पन्हाळगड-पावनखिंड मार्गावर शिवभक्तांसाठी सुसज्ज निवास व्यवस्था उभारणार ! – डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार, शिवसेना
पन्हाळा (जिल्हा कोल्हापूर) – ३५० वर्षांपूर्वी घडलेला पराक्रमी इतिहास अनुभवण्यासाठी देशभरातून सहस्रो युवा वर्ग पन्हाळगड-पावनखिंड वारीत भर पावसात सहभागी होत असतात. या शिवभक्तांची ठिकठिकाणी रहाण्याच्या सुसज्ज व्यवस्थेसह विकास आराखडा तातडीने मार्गी लावला जाईल, अशी माहिती शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली. पन्हाळगड-पावनखिंड विकास आराखड्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली असल्याचेही त्यांनी सांगितले. ‘शिवराष्ट्र परिवार’ महाराष्ट्रच्या वतीने आयोजित पन्हाळगड पावनखिंड मोहिमेच्या उद़्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी आज पन्हाळगड ते विशाळगड दरम्यान असणाऱ्या पावनखिंडीत अराजकीय स्वरूपाची पदयात्रा केली.पन्हाळगड, आंबेवाडी, पांढरेपाणी तसेच भातळी येथे सुसज्ज असे दोन मजली सभागृह बांधले जाईल असे आश्वासन डॉ श्रीकांत शिंदे यांनी दिले.@DrSEShinde pic.twitter.com/Awsj4EME3V
— श्रीकांत सोबत युवा (@Youth4Shrikant) July 15, 2023
या वेळी नरवीर बाजीप्रभु देशपांडे यांच्या पुतळ्याचे आणि वीर शिवा काशिद यांच्या समाधीचे पूजन झाले. या प्रसंगी राज्य नियोजन महामंडळाचे अध्यक्ष श्री. राजेश क्षीरसागर म्हणाले, ‘‘शिवराष्ट्र परिवाराने गेल्या ३० वर्षांपासून हा इतिहास जगभर पोचवला आहे. शिवभक्तांना लवकरात लवकर पावनखिंड मार्गावर मुक्कामाची सुसज्ज व्यवस्था उभा केली जाईल.’’ या प्रसंगी मुख्यमंत्री वैद्यकीयचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी मनोगत व्यक्त केले, तसेच शिवराष्ट्र परिवाराचे अध्यक्ष प्रशांत साळुंखे यांनी पावनखिंड मोहिमेचा उद्देश स्पष्ट केला.
या मोहिमेत वीर रायाजी बांदल यांचे वंशज अनिकेत बांदल, सेनापती कान्होजी जेधे यांचे वंशज इंद्रजित जेधे, मोहीमप्रमुख गणेश कदम, विनायक जरांडे, शुभम चौगुले, अभिजित पवार, अतुल कापटे यांच्यासह देशभरातून ७०० हून अधिक तरुण मोहिमेत सहभागी झाले आहेत.