नियमांचे उल्लंघन केल्यामुळे ‘महाराष्ट्र परिचर्या परिषदे’चे विसर्जन !
मुंबई – मनुष्यबळ आणि वित्तीय साधने यांचा अपव्यय, तसेच अन्य शासकीय नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी राज्यशासनाने ‘महाराष्ट्र परिचर्या परिषद’ तडकाफडकी विसर्जित केली आहे. नव्याने स्थापना होईपर्यंत या परिषदेवर ‘प्रशासक’ म्हणून जे.जे. रुग्णालयातील साहाय्यक प्राध्यापक डॉ. अनंत शिनगारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
राष्ट्रीय पातळीवर नोंदणी करण्याऐवजी महाराष्ट्र परिचर्या परिषदेने परिचारिकांची नोंदणी स्वतंत्रपणे राबवली. ७ सप्टेंबर २०२२ या दिवशी परिषदेने प्रभारी प्रबंधकाचा कार्यभार काढून त्या जागी कंत्राटी प्रबंधकांची नियुक्ती केली. प्रभारी प्रबंधकांनी दिलेल्या उपप्रबंधक पदाचे त्यागपत्र शासनाला न कळवताच स्वीकारले. शासनाची पूर्वअनुमती न घेता ३० सप्टेंबर २०२२ या दिवशी भरतीसाठी परिषदेने विज्ञापन प्रसिद्ध केले. भरतीप्रक्रिया थांबवण्याऐवजी परिषदेने त्याकडे दुर्लक्ष केले. या प्रकरणी परिषदेने दिलेले स्पष्टीकरण सरकारला मान्य झाले नाही. उपप्रबंधकांकडे प्रबंधक पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला होता; मात्र त्यांची नियुक्ती रहित करून परिषदेने नियमबाह्यपणे कंत्राटी पद्धतीने प्रबंधकाची नियुक्ती केली. असे अनेक ठपके महाराष्ट्र परिचर्या परिषदेवर ठेवण्यात आले आहेत.