नागभूमीमध्ये (नागालँडमध्ये) साधूंना प्रतिबंध करणारा ‘नेहरू-एल्विन’ राष्ट्रघातकी करार मोडित काढणे आवश्यक !
‘विदेशातून विविध धर्मांचे लोक हिंदुस्थानात येतात. ‘हिंदुस्थानातील वनवासी क्षेत्रातील लोकांच्या जीवनाचा अभ्यास करण्याच्या हेतूने आपण आलो आहोत’, असे भासवले जाते. ‘या अभ्यासकांचा अंत:स्थ हेतू अभ्यास करण्याचा नसून वनवासी भागांतील जनतेचे धर्मांतर करणे’, हा असतो. असाच हेतू मनात ठेवून वर्ष १९२७ मध्ये मानवशास्त्री वेरियर एल्विन हिंदुस्थानात आला. मानवशास्त्र म्हणजे मानवाची संस्कृती, अनुवंशिकता, मानवी समाजाचे वैज्ञानिक आणि समाजशास्त्रीय दृष्टीकोनातून केलेले अध्ययन. या विषयात एल्विन याने ‘विद्यावाचस्पती’ (डॉक्टरेट) ही पदवी संपादन केली. तो हिंदुस्थानात आला आणि त्याने आपल्या विषयाचा अभ्यास करण्यासाठी नागभूमीची निवड केली. ज्ञान संपादनासाठी आलेला हा मानवशास्त्री ढोंगी आणि लबाड होता.
हिंदुस्थानात येताच ३७ वर्षांच्या एल्विनची वासनामय दृष्टी एका १३ वर्षांच्या कौसल्या नावाच्या वनवासी क्षेत्रातील गोंड जमातीतील कोवळ्या मुलीवर पडली. त्याने तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले आणि त्यामुळे ती मुलगी तिच्या वयाच्या १४ वर्षी माता झाली. त्याने या कौसल्याचे नाव पालटून ‘कोसी’ ठेवले. तिच्याशी त्याने विवाह केला. काही दिवसांनी तिला न सांगताच त्याने घटस्फोट घेतला. प्रारंभी त्याने तिला दरमहा २५ रुपये दिले. त्यानंतर त्याची वक्रदृष्टी लीला नावाच्या दुसर्या एका वनवासी मुलीवर पडली. त्याने तिच्याशी विवाह केला आणि तो शिलाँग (मेघालय) येथे स्थायिक झाला. ‘हिंदुस्थानची ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि धार्मिक ओळख नष्ट करणे’, हाच वेरियर एल्विनचा प्रधान हेतू होता. हे त्यानेच लिहिलेल्या ‘मिथ्स ऑफ मिडल इंडिया’ या त्याच्या पुस्तकात स्पष्ट केले आहे.
१. हिंदु संस्कृती नष्ट करण्यासाठी नागाभूमीत साधूंना प्रतिबंध
हिंदुस्थानातील बैरागी (साधू) गावागावांत फिरतात आणि तेथील लोकांना आपली संस्कृती, इतिहास आणि आपला धर्म यांचा परिचय करून देतात. अशा प्रकारे हिंदु संस्कृती, धर्म आणि हिंदूंचा इतिहास पूर्वी टिकवला जात होता. ही गोष्ट मिशनरी एल्विन याने हेरली. ‘हिंदु संस्कृती नष्ट करायची असेल, तर वनवासी क्षेत्रात फिरणार्या या बैराग्यांना येथे येण्यास प्रतिबंध केला पाहिजे, तरच आपला हेतू साध्य होईल’, हे त्याने जाणले. हा त्याचा हेतू साध्य करण्यासाठीच त्याने हिंदुस्थान स्वतंत्र झाल्यावर तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्याशी करार केला.
२. नेहरूंकडून वेरियर एल्विन याची ईशान्य भारतात ‘सल्लागार’ म्हणून नियुक्ती
ईशान्य हिंदुस्थान ख्रिस्त्यांच्या राष्ट्रघातकी कार्यामुळे तेथील समाजाची ‘हिंदु’ ओळख हळूहळू धूसर होऊ लागली. हे कळत असूनही नेहरूंनी हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यानंतर ईशान्य भारतात ‘सल्लागार’ म्हणून वेरियर एल्विन याची नियुक्ती केली.
३. ईशान्य भारतातील सर्व समस्यांचे मूळ म्हणजे नेहरू-एल्विन करार !
हिंदु धर्म आणि संस्कृती यांची वाताहत लावणारा एल्विन हा नेहरूंच्या गळ्यातील ताईत होता. येथील विचारवंतांनीसुद्धा या समाजकंटकाला डोक्यावर घेतले. अभ्यासाच्या नावाखाली हिंदुस्थानातील हिंदूंची संख्या घटवण्याचे काम ज्याने केले, त्याच्या विरोधात कोणतीही कारवाई झाली नाही. आज ईशान्य भारतात निर्माण झालेल्या सर्व समस्यांचे मूळ वेरियर एल्विनशी नेहरूंनी केलेल्या करारात आहे. या करारामुळेच एल्विनला हिंदूंचे धर्मांतर करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य मिळाले.
मुळातच हिंदु असलेल्या वनवासी लोकांना बळाने हिंदु करण्यात येत असल्याची आवई मिशनर्यांच्या वतीने उठवण्यात आली. त्या विरोधात हिंदुस्थान सरकारने योग्य वेळी कारवाई केली असती, तर आज ज्या समस्या भेडसावत आहेत, त्या अस्तित्वातच आल्या नसत्या.
४. संपूर्ण हिंदु समाज आणि हिंदु धर्म नष्ट करण्याचे षड्यंत्र
मिशनर्यांच्या विरोधात कारवाई न करता त्यांच्याशी करार करून ‘आपल्याच हिंदु लोकांना देशातील विविध भागांत जाता येणार नाही’, असे करार करून निर्बंध घालण्यात आले. याचा अर्थ ‘हा देश हिंदूंचा राहू नये; म्हणून प्रयत्न करण्यात आला होता का ?’, अशी शंका मनात येते. ‘हिंदूंना त्यांची भूमी राहू नये, हिंदु धर्म नष्ट व्हावा, सर्व हिंदूंना ख्रिस्ती किंवा मुसलमान धर्मात धर्मांतरित करून संपूर्ण हिंदूच नष्ट करण्याचे हे षड्यंत्र आहे का ? अशी शंका मनात दृढ होण्यास या घटना साहाय्य करतात’, असे म्हणावे लागते.
ज्याप्रमाणे आरंभी ज्यू धर्माच्या लोकांना त्यांच्या भूमीपासून वंचित ठेवण्यात आले, त्याप्रमाणे ‘हिंदूंना त्यांची हक्काची भूमी राहू नये, यासाठी हा प्रयत्न केला जात आहे का ?’, असा प्रश्न मनात निर्माण होतो.
५. नेहरूंना दिलेली ‘पंडित’ उपाधी कुचकामी
स्वतंत्र देशाच्या भूमीत एखादा परकीय येऊन तेथील लोकांना त्यांच्याच भूमीतील काही भागांत प्रवेश नाकारण्यात यावा; म्हणून देशाचा पंतप्रधान करार करत असेल, तर ‘त्या पंतप्रधानांना सुयोग्य प्रकारे राज्यकारभार कसा करतात ? याचे ज्ञान आहे’, असे म्हणता येत नाही. अशा पंतप्रधानांना ‘पंडित’ ही दिलेली उपाधी कुचकामी ठरते.
६. नेहरू-एल्विन करारामुळे धर्मांतरासाठी अमर्याद स्वातंत्र्य बहाल
सगळ्यात विचित्र गोष्ट, म्हणजे ‘संचार स्वातंत्र्य’ हा राज्यघटनेने दिलेला मूलभूत अधिकार आहे. या मूलभूत अधिकाराच्या चिंधड्या उडवून नेहरूंनी मिशनर्यांच्या धर्मांतराच्या कार्यात अडथळा येऊ नये; म्हणून हिंदूंनाच तिथे जाण्यास प्रतिबंध करण्यात आला. अशा प्रकारचा प्रतिबंध हिंदूंच्या व्यतिरिक्त अन्य कोणत्याही धर्मियांना करण्यात आला नाही. वास्तविक कोणत्याही सरकारला अशा प्रकारचा करार कुणाशीही करण्याची अनुमती राज्यघटना देत नाही. अशा प्रकारचे करार केल्यामुळेच ख्रिस्ती आणि मुसलमान यांना मोकळे रान मिळाले. त्यांना त्यांच्या त्यांच्या धर्मियांची लोकसंख्या वाढवण्यासाठी धर्मांतर करण्याची अनुमती देऊन अमर्याद स्वातंत्र्य बहाल करण्यात आले. त्यामुळेच हिंदुस्थानची तेवढी भूमी स्वतःची असूनही स्वतःची राहिली नाही.
७. राष्ट्राचे सार्वभौमत्व आणि स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी कठोर पावले उचलणे क्रमप्राप्त !
असे राष्ट्रघातकी करार मोडित काढले पाहिजेत. राज्यघटनेत केलेली अशी राष्ट्रघातक प्रावधाने घटनेतून हद्दपार करणे आवश्यक आहे. ‘राष्ट्राचे सार्वभौमत्व आणि स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी कठोर पावले उचलणे क्रमप्राप्त आहे, अन्यथा आपल्या देशाचे छोटे छोटे तुकडे पडून हिंदूंना त्यांची स्वतंत्र भूमीच रहाणार नाही’, अशी परिस्थिती निर्माण होईल.
– श्री. दुर्गेश जयवंत परुळकर, हिंदुत्वनिष्ठ व्याख्याते आणि लेखक, डोंबिवली. (७.७.२०२३)
नागभूमीत साधूंना प्रवेश करू न देण्यासाठी नेहरू आणि एल्विन यांच्यात करार
ईशान्य हिंदुस्थानातील आसाम, अरुणाचल प्रदेश, मेघालय, मिझोराम, मणीपूर, नागभूमी (नागालँड) आणि त्रिपुरा या ७ राज्यांना हे मिशनरी ‘७ कन्या’ म्हणून संबोधतात. ही ७ राज्ये हिंदुस्थानपासून तोडण्याचे काम मिशनरी करत आहेत. नागभूमीत साधूंना प्रवेश करता येऊ नये, यासाठी नेहरू आणि एल्विन यांच्यात करार झाला. याविषयीचे ‘वृत्त पेट्रिअट’ या वृत्तपत्राच्या १५ ऑक्टोबर १९६४ या दिवशीच्या अंकात प्रसिद्ध झाले. (वृत्तपत्रातील बातमीचे कात्रण बाजूला पहाणे) या करारामुळे तेथील हिंदु जनतेला ख्रिस्ती धर्माची दीक्षा देण्याचे कार्य ख्रिस्ती मिशनर्यांना मुक्तपणे करता आले. या धर्मांतरामुळे वर्ष २०११ च्या जनगणनेत नागभूमीत तेथील एकूण लोकसंख्येच्या ८८ टक्के ख्रिस्त्यांची लोकसंख्या असल्याचे निदर्शनास आले. हिंदूंना ख्रिस्ती धर्माची दीक्षा दिल्यामुळेच ख्रिस्त्यांची लोकसंख्या ८८ टक्क्यांपर्यंत वाढली.
वेरियर एल्विन याला ‘पद्मश्री’ आणि त्याच्या आत्मकथेला ‘साहित्य अकादमी’चा पुरस्कार
हिंदु धर्म, संस्कृती आणि हिंदु राष्ट्र यांच्या मुळावर घाव घालणार्या अन् वासनांध असलेल्या वेरियर एल्विन याला ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. वनवासी संस्कृतीला वंचित आणि अपमानित करणार्या एल्विनच्या आत्मकथेला ‘साहित्य अकादमी’चा पुरस्कार देण्यात आला.
– श्री. दुर्गेश जयवंत परुळकर
संपादकीय भूमिकानागालँडमध्ये साधूंना प्रवेश करण्यासाठी बंदी असणारा करार अद्यापही अस्तित्वात असणे आतापर्यंतच्या सर्व सरकारांना लज्जास्पद ! |