राज्यघटनात्मक आणि धर्माधिष्ठित ‘हिंदु राष्ट्र’ स्थापन करण्याचा संकल्प करा !
सनातन संस्थेच्या गुरुपौर्णिमेमध्ये धर्मप्रचारक सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी केलेले मार्गदर्शन
३ जुलै २०२३ या दिवशी सनातन संस्थेच्या वतीने देशभरात गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने सनातन संस्थेचे धर्मप्रचारक सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी जिज्ञासूंना केलेले मार्गदर्शन येथे देत आहोत. ९ जुलै २०२३ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘गुरुपौर्णिमेचे महत्त्व, राज्यघटनात्मक हिंदु राष्ट्राची आवश्यकता आणि सांप्रत काळातील सत्-असत् लढा अन् हिंदु धर्मावरील आघात’, यांविषयीची सूची वाचली. आज या मार्गदर्शनाचा अंतिम भाग येथे देत आहोत.
भाग १ : https://sanatanprabhat.org/marathi/699625.html
३. सांप्रत काळातील सत्-असत् लढा आणि हिंदु धर्मावरील आघात
३ आ. भूमी हडपणारा ‘वक्फ कायदा’ : आज एकीकडे सरकारीकरण झालेल्या मंदिरांच्या भूमी हडप होत असतांना दुसरीकडे ‘वक्फ ॲक्ट’सारख्या कायद्यांच्या माध्यमातून वक्फ बोर्डाच्या मालकीच्या भूमीमध्ये दिवसेंदिवस वाढत होत आहे. याचे कारण या कायद्याच्या माध्यमातून वक्फ कायद्याला दिलेले अमर्याद अधिकार ! वक्फ कायद्यानुसार वक्फ बोर्डाला ‘कोणत्याही व्यक्तीची मालमत्ता वक्फची आहे’, असे घोषित करण्याचा अधिकार आहे. गेल्या १० वर्षांत वक्फ बोर्डाने अतिशय झपाट्याने इतरांच्या भूमी बळकावून त्यांना ‘वक्फ मालमत्ता’ म्हणून घोषित केले आहे. देशातील सुमारे ८ लाख एकर भूमी वक्फ बोर्डाच्या अधिपत्याखाली आहे. भारतीय रेल्वे आणि सैन्य यांच्यानंतर वक्फ बोर्डाकडे देशातील सर्वाधिक भूमीची मालकी आहे.
३ इ. लव्ह जिहाद : पूर्वी वासनांध धर्मांध हिंदु महिलांच्या अब्रूवर हात घालायचे. आज लव्ह जिहादच्या माध्यमातून तेच घडत आहे. हिंदु मुलींना खोट्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवले जाते, कधी हिंदु नावे धारण करून मुली-महिला यांची फसवणूक केली जाते, त्यांचा उपभोग घेतला जातो आणि नंतर त्यांना वार्यावर सोडले जाते किंवा त्यांचे तुकडे तुकडे केले जातात. काही मासांपूर्वी आफताबने ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये रहात असतांना श्रद्धा वालकर नावाच्या हिंदु तरुणीची हत्या करून तिचे ३५ तुकडे केल्याची घटना उघडकीला आली होती. साक्षी दीक्षित, रूपाली चंदनशिवे, अनुराधा, अशी ही न संपणारी यादी आहे. ज्या देशात एका स्त्रीच्या चारित्र्यरक्षणासाठी धर्मयुद्ध झाले, त्या देशात लाखोंच्या संख्येने स्त्रिया, लहान मुली, वृद्ध महिला यांची विटंबना होणे, यापेक्षा दुर्दैव कोणते ? आज याविषयी जागृती होण्याची, तसेच अशा प्रकारची एकही घटना भविष्यात घडू नये, यासाठी कृतीच्या स्तरावर प्रयत्न होण्याची आवश्यकता आहे. ‘द केरल स्टोरी’ ही आपल्या जिल्ह्याची स्टोरी (कहाणी) होऊ द्यायची नसेल, तर हिंदु मुलींना धर्मशिक्षण देणे, त्यांच्याकडून धर्माचरण करवून घेणे आवश्यक आहे. धर्मामुळे जागृती येते आणि देवाचे आशीर्वाद मिळतात. द्वापरयुगात द्रौपदीवरही वस्त्रहरणाचा प्रसंग ओढवला होता; पण द्रौपदी श्रीकृष्णाची परमभक्त असल्याने तिने श्रीकृष्णाला आळवल्यावर भगवान श्रीकृष्णाने अमर्यादित वस्त्र पुरवून तिचे लज्जारक्षण केले. धर्मावरील आघातांच्या विरोधात लढणे, हे आपले कर्तव्य आहे. अनुचित प्रसंगांचा सामना करण्यासाठी अशा प्रसंगांना सामोरे कसे जायचे, याचे महिलांना स्वसंरक्षण प्रशिक्षण मिळणे आवश्यक आहे.
३ ई. हलाल जिहाद : ‘लव्ह जिहाद’प्रमाणे आज ‘हलाल जिहाद’ही चालू आहे. हलाल ही संकल्पना केवळ मांसाशी संबंधित नाही, तर शाकाहारी खाद्यपदार्थ, सौंदर्यप्रसाधने, अगदी पूजोपयोगी वस्तू आदीही आज ‘हलाल सर्टिफाईड’ झाली आहेत. ‘हलाल प्रमाणपत्रा’च्या माध्यमातून जवळपास भारताच्या अर्थव्यवस्थेएवढे प्रचंड मोठी अर्थव्यवस्था उभी राहिली आहे. हलालची अनिवार्यता हिंदूंसाठी नाही. हिंदूंनी या ‘हलाल जिहाद’च्या विरोधात संघटित होऊन ‘हलाल प्रमाणपत्र’ बंद करण्याची मागणी करायला हवी, तसेच खरेदी करतांना सतर्क राहून हलाल प्रमाणित उत्पादने टाळायला हवीत.
३ उ. मुसलमानांची लोकसंख्यावाढ : आज येन केन प्रकारेण हिंदूंची लोकसंख्या न्यून करून अल्पसंख्यांकांची संख्या वाढवण्याचे प्रयत्न चालू आहेत. काही मासांपूर्वी भारताच्या स्वातंत्र्याच्या शतकमहोत्सवी वर्षापर्यंत म्हणजे वर्ष २०४७ पर्यंत भारताला ‘गझवा-ए-हिंद’ बनवण्याविषयीची धर्मांधांची ‘ब्लू प्रिंट’ पोलिसांच्या छापेमारीत सापडली होती. ‘ब्लू प्रिंट’ म्हणजे तपशीलवार, विस्तृत नियोजन ! भारताला पाकिस्तान बनवण्यासाठी आज मोठ्या प्रमाणात प्रयत्न होत आहेत; मात्र भारत हिंदु राष्ट्र घोषित होण्यासाठीचे हिंदूंचे प्रयत्न मात्र अपुरे आहेत. हिंदूंची तीर्थक्षेत्रे आज मुसलमानबहुल होत आहेत. हरिद्वार हे हिंदूंचे पवित्र तीर्थक्षेत्र आहे; पण हरिद्वारमध्ये मुसलमानांच्या लोकसंख्येत प्रत्येक १० वर्षांनी ४० टक्के वाढ होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हीच गती कायम राहिली, तर येत्या काही वर्षांतच हरिद्वारमध्ये हिंदु अल्पसंख्य होण्याचा धोका आहे.
हिंदूंच्या सणांच्या वेळी निघणार्या शोभायात्रांवर दगडफेकीच्या अनेक घटना घडल्याचे आपल्याला आठवत असेल. काही दिवसांपूर्वी कोल्हापूर, रत्नागिरी आदी शहरांमधील काही धर्मांधांनी शिवराज्याभिषेकाच्या दिवशीच औरंगजेबाचे उदात्तीकरण करणारी पोस्ट (लिखाण) त्यांच्या व्हॉट्स ॲपवर ठेवली होती. यापूर्वीही असे प्रकार घडले होते; पण कोल्हापूरमधील हिंदूंनी याला ठामपणे विरोध केला. राष्ट्र आणि धर्म विरोधी शक्तींना बहुधा पहिल्यांदाच अशा प्रकारे हिंदूंनी विरोध केला. हिंदूंच्या संघटनशक्तीमुळे पोलिसांना या प्रकरणी कारवाई करावी लागली. यातून संघटनशक्तीचे महत्त्व लक्षात येते. आक्रमकांचे खुलेआम उदात्तीकरण करण्याचे धाडस रोखायचे असेल आणि भारताचे राष्ट्रपुरुष, हिंदूंचे आराध्य असलेल्या धर्मपुरुषांकडे वाकडी नजर करून पहाण्याचे धाडसही कुणामध्ये निर्माण होऊ नये, असे वाटत असेल, तर भारताला हिंदु राष्ट्र घोषित करायला हवे.
४. साधनेद्वारे योग्य ‘स्व’बोध शक्य
सध्या हिंदु विचारक, तसेच अभ्यासक हिंदूंमध्ये ‘स्वबोध’ आणि ‘शत्रूबोध’ या संकल्पनांविषयी चर्चा चालू आहे. स्वबोध म्हणजे स्वतःविषयीचा बोध आणि शत्रूबोध म्हणजे शत्रूविषयीचा बोध ! ‘मी कोण आहे ?, माझे कर्तव्य काय आहे ?, माझी बलस्थाने काय आहेत ?, माझ्यातील उणिवा काय आहेत ?, त्या उणिवांवर मात करण्यासाठी मी कसे प्रयत्न करायचे आहेत ?’, आदींविषयीची जाणीव म्हणजे स्वबोध. स्वबोधामुळे व्यक्तीला तिची खरी ओळख होते. पांडव हे योग्य स्वबोधाचे उत्तम उदाहरण आहे. पांडवांमध्ये धर्मपरायणता होती. आचरणात नम्रता होती. नीतीमत्ता होती. त्यागी वृत्ती होती. सत्ता किंवा राज्याची लालसा नव्हती. कौरवांविषयी द्वेषभावना नव्हती. पांडवांनी धर्ममर्यादांचे पालन केले. त्यांनी भगवान श्रीकृष्णाची महती जाणली होती. या सर्वांमुळे पांडव हे योग्य स्वबोधाचे उदाहरण ठरते. तसेच भगवान श्रीकृष्णाने त्यांना उत्तमरित्या शत्रूबोध शिकवला. द्रोणाचार्य, कर्ण आणि दुर्योधन यांच्या वधाच्या प्रसंगी नीती-नियमांपेक्षा अधर्माचे आचरण करणार्या शत्रूंचा नाश करणे आवश्यक आहे, याची उत्तम शिकवण त्यांनी दिली. त्यामुळे धर्म-अधर्माच्या लढ्यात आपल्याला योग्य स्वबोध आणि शत्रूबोध होणे आवश्यक आहे, नाहीतर धर्ममार्गावरील आपला प्रवास भरकटू शकतो. योग्य तो बोध होण्यासाठी धर्माचरण अर्थात् साधनाच आवश्यक आहे.
५. धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्र
५ अ. धर्मशिक्षण घेणे आणि धर्माचरण करणे : गेल्या काही दशकांमध्ये हिंदूंची श्रद्धास्थाने आणि आस्था-परंपरा यांवर आघात केले गेले. ‘जे जे परकीय, ते ते चांगले आणि जे जे भारतीय, ते ते त्याज्य’, अशी भावना जनमानसामध्ये रुजवण्याचा प्रयत्न केला गेला. परिणामस्वरूप, जन्माने हिंदु; पण विचार, कृती, भावना यांनी अहिंदु असलेल्या पिढ्या निर्माण झाल्या. ‘द केरल स्टोरी’ या चित्रपटात मुसलमान मुलगी हिंदु देवतांच्या संदर्भात अनेक प्रश्न विचारून तिच्या हिंदु मैत्रिणींचा बुद्धीभेद करते, असे दाखवण्यात आले आहे. उदाहरणार्थ, ज्या रामाला सीतेची मुक्तता करण्यासाठी वानरांचे साहाय्य लागते, तो राम देव कसा ? श्रीकृष्ण देव असेल, तर त्याच्या १६ सहस्र स्त्रिया कशा ? हिंदूंमध्ये ३३ कोटी देव का ? आजही बहुतांश हिंदूंना या प्रश्नांची उत्तरे ठाऊक नसतील. याचे कारण म्हणजे धर्मशिक्षणाचा अभाव ! मुसलमान लहानपणापासून कुराण वाचतात, ख्रिस्ती बायबल वाचतात; पण हिंदू रामायण-महाभारत वाचत नाहीत. त्यामुळे कुणी धर्माविषयी, देवतांविषयी काही प्रश्न विचारले, तर त्यांना लगेच हिंदु धर्माविषयी प्रश्न निर्माण होतात. त्यांची धर्मश्रद्धा डळमळीत होते.
यज्ञयागांचे राक्षसांपासून रक्षण करण्यासाठी विश्वामित्र ऋषि श्रीराम बाल्यावस्थेत असतांनाच त्यांना घेऊन गेले होते. बालक अवस्थेतील श्रीरामांनी त्या वेळी बलाढ्य राक्षसांचा वध करून यज्ञयागांचे रक्षण केले होते. बाल्यावस्थेत श्रीरामांनी एवढा पराक्रम गाजवला होता. यावरून लक्षात येते, रावणाचा वध करून सीतेची मुक्तता करण्याचे प्रभु श्रीरामांचे एकट्याचे सामर्थ्य होते; पण त्यांनी वानरांचे साहाय्य घेतले, ते वानरसेनेला अवतारी कार्यात सहभागी करून घेण्यासाठी ! वानरांकडून सेवा आणि धर्मकार्य करवून घेण्यासाठी ! श्रीकृष्णाने नरकासुराच्या बंदिवानातून सोडवून १६ सहस्र राजकन्यांशी विवाह केला, तो या राजकन्या समाजातून धिक्कारल्या जाऊ नयेत किंवा अपमानित होऊ नयेत आणि त्यांना समाजात प्रतिष्ठा मिळावी म्हणून. कृष्णाने जेव्हा गोपींसह रासलीला केली, तेव्हा श्रीकृष्ण केवळ ७ वर्षांचा होता. वयाच्या १२ व्या वर्षी श्रीकृष्ण गोकुळ सोडून मथुरेला गेला, तो आयुष्यात पुन्हा कधीही वृंदावनात आला नाही. श्रीकृष्ण साक्षात् भगवंताचा अवतार असल्याने तो एकाच वेळी १६ सहस्र स्त्रियांसह, प्रत्येक गोपीसह असायचा. वासनायुक्त प्रेम आणि भक्ती, अतार्किक घटना आणि लीला यांमध्ये भेद आहे. तो जाणून घेण्यासाठी सत्संगतीत राहून शास्त्रांचे अध्ययन करावे लागते. साधना करावी लागते. हिंदूंमध्ये ३३ कोटी देवता आहेत. प्रत्येक देवतेचे कार्य आणि वैशिष्ट्य वेगळे आहे. उदाहरणार्थ, बुद्धीची देवता गणपति, विद्येची देवता सरस्वती, धनाची देवता लक्ष्मी, बलोपासनेची देवता हनुमंत अशा प्रकारे विशिष्ट कार्यासाठी विशिष्ट देवता आहेत. हे हिंदु धर्माचे दुबळेपण नाही, तर वैशिष्ट्य आहे. जसे सरकार चालवण्यासाठी वेगवेगळे मंत्री असतात, तसेच ब्रह्मांड चालवण्यासाठी या देवता असतात. हे सगळे ठाऊक असण्यासाठी, तसेच विरोधकांकडून उपस्थित केल्या जाणार्या प्रश्नांची उत्तरे देता येण्यासाठी धर्मशिक्षण असणे, धर्माचा अभ्यास असणे आवश्यक आहे.
महान हिंदु धर्मात जन्म होऊनही आपण जर त्याची अनुभूती घेण्यात अल्प पडलो, तर आपल्यासारखे करंटे आपणच असू. असे होऊ नये; म्हणून धर्म काय सांगतो ? हे जाणून घ्या. त्यासाठी सनातन संस्था साप्ताहिक ‘ऑनलाईन सत्संगा’द्वारे अध्यात्माचे शिक्षण देण्याचे कार्य करते. ज्यांना अध्यात्म आणि धर्म शिकण्याची इच्छा असेल, त्यांनी अवश्य या सत्संगाला उपस्थित रहावे.
एखादी व्यक्ती हिंदु आहे, हे कशावरून ठरते ? केवळ जन्मावरून कि आचरणावरून ? तर अर्थात् आचरणावरून !
जन्महिंदुपेक्षा कर्महिंदु असणे अधिक महत्त्वाचे आहे. हिंदु धर्मामध्ये ३६५ दिवसांपैकी साधारण १५० दिवस काहीतरी सण-उत्सव-व्रत-वैकल्ये असतात. हे धर्मशास्त्राप्रमाणे साजरे केले, तर कुटुंबियांवर धर्मसंस्कार होतील. धर्म आचारशील असतो. धर्माचरण केले, साधना केली, तरच खर्या अर्थाने धर्माचे आणि आपलेही रक्षण होते. साधनेमुळेच अंतरातील दिव्य ऊर्जा जागृत होऊन मनोबल वाढते आणि आत्मशक्ती जागृत होते. या दिव्यशक्तीच्या आधारे हिंदु धर्माचे अन् या देवभूमी भारताचे रक्षण सहजसुलभ होते, हे आपण लक्षात घेतले पाहिजे.
५ आ. साधना करून मनुष्यजन्माचे सार्थक करा ! : देवभूमी भारताचे रक्षण करायचे असेल, तर आपण साधना करणे आवश्यक आहे. साधना म्हणजे ईश्वरप्राप्तीसाठी प्रतिदिन करायचे प्रयत्न ! कलियुगात नामस्मरण ही साधना सांगितली आहे. साधनेच्या आरंभीच्या टप्प्याला आपण कुलदेवीचे नामस्मरण करायला हवे. कुलदेवता ही आपल्या कुळाचा उद्धार करणारी असते. तिच्या नामस्मरणातून आपली प्रगती झाली की, गुरु आपल्या जीवनात येतात. त्यानंतर श्री गुरु सांगतील, तो नामजप आपण करायला हवा. त्या जोडीला पूर्वजांच्या त्रासांपासून मुक्तीसाठी प्रतिदिन ‘श्री गुरुदेव दत्त’ हा नामजप करावा. तुम्ही जर आधीपासून कोणत्या उपास्यदेवतेचा किंवा संतांनी सांगितलेला जप करत असाल किंवा तुम्हाला एखाद्या जपामुळे अनुभूती आल्या असतील, तर तोच जप चालू ठेवा.
६. आषाढ पौर्णिमेचे महत्त्व वैज्ञानिक स्तरावरही सिद्ध
आज वैज्ञानिक स्तरावरही आषाढ पौर्णिमेचे महत्त्व सिद्ध झाले आहे. ‘विस्डम ऑफ ईस्ट’ या पुस्तकाचे लेखक आर्थर चार्ल्स स्टोक यांनी त्यांच्या पुस्तकात याविषयी उल्लेख केला आहे. स्टोक यांनी आषाढ पौर्णिमेच्या संदर्भात अध्ययन आणि संशोधन केले. त्या प्रयोगांमधून त्यांना असे आढळून आले की, आषाढ पौर्णिमेला पडणार्या सूर्यकिरणांमुळे व्यक्तीचे शरीर आणि मन यांवर सकारात्मक परिणाम होतो. साधकाची भूक, झोप, मनाचे इतस्ततः भटकणे न्यून होते. ही स्थिती साधकाच्या साधनेच्या दृष्टीने पूरक आहे.
७. धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्र स्थापण्यासाठी झोकून देऊन कार्य करण्याचा दृढसंकल्प करा !
थोडक्यात आषाढ पौर्णिमा, म्हणजे गुरुपौर्णिमा हा दिवस साधनेच्या दृष्टीनेही चांगला असल्याचे वैज्ञानिकदृष्ट्याही दिसून येते. आपणही गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने धर्माचरण-साधना करण्याचा, उपासनेचे बळ वाढवण्याचा, तसेच धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासाठी झोकून देऊन कार्य करण्याचा दृढसंकल्प करूया. ज्याप्रमाणे रात्रीनंतर होणारा सूर्याेदय कुणी रोखू शकत नाही, त्याप्रमाणे कालमहिम्यानुसार होणारी धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची स्थापनाही कुणी रोखू शकत नाही. आपल्या अंतरंगात, तसेच राष्ट्रीय जीवनात धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासाठी श्रीगुरूंनी आपल्याला भक्ती, बुद्धी आणि सामर्थ्य प्रदान करावे, हीच प्रार्थना !
– (सद्गुरु) नंदकुमार जाधव, धर्मप्रचारक, सनातन संस्था.