रझाकारांनी केलेल्या हिंदूंच्या नरसंहारावर आधारित ‘रझाकार – द सायलेंट जेनोसाइड ऑफ हैद्राबाद’ चित्रपटाचे भित्तीपत्रक प्रसारित !
(रझाकार – द सायलेंट जेनोसाइड ऑफ हैद्राबाद म्हणजे रझाकारांनी (निझामच्या कट्टरतावादी मुसलमान सैनिकांनी) हैद्राबादमध्ये केलेला नरसंहार !)
भाग्यनगर (तेलंगाणा) – ‘रझाकार – द सायलेंट जेनोसाइड ऑफ हैद्राबाद’ या आगामी चित्रपटाचे भित्तीपत्रक प्रसारित करण्यात आले आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून निझामशाहीच्या काळात रझाकारांनी हिंदूंच्या विरोधात केलेल्या नरसंहाराचे चित्रण करण्यात आले आहे. १५ जुलै या दिवशी या भित्तीपत्रकाचे अनावरण भाजपचे माजी तेलंगाणा अध्यक्ष आणि खासदार बंदी संजय कुमार यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी भाजपचे अन्य नेते आणि महाराष्ट्राचे माजी राज्यपाल सी. विद्यासागर राव हेही उपस्थित होते.
सौजन्य मना स्टार
या भित्तीपत्रकामध्ये ‘एका ब्राह्मण हिंदूला उभ्या बंदुकीच्या पुढे लावलेल्या चाकूवर लटकवल्याचे दाखवण्यात आले आहे. चाकू पाठीतून घुसून पोटातून बाहेर आल्याचे आणि सर्वत्र रक्त पसरल्याचे या भित्तीपत्रकात दिसत आहे. तसेच दोन्ही बाजूला काही घोडे दिसत असून काही लोकही तेथे उभे आहेत. ते बहुदा रझाकारांचे सैनिक असल्याचे सांगण्यात येत आहे.
१. या चित्रपटाचे निर्देशक हे भाजपचे नेते गुडुर नारायण रेड्डी आहेत. या चित्रपटाच्या संदर्भात ते म्हणाले की, हा चित्रपट धार्मिक संघर्षावर आधारित नाही, तसेच कुणामध्येही असंतोष निर्माण करण्यासाठीही बनवण्यात आलेला नाही.
२. चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक यता सत्यनारायण म्हणाले की, मुक्तीच्या संघर्षाने प्रेरित असलेला हा चित्रपट असून ८०० विरांची ही गोष्ट आहे. या चित्रपटातून हैद्राबादच्या मुक्तीविषयीचे चित्रण करण्यात आले आहे. जर आपण रझाकारांवर आधारित चित्रपट पहात नसू, तर आपल्या जीवनाला कोणताच अर्थ नाही !
येणार्या पिढ्यांना रझाकारांचा इतिहास ठाऊक असणे आवश्यक ! – सी. विद्यासागर राव, महाराष्ट्राचे माजी राज्यपालमहाराष्ट्राचे माजी राज्यपाल सी. विद्यासागर राव या प्रसंगी म्हणाले की, निझामाच्या राजवटीखाली असलेल्या तत्कालीन हैद्राबाद प्रांतातील भूभागामध्ये आजच्या तेलंगाणा, कर्नाटक आणि महाराष्ट्र या राज्यांतील जिल्ह्यांचा समावेश होता. ब्रिटीश सरकारला सर्वांचा मिळून एक देश बनवण्याचा निर्णय घेतला होता, तर निझामने एका स्वतंत्र राज्याची घोषणा केली होती. यासाठी निझामने २ लाख मुसलमानांचे एक सशक्त रझाकारी सैन्य बनवले होते. त्या वेळी मोठ्या प्रमाणात हिंसाचार करण्यात आला. आपल्या देशाला मिळालेल्या स्वातंत्र्यानंतर १७ मासांनी हैद्राबादला स्वातंत्र्य मिळाले. इस्लाम आणि रझाकार वेगवेगळे आहेत. येणार्या पिढ्यांना हा इतिहास माहिती असणे आवश्यक आहे ! |
जाणून घ्या रझाकारांचा संक्षिप्त हिंदुद्वेष्टा इतिहास !भारताच्या स्वातंत्र्याच्या वेळी हैद्राबाद प्रांताला स्वतंत्र इस्लामी राष्ट्र बनवण्यासाठी रझाकरांचे सैन्य उभारण्यात आले होते. रझाकारांनी बहुसंख्य हिंदूंना लक्ष्य करण्यास आरंभ केला. अनेक हिंदूंची हत्या करण्यात आली. सहस्रावधी महिलांवर बलात्कार करण्यात आले. हैद्राबादचा भारतामध्ये विलय करण्याची जो कुणी मागणी करत असे, त्याच्यावर आक्रमण केले जाई. त्यामुळे कट्टरतावादी मुसलमान रझाकार आणि हिंदू यांच्यामध्ये संघर्ष होऊ लागला. हैद्राबादमध्ये हिंदूंना रहाणे कठीण झाले होते. शेवटी १३ सप्टेंबर १९४८ या दिवशी तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री वल्लभभाई पटेल यांच्या आदेशाखाली ‘ऑपरेशन पोलो’ला अनुमती देण्यात आली. यांतर्गत हैद्राबाद प्रांतात ५ दिवस सैनिकी कारवाई करण्यात आली. यामध्ये १ सहस्र ३७३ रझाकारी आणि निझामाचे ८०७ सैनिक यांना ठार करण्यात आले. यामध्ये भारतीय सैन्याचेही ६६ सैनिक हुतात्मा झाले. शेवटी हैद्राबादचा भारतामध्ये विलय करण्यात आला. |