त्यामुळे इथे येणार्या प्रत्येक व्यक्तीचा विचार चांगला आणि स्वच्छ असणार.’’
२. श्री. किशोर दुसाने, चोपडा
२ अ. दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वर्गणीदारास विज्ञापनाबद्दल सांगितल्यावर त्यांनी लगेच होकार देणे : ‘आम्ही गुरुपौर्णिमेचे संपर्क करत होतो. दैनिक ‘सनातन प्रभात’चे एक वर्गणीदार आहेत. त्यांच्याकडे प्रथमच विज्ञापन घेण्यासाठी गेलो होतो. आम्ही त्यांना विज्ञापनाचा विषय समजावून सांगितला. तेव्हा ते म्हणाले, ‘‘मला विज्ञापन द्यायचेच होते.’’ हे ऐकल्यावर गुरुमाऊलींप्रती कृतज्ञता व्यक्त झाली.’
३. सौ. सुवर्णा साळुंखे (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के), जळगाव
३ अ. जिज्ञासूंची आई रुग्णालयात भरती असूनही त्या गुरुपौर्णिमेचे अर्पण देण्यासाठी घरी येणे आणि अर्पण देऊन ‘गुरुपौर्णिमेला नक्की येणार’, असे सांगणे : ‘मला एका जिज्ञासूंकडे गुरुपौर्णिमेचे अर्पण घेण्यासाठी जायचे होते. मला इतर सेवा असल्यामुळे मी एका साधिकेला त्या जिज्ञासूंकडे अर्पण घेण्यासाठी पाठवले. तेव्हा ते जिज्ञासू बाहेर गेले होते. मी त्यांना भ्रमणभाष केला आणि सांगितले, ‘‘ताई, तुमच्याकडे सनातनच्या एक साधिका गुरुपौर्णिमेनिमित्त अर्पण घेण्यासाठी आणि निमंत्रण देण्यासाठी आलेल्या आहेत.’’ त्या वेळी त्यांनी ‘मी तात्काळ घरी जाते’, असे मला सांगितले. त्या जिज्ञासूंनी ताईंचे म्हणणे ऐकून घेतले, अर्पण दिले आणि म्हणाल्या, ‘‘ताई, मला घाई आहे. माझ्या आईला रुग्णालयात भरती केलेले आहे. त्यामुळे मी तुम्हाला अधिक वेळ देऊ शकत नाही; पण मी गुरुपौर्णिमेला नक्की येईन.’’ हे ऐकल्यावर माझ्याकडून गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त झाली.’
४. सौ. सुनीता व्यास (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के), चोपडा
४ अ. सत्संगातील जिज्ञासूंचा परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती भाव : ‘सत्संगात एक जिज्ञासू आहेत. त्यांचा परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती पुष्कळ भाव आहे. त्या बोलत असतांना प्रत्येक वेळी ‘गुरुदेवांमुळे झाले’, असा त्यांचा भाव असतो.
४ आ. त्यांच्यात सेवेची तळमळ पुष्कळ आहे. त्या आमच्या समवेत प्रसारसेवा करतात. त्या अर्पण पावती पुस्तक घेण्यासाठी माझ्या घरी येतात. अर्पण घेण्यासाठी घरोघरी जातात.’
४ ई. दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रत्येक वाचकाच्या मनात गुरुदेवांप्रती भाव जाणवणे : आम्ही दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वाचकांना गुरुपौर्णिमेनिमित्त भेटायला गेलो. त्यांना प्रत्यक्ष भेटल्यावर त्यांनी अर्पण दिले, तसेच ‘त्यांच्या मनात गुरुदेवांप्रती किती आदरभाव आहे’, हे आमच्या लक्षात आले. ते म्हणाले, ‘‘गुरुमाऊली दैनिक ‘सनातन प्रभात’च्या माध्यमातून ‘लवकरच हिंदु राष्ट्र येईल आणि रामराज्य स्थापन होईल’, असा संदेश प्रत्येक जिवापर्यंत पोचवत आहे. आम्ही सर्व परिवार कुलदेवीचा नामजप करतो. तुम्ही सर्व महिला पुष्कळ चांगली सेवा करता. ते पाहून ‘आम्ही काही करत नाही’, याची आम्हाला खंत वाटते.’’ त्या वेळी दादांनी आजूबाजूच्या घरांत अर्पणाचे महत्त्व सांगितले आणि गुरुपौर्णिमेच्या अर्पणाची सेवा केली. तेव्हा मला ‘गुरुमाऊली प्रत्येक जिवाकडून सेवा करवून घेते’, हे शिकायला मिळाले.’
५. सौ. विमल कदवाने (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के), ब्रह्मपूर (मध्यप्रदेश)
५ अ. ‘प्रतिवर्षी विज्ञापन देणार्या आधुनिक वैद्यांचे निधन झाल्यामुळे यावर्षी विज्ञापन कसे घ्यायचे ?’, असे वाटणे : ‘ब्रह्मपूरमध्ये एक ‘सर्जन’ होते. ते गुरुपौर्णिमा विशेषांकात प्रतिवर्षी त्यांच्या रुग्णालयाचे विज्ञापन द्यायचे. ५ मासांपूर्वी त्यांचे निधन झाले. त्यामुळे ‘या वर्षी विज्ञापन कसे घ्यायचे ?’, असे मला वाटले.
५ आ.‘सकारात्मक राहिल्यावर गुरुकृपेने सर्व शक्य होते’, असे शिकायला मिळणे : प्रतिवर्षी विज्ञापन घेण्यासाठी श्री. अजय गुप्ता मला साहाय्य करत असत. ‘या वेळी काय करावे ?’, असा विचार माझ्या मनात आल्यावर मी गुरुदेवांना प्रार्थना केली आणि श्री. अजय गुप्ता यांना भ्रमणभाष करून विज्ञापनाबद्दल सांगितले. तेव्हा ते म्हणाले, ‘‘डॉक्टरांच्या मोठ्या मुलाला विचारतो.’’ मी त्यांना म्हणाले, ‘‘आपण सकारात्मक राहून देवाला प्रार्थना करून प्रयत्न करूया.’’ गुप्तादादा यांनीही चिकाटीने प्रयत्न केले. त्यामुळे गुरुपौर्णिमेसाठीचे विज्ञापन मिळाले. ‘सकारात्मक राहिल्यावर गुरुकृपेने सर्व शक्य होते’, असे मला शिकायला मिळाले.’
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |