‘दोन्ही तळहातांची एकत्रित मुद्रा’ करून शरिरावरील त्रासदायक शक्तीचे आवरण काढण्याची पद्धत !
१. ‘दोन्ही तळहातांच्या एकत्रित मुद्रे’चा लागलेला शोध
‘वर्ष २०२१ मध्ये एकदा सनातनच्या रामनाथी आश्रमात यज्ञ चालू होता. तेव्हा मला जाणवले, ‘यज्ञात आहुती देणार्या यजमानांवर त्रासदायक (काळ्या) शक्तीचे आवरण आले आहे.’ मी त्यांच्यावरील आवरण काढायचा प्रयत्न केला; पण ते दूर होत नव्हते. तेव्हा मला लक्षात आले, ‘वाईट शक्ती यजमानांवर वरून त्रासदायक शक्तीचा प्रवाह सोडत आहेत. त्यामुळे त्यांच्यावरील त्रासदायक शक्तीचे आवरण दूर होत नाही आणि यासाठी आधी वरून येणारा त्रासदायक शक्तीचा प्रवाह रोखला पाहिजे.’ यासाठी देवाने मला सुचवले, ‘एक (उजवा) तळहात डोक्यावर १ – २ सें.मी. अंतराच्या पुढे स्वतःच्या दिशेने येईल असा ठेव आणि त्यावर दुसर्या (डाव्या) हाताचा तळवा आधीच्या तळव्याच्या विरुद्ध दिशेला, म्हणजे वरच्या दिशेला येईल असा ठेव. (छायाचित्र १ पहावे)’ या नवीन मुद्रेला मी ‘दोन्ही तळहातांची एकत्रित मुद्रा’, असे नाव दिले. मी ती मुद्रा करून ‘महाशून्य’ हा नामजप केला. तेव्हा १० मिनिटांत वरून येणारा त्रासदायक शक्तीचा प्रवाह थांबला, तसेच यजमानांवर आलेले आवरणही पुष्कळ अल्प झाले.
१ अ. ‘दोन्ही तळहातांच्या एकत्रित मुद्रे’चा झालेला परिणाम : यज्ञातील यजमानासाठी त्या नवीन मुद्रेने उपाय करतांना मला लक्षात आले, ‘त्या मुद्रेमधील वरच्या दिशेने असलेल्या तळहातामुळे उपाय होऊन वाईट शक्ती सोडत असलेला त्रासदायक शक्तीचा प्रवाह अडवला गेला आणि स्वतःच्या दिशेने असलेल्या तळहातामुळे माझ्यावर, म्हणजे मी उपाय करत असलेल्या यज्ञातील यजमानांसाठी उपाय होऊन त्यांच्यावरील आवरण अल्प झाले.’ अशा प्रकारे या नवीनच असलेल्या ‘दोन्ही तळहातांच्या एकत्रित मुद्रे’चा शोध लागला.
२. ‘दोन्ही तळहातांच्या एकत्रित मुद्रे’ने आवरण काढण्याची आवश्यकता
पूर्वी वाईट शक्ती शरिरावर आवरण आणायच्या, तेव्हा ते आवरण एखाद्या चक्रावर किंवा अधिकाधिक २ चक्रांवर असायचे. तेव्हा ‘मुठींनी आवरण काढणे’ (‘शरिरावर आलेले त्रासदायक शक्तीचे आवरण दोन्ही हातांच्या मुठींमध्ये गोळा करणे आणि ते शरिरापासून दूर टाकणे’ (छायाचित्र २ आणि छायाचित्र २अ पहा)) ही पद्धत लाभदायक ठरायची.
त्यानंतर सूक्ष्मातील युद्धाचा स्तर वाढला. तेव्हा वाईट शक्ती शरिरावर एखाद-दुसर्या चक्रांवर आवरण न आणता डोक्यापासून छातीपर्यंत किंवा डोक्यापासून कटीपर्यंत (कमरेपर्यंत) आवरण आणून अनुक्रमे ४ चक्रे (सहस्रार ते अनाहतचक्र) किंवा ६ चक्रे (सहस्रार ते स्वाधिष्ठानचक्र) आवरणाने सलग भारीत करू लागल्या. त्या वेळी ‘मनोरा (टॉवर) मुद्रा’ शरिरावरून फिरवणे’ या पद्धतीचाच उपयोग करावा लागला. ती मुद्रा म्हणजे दोन्ही हातांची मधली बोटे एकमेकांना जोडून आणि मनगटे डोक्याला दोन बाजूंनी टेकवून ‘मनोरा मुद्रा’ (छायाचित्र ३ पहा) करणे आणि ती मुद्रा कुंडलिनीचक्रांवरून (सहस्रार ते स्वाधिष्ठानचक्र यांवरून) ‘वरून खाली आणि खालून वर’ अशी ७ – ८ वेळा फिरवणे.
त्यानंतर सूक्ष्मातील युद्धाचा स्तर आणखी वाढला. तेव्हा वाईट शक्ती केवळ एकदाच व्यक्तीवर आवरण आणून शांत न बसता त्या व्यक्तीवर त्रासदायक शक्तीचा प्रवाह सातत्याने सोडू लागल्या. त्यामुळे तेव्हा ‘मुठींनी आवरण काढणे’ किंवा ‘मनोरा मुद्रा’ शरिरावरून फिरवून आवरण काढणे’ या दोन्ही पद्धतींचा उपयोग होत नसे; कारण त्रासदायक शक्तीचा प्रवाह सतत येत असल्याने कितीही आवरण काढले, तरी ते संपतच नसे. यासाठी व्यक्तीकडे येणारा त्रासदायक शक्तीचा प्रवाह आधी अडवावा लागतो. हे होण्यासाठी ‘दोन्ही तळहातांच्या एकत्रित मुद्रे’चा उपयोग होतो.
३. ‘दोन्ही तळहातांच्या एकत्रित मुद्रे’ने शरिरावरील आवरण काढण्याची पद्धत
प्रथम ‘प्राणशक्तीवहन उपाय पद्धती’ने (‘शरीर आणि शरिराची चक्रे यांवरून हाताची बोटे फिरवून बोटांतून प्रक्षेपित होणार्या प्राणशक्तीद्वारे आध्यात्मिक त्रास किंवा विकार याला कारणीभूत असलेले शरिरातील अडथळ्याचे स्थान शोधणे. त्यानंतर त्या स्थानावर अडथळ्याच्या तीव्रतेनुसार हाताच्या बोटांची मुद्रा अन् नामजप शोधून त्यांद्वारे उपाय करणे’) ‘कोणता जप करायचा ?’ हे शोधावे. (यासाठी सनातनचा ग्रंथ ‘विकार-निर्मूलनासाठी प्राणशक्ती (चेतना) वहन संस्थेतील अडथळे कसे शोधावेत ?’ वाचावा.) शरिरावरील आवरण काढतांना शोधून मिळालेला नामजप सतत करावा. शरिरावरील आवरण निघण्यासाठी ‘दोन्ही तळहातांची एकत्रित मुद्रा’ करावी आणि ती मुद्रा कुंडलिनीचक्रांवरून (सहस्रार ते स्वाधिष्ठानचक्र यांवरून) ‘वरून खाली आणि खालून वर’ अशी ७ – ८ वेळा फिरवावी. प्रत्येक चक्रावर आल्यावर तेथे साधारण अर्धा मिनिट थांबावे. मुद्रा चक्रांवरून फिरवतांना शरिरापासून २ ते ३ सें.मी.चे अंतर ठेवावे.
या पद्धतीने आवरण काढल्याने शरिरावर आवरणामुळे आलेले जडत्व किंवा दाब बराचसा अल्प झाल्याचे जाणवेल. पुढे उर्वरित आवरण आपण ‘मुठींनी आवरण काढणे’ (सूत्र २ पहा.) या पद्धतीने किंवा आवश्यकता वाटल्यास ‘मनोरा मुद्रे’चा उपयोग करून पूर्णपणे दूर करू शकतो.
४. ‘दोन्ही तळहातांच्या एकत्रित मुद्रे’चे लक्षात आलेले आणखी काही लाभ
४ अ. सेवा करत असलेल्या खोलीत वरून येणारा त्रासदायक शक्तीचा प्रवाह अडवता येणे, तसेच पाताळातून, म्हणजे भूमीतून येणारा त्रासदायक शक्तीचा प्रवाहही अडवता येणे : आपण संगणकावर सेवा करत असतांना कधी कधी असे लक्षात येते की, संगणक सारखा बंद पडत आहे किंवा करत असलेल्या सेवेत सारखी त्रुटी (एरर्) येत आहे. तसेच आणखी काही सेवा करत असतांना तिच्यामध्ये सारखे अडथळे येत असतात. तेव्हा सूक्ष्मातून बघितले, तर वाईट शक्ती आपल्या सेवेच्या माध्यमावर वरून त्रासदायक शक्ती सोडत असतात. त्या वेळी ती त्रासदायक शक्ती अडवण्यासाठीही ‘दोन्ही तळहातांच्या एकत्रित मुद्रे’चा उपयोग होतो. तेव्हा ‘आपल्या एका हाताचा तळवा वरच्या दिशेने येईल आणि दुसर्या हाताचा तळवा खाली भूमीच्या दिशेने येईल’, अशी मुद्रा करून ती आपल्या समोर धरावी (छायाचित्र ४ पहा) (शक्य असल्यास आपण सेवा करत असलेले माध्यम, उदा. संगणक किंवा एखादे यंत्र यावरही प्रत्यक्ष उपाय करू शकतो. तेव्हा ‘दोन्ही तळहातांची एकत्रित मुद्रा’ संगणक किंवा ते यंत्र यावर धरावी. त्यामुळे संगणक किंवा यंत्र यावरही उपाय होतील, तसेच वरून येत असलेला त्रासदायक शक्तीचा प्रवाहही अडवला जाईल.) जेथील वाईट शक्ती काढायची असेल, त्या दिशेने हाताचा तळवा करावा आणि त्रासाच्या आवश्यकतेप्रमाणे ‘शून्य, महाशून्य, निर्गुण किंवा ॐ’ यांपैकी एखादा नामजप करावा. आपल्याला खोलीत हलकेपणा जाणवू लागला की, हा उपाय करणे थांबवावे.
तसेच कधी कधी वाईट शक्ती पाताळातून, म्हणजे भूमीतून त्रासदायक शक्ती सोडत असतात. या त्रासदायक शक्तीला रोखण्यासाठीही छायाचित्र ४ मध्ये दाखवल्याप्रमाणे केलेल्या मुद्रेचा उपयोग करता येतो. त्या वेळी भूमीतून येणारी त्रासदायक शक्ती भूमीच्या दिशेने असलेला तळहात आणि नामजप यांद्वारे अडवली जाते.
४ आ. आपल्या समोरून आपल्यावर येणारी त्रासदायक शक्ती अडवता येणे, तसेच आपल्या समोर असलेला त्रासदायक शक्तीचा पडदा दूर करता येणे : कधी कधी वाईट शक्ती आपल्या समोरून आपल्यावर त्रासदायक शक्ती सोडत असतात. तसेच कधी कधी वाईट शक्तींनी आपल्या समोर त्रासदायक शक्तीचा पडदा निर्माण केलेला असतो. अशा दोन्ही वेळी ‘दोन्ही तळहातांच्या एकत्रित मुद्रे’चा उपयोग होतो. तेव्हा ‘आपल्या एका हाताचा तळवा आपल्या दिशेने येईल आणि दुसर्या हाताचा तळवा आपल्या समोरच्या दिशेने येईल’ अशा तर्हेने ती मुद्रा करावी (छायाचित्र ५ पहा), तसेच आवश्यक तो नामजप करावा. त्या वेळी आपल्या शरिराला हलकेपणा जाणवेपर्यंत हा उपाय करावा.
गुरुकृपेनेच शरिरावरील आवरण काढण्याच्या या पद्धतींचा शोध लागला. यासाठी आम्ही साधक श्री गुरूंच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो.’
– (सद़्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (९.७.२०२३)
|