२२ लाख रुपये बुडण्याच्या धास्तीने लाडगाव (छत्रपती संभाजीनगर) येथील शेतकर्याची आत्महत्या !
आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेतील २०० कोटी रुपयांच्या घोटाळ्याचे प्रकरण
छत्रपती संभाजीनगर – २०० कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणी वादग्रस्त ठरलेल्या ‘आदर्श नागरी सहकारी पतसंस्थे’तील आपल्या कुटुंबियांची २२ लाख रुपयांची ठेव बुडाल्याच्या भीतीने रामेश्वर इथर (वय ३८ वर्षे) या तरुण शेतकर्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना लाडगाव (तालुका छत्रपती संभाजीनगर) येथे घडली. या पतसंस्थेवर आता प्रशासक नेमण्याची सिद्धता सहकार खात्याने चालू केली आहे.
रामेश्वर यांनी मुलगी अश्विनी हिचे शिक्षण आणि विवाह यांसाठी काही रक्कम जमा केली होती. लाडगावपासून जवळच करमाड येथे आदर्श पतसंस्थेची शाखा आहे. तिथे रामेश्वर यांचे वडील नारायण यांच्या नावे ८ लाख ५० सहस्र रुपये, आई कासाबाई यांच्या नावे ९ लाख रुपये आणि मुलगी अश्विनी हिच्या नावे ५ लाख रुपयांच्या ठेवी ठेवल्या होत्या. ही एकूण रक्कम २२ लाख ५० सहस्र रुपये आहे. घोटाळा उघड होताच रामेश्वर अस्वस्थ झाले होते.
संचालकांकडून होणार वसुली !
जिल्हा उपनिबंधकांनी एम्.पी.डी. अंतर्गत संचालक, कर्मचारी आणि अधिकारी यांच्यावर गुन्हे नोंद केले आहेत. यात जामीन मिळणे कठीण आहे, तसेच कलम ८८ नुसार दोषी संचालक, अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकडून वसुली केली जाईल. एका मासात ही सर्व प्रक्रिया पूर्ण होईल, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक डॉ. मुकेश बारहाते यांनी दिली.