धैर्य, चिकाटी आणि प्रेमभाव अशा अनेक गुणांचा समुच्चय असणार्या आणि ६१ आध्यात्मिक पातळी असलेल्या अस्नोडा (गोवा) येथे रहाणार्या कै. (श्रीमती) किशोरी रामा चोडणकर (वय ८६ वर्षे)
कै. (श्रीमती) किशोरी रामा चोडणकर (वय ८६ वर्षे) यांचे ६.७.२०२३ या दिवशी देहावसान झाले. आज (१७ जुलै या दिवशी) त्यांच्या निधनानंतरचा १२ वा दिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्या मुलाला जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
१. श्री. गोविंद चोडणकर (कै. (श्रीमती) किशोरी यांचा मुलगा), अस्नोडा, गोवा.
१ अ. पतीच्या मृत्यूनंतर ८ मुलांचे संगोपन करण्यासाठी खंबीरपणे उभी रहाणे : ‘कै. (श्रीमती) किशोरी चोडणकर यांचे मोठे कुटुंब आहे. पाच मुलगे आणि तीन मुली, असे मिळून आम्ही आठ भावंडे आहोत. भावांमध्ये मी सर्वांत मोठा असून माझ्याहून मोठ्या तीन बहिणी आहेत. आमचे बाबा असतांना केवळ एका बहिणीचेच लग्न झालेले होते. मी आठवीत असतांना माझ्या वडिलांचे निधन झाले. त्यामुळे ‘एवढ्या सार्या कुटुंबाचे संगोपन कसे करायचे ?’, असा मोठा प्रश्न आईसमोर होता, तरीसुद्धा ती डगमगली नाही. बाबा असतांना ती कधीच समाजामध्ये मिसळली नव्हती.
१ आ. अशिक्षित असूनही गावागावांमध्ये वस्तू विकून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवणे : अशिक्षित असूनही मोठ्या धैर्याने ती घराबाहेर पडली. ती नारळ, केरसुण्या, झाडू, सुंभाच्या दोर्या वगैरे विकायची. गोव्यात गावागावात एक एक दिवस बाजाराचा ठरलेला असतो. त्याप्रमाणे सोमवारी साखळी, मंगळवारी अस्नोडा, बुधवारी डिचोली, शनिवारी भेडशी, असे करून ती मोठ्या चिकाटीने उदरनिर्वाहासाठी बाहेर पडायची.
१ इ. तोंडी अचूक हिशोब करणे : आम्ही एरव्ही आता आधुनिक शिक्षणाच्या नावाखाली व्यवस्थापन शिकतो; पण खरं व्यवस्थापन मला आईकडून शिकायला मिळायचे. ती पदरी शिक्षण नसतांना बाजारात व्यवहार करायची. सगळा हिशोब तोंडी करायची. ती आम्हाला जेव्हा हिशोब करायला सांगायची, तेव्हा बर्याच वेळा आम्ही चुकायचो किंवा आम्हाला हिशोब करायला वेळ लागायचा. आम्ही सांगण्याआधी ती अमुक पैसे झाले; म्हणून आधीच सांगायची.
१ ई. पहाटे ३ पासून खडतर दिनक्रम असणे : पहाटे ३ – ४ वाजता उठायची. स्वतःचे वैयक्तिक सगळे आवरून झाल्यानंतर सगळ्या मुलांसाठी पोळ्या आणि चहा करून ठेवायची. दुपारच्या जेवणाची अर्धी सिद्धता करून ती ६ वाजता बाजारात जात असे. जातांना कशीबशी एका हातात पिशवी, डोक्यावर नारळांची पिशवी आणि मग आमच्यापैकी कोणीतरी तिच्या साहाय्याला असायचा. हा तिचा दिनक्रम ठरलेला असायचा. त्याविना मासभराचे (महिन्याभराचे) सगळे नियोजन करणे, मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष देणे, घरातील रीतीरिवाज हे सगळे करता करता तिचे अर्धे अधिक आयुष्य कष्ट करण्यासाठीच गेले. तिने अपार कष्ट करून आम्हाला लहानाचे मोठे केले.
१ उ. मुलाला शिक्षणासाठी पाठिंबा देणे : आम्हा भावंडांपैकी शिक्षणात मीच एकटा हुशार असल्यामुळे तिने माझ्यामध्ये आत्मविश्वास निर्माण केला. काहीही झाले, तरी माझ्यामागे समर्थपणे उभी राहिली. ती मला म्हणाली, ‘‘तुला किती शिकायचे आहे, तेवढे तू शिक.’’ आईचा निर्धार बघून मीसुद्धा निश्चय केला. आईला थोडे साहाय्य करावे; म्हणून मी अकरावी शिकत असतांना दुपारच्या वेळेत शिकवण्या घेऊ लागलो. त्यानंतर रात्री जागून मी माझा अभ्यास करायचो. असे करून मी ‘फार्मसी’ पदवीचे शिक्षण घेतले. आई नसती, तर मी कदाचित एवढे शिकलो नसतो. तिने सर्वांना शिकवले. सर्वांची लग्न केली. हे सगळं करत असतांना कधीही तिने कुणाकडून साहाय्याची अपेक्षा केली नाही. मला नोकरी लागल्यानंतरही तिने बाजारात जाण्याचे बंद केले नाही.
१ ऊ. अनेक गुण असणे आणि अध्यात्मावर श्रद्धा असणे : एवढे मोठे कुटुंब चालवत असतांना आईकडून धैर्य, चिकाटी, आत्मविश्वास, सकारात्मकता, नीटनेटकेपणा, नियोजनकौशल्य, प्रेमभाव, नेतृत्वगुण इत्यादी सर्व गुण मला शिकायला मिळाले. त्याच जोडीला तिचा अध्यात्मावर तेवढाच विश्वास होता. पूर्वीपासूनच आमच्या घरात पारंपरिक देवधर्माचे कार्य पुष्कळ चालायचे. त्यामुळे ते थोडे संस्कार माझ्यावरसुद्धा झाले होते.
१ ए. मुलाचे लग्न झाल्यावर सूनेला मुलाच्या ‘साधनेमध्ये आडकाठी आणू नको’, असे सांगणे : मी प्रतिदिन सेवेसाठी बाहेर पडतो; म्हणून मला तिने कधीही अडवले नाही. ‘आपल्या घरातसुद्धा एक सत्संग चालू असला पाहिजे’, असा ती आग्रह धरायची. त्यामुळे आठवड्यातून एक दिवस आम्ही आमच्या घरातच सत्संग घायचो. माझे लग्न झाल्यानंतर माझ्या पत्नीला तिने सर्वांत आधी सूचना केली की, ‘तो जी सेवा आणि साधना करतो, ती त्याला करू दे. त्याला तू कधीही आडकाठी आणू नकोस.’
१ ऐ. मुलाकडून अपेक्षा नसणे : नोकरी लागल्यापासूनच मी प्रत्येक पगार आईकडे आणून द्यायचो. लग्न झाल्यानंतर आईने पगार पत्नीकडे द्यायला सांगितला. तेव्हा आईचे नेतृत्व बघून पत्नी म्हणाली, ‘‘हा संसार तुमच्या आईचाच आहे. त्यामुळे मी पगाराला हात लावणार नाही. जसे त्या करत आल्या आहेत, तसेच चालू राहू दे.’’ त्यामुळे लग्नानंतरही ती खर्या अर्थाने सर्वांचीच ‘आई’ झाली.
१ ओ. हळूहळू शारीरिक स्थिती खालावत जाणे, त्या वेळी घरातील प्रत्येकाने आईची सेवा करणे : वयाची ८० वर्षे झाल्यानंतर तिच्या ‘शरीर साथ देत नाही’, हे लक्षात आले. तेव्हा तिने बाजारला जायचे बंद केले. त्यानंतर तिला चालतासुद्धा येत नव्हते; म्हणून तिला आम्ही चाकाची आसंदी (‘व्हिल चेअर’) आणून दिली. पुढे मग हळूहळू तिला स्वतःच्या हाताने जेवतासुद्धा येत नव्हते. तेव्हा घरातील सर्व जण तिला भरवायचे. वैशिष्ट्य म्हणजे पाचही सुनासुद्धा तिला आळीपाळीने भरवायच्या. तिने आयुष्यभर आमच्यासाठी केलेल्या कष्टाची परतफेड, तर आम्ही करू शकत नव्हतो; पण सर्वांच्याच मनात तिच्याविषयी कृतज्ञता होती; म्हणूनच तिच्या आजारपणाच्या पाच वर्षांत सर्वांनीच तिची मनोभावे सेवा केली. अगदी नातवंडांनीसुद्धा तिची सेवा केली. शेवटच्या क्षणीसुद्धा तिला कुटुंबातील प्रत्येकाची काळजी असायची.
६.७.२०२३ या दिवशी सकाळी ती चाकाच्या आसंदीत (‘व्हिल चेअर’) बसलेली असतांनाच तिने चहा प्यायला. त्यानंतर २ मिनिटांनी तिचा मृत्यू झाला. तो दिवस म्हणजे चातुर्मासातील संकष्ट चतुर्थी होती. आईच्या चरणी कितीही कृतज्ञता व्यक्त करावी, तेवढी थोडीच आहे. ‘आईच्या पवित्र आत्म्यास शांती लाभो’, हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे.’
२. श्री. प्रशांत चणेकर, डिचोली, गोवा.
२ अ. देवावर श्रद्धा ठेवून कठीण परिस्थितीला सामोरे जाणे : ‘तरुण वयात आपल्या पतीच्या निधनानंतर आलेल्या कठीण परिस्थितीला स्विकारून त्या सामोर्या गेल्या आणि खंबीरपणे संसाराचे दायित्व स्वतःच्या खांद्यावर पेलले. व्यवसायाच्या समवेत त्यांचे आपल्या संसारावरही तितकेच लक्ष असायचे. अशी तारेवरची कसरत करत देवावर श्रद्धा ठेवून त्यांनी आपल्या मुलामुलींना मोठे केले.
२ आ. ‘आईंनी साहित्य विक्री करण्याच्या आपल्या खास शैलीने प्रत्येक गावात आपला असा एक खास ग्राहक वर्ग निर्माण केला होता.
२ इ. स्वतःमधील अनेक गुणांमुळे समाजासमोर आदर्श असणे : प्रामाणिकपणा, अविरत कठोर परिश्रम, प्रेमभाव, सातत्य, शिस्तबद्धपणा अशा अनेक गुणांनी आटोकाट भरलेल्या श्रीमती चोडणकर यांनी आपले हे गुण आपल्या मुलांमधेसुद्धा रुजवले. त्यांनी आपल्या कर्तुत्वाने समाजासमोर एक आदर्श निर्माण केला.’
(वरील सूत्रांचा दिनांक १२.७.२०२३)
३. सौ. सुषमा नाईक (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
३ अ. साधनेत येण्यापूर्वीपासूनच ओळख असून पुढे जवळीक होणे : ‘आम्ही एकाच गावात रहात असल्यामुळे कै. (श्रीमती) किशोरी रामा चोडणकर यांची (बायची) आणि माझी ओळख होती. त्यानंतर श्री. गोंविद चोडणकर यांच्या मार्गदर्शनामुळे मी साधनेत आले. त्यांच्या घरी ‘सत्संग घेणे किंवा अभ्यासवर्ग घेणे’, असे संस्थेचे वेगवेगळे दिनक्रम चालू असायचे. त्यामुळे माझे सतत त्यांच्या घरी येणे-जाणे असायचे. त्या वेळी बाय (श्रीमती किशोरी चोडणकर) आमची आपुलकीने चौकशी करायची.
३ आ. वाईट शक्तींचा त्रास असतांना आध्यात्मिक उपाय केल्यावर त्रास न्यून होत असणे : लहानपणी वाईट शक्तींच्या त्रासामुळे मला वाईट शक्ती दिसायची आणि रात्री वाईट स्वप्नेही पडायची. त्या वेळी माझी आई मला बायकडे घेऊन जायची. बाय मला विभूती द्यायची आणि ती विभूती खाल्ल्यावर अन् कपाळाला लावल्यावर आम्हाला बरे वाटून माझा त्रास न्यून व्हायचा.
३ इ. त्यांच्या घरी सनातन संस्थेचे कार्य चालू असून त्यांचा कार्याला पाठिंबा असणे : त्यांचे घर आमच्यासाठी छोटेसे सेवाकेंद्रच होते. त्यांच्या घरी प्रतिदिन दैनिक ‘सनातन प्रभात’ आणि आठवड्याचे साप्ताहिक ‘सनातन प्रभात’ही यायचे. ‘सनातन संस्थेचे कार्य त्यांच्या घरी चालायचे’, याबाबत बायला चांगले वाटायचे. एखादे पत्रक किंवा पावती आम्हाला मिळत नसल्यास बायला आम्ही हक्काने विचारायचो आणि बाय आम्हाला ते शोधूनही द्यायची. तिचा सनातन संस्थेच्या कार्याला आणि आम्हाला पाठिंबा असायचा.
मी रामनाथी आश्रमात सेवेला असायचे. त्या वेळी बाय आजारी असल्यामुळे आम्ही त्यांनाही आवर्जून भेटायचो. त्या स्थितीतही ती माझी प्रेमाने विचारपूस करायची.
३ ई. ‘देवाप्रती असलेल्या श्रद्धेमुळे त्यांचे आजारपण आनंदात गेले’, असे वाटणे : आम्ही त्यांच्या घरी गेल्यावर सतत देवतांची पूजा किंवा इतर धार्मिक कार्य होत असे. ‘बायमध्ये देवाप्रती असलेल्या श्रद्धेमुळे तिचे आजारपण आनंदात गेले’, असे मला वाटते. ती आजारी असतांनाही ‘सतत देवाच्या अनुसंधानात आहे’, असे मला जाणवायचे.’
(१४.७.२०२३)
|