हिंदुत्वाच्या अपप्रचाराच्या विरोधातील बौद्धिक लढ्यात सहभागी व्हा !
-
सूर्य उगवला की, अंधार नाहीसा होतो, त्याप्रमाणे हिंदु धर्माचे ज्ञान प्रसारित केल्यास त्याविषयी होणारा अपप्रचार रोखता येईल !
-
वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवात ‘हिंदु धर्माची शकले पाडणार्यांचे प्रयत्न हाणून पाडण्याची आवश्यकता !’, या विषयावर केलेले उद्बोधन
जिथे राज्य आहे, तिथे ते बळकावण्यासाठी युद्ध हे असणारच ! भारतासारख्या जागतिक स्तरावरील प्राचीन आणि प्रचंड साधनसंपन्न देशावर नियंत्रण मिळवण्यासाठी, राज्य करण्यासाठी सहस्रो वर्षे प्रयत्न चालू आहेत. त्यात इस्लामी क्रूर आक्रमणे, इंग्रज-पोर्तुगीज आदी ख्रिस्त्यांची व्यापाराच्या नावे राज्यनियंत्रण यांचा अनुभव आपण घेतला आहेच. ‘साम-दाम-दंड-भेद’, या नीतीचा वापर करून भारताला गुलाम बनवण्याचा प्रयत्न त्यांनी केला. यात साम्यवाद्यांचाही समावेश केला पाहिजे; कारण चीनमधील साम्यवादी (कम्युनिस्ट) सत्ता भारताच्या विरोधात प्रचंड शक्तीचा वापर करत आहे. जगभरात ज्या ज्या देशांत साम्यवाद्यांनी सत्ता बळकावली, ती रक्तरंजित क्रांती करूनच बळकावली आहे. भारतातही नक्षलवादी चळवळीच्या माध्यमातून त्यांनी प्रयत्न करून पाहिला; मात्र त्याला मर्यादा असल्याने त्यांनी आता कूटनीतीचा वापर चालू केला आहे. या आक्रमकांनी आता एकत्र येऊन मानसिक आणि बौद्धिक स्तरावरील युद्धनीतीचा वापर चालू केला आहे. शत्रू बाहेरचा असल्यास त्याच्याशी लढण्यास सैन्य सक्षम आहे; मात्र येथे आपल्याच घरातील सदस्याला शत्रू बनवले जात असेल, तर याला प्रत्युत्तर देण्याची क्षमता आपल्यात निर्माण करण्याची आवश्यकता आहे.
९ जुलै २०२३ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘शैक्षणिक संस्थांमध्ये दलितांवरील अत्याचारांच्या नावे हिंदुत्वनिष्ठांना लक्ष्य’ याविषयीची सूत्रे वाचली. आज या लेखाचा अंतिम भाग येथे देत आहोत.
भाग १ : https://sanatanprabhat.org/marathi/699671.html
२. ‘जय भीम-जय मीम (एम्.आय.एम्.-ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन )’च्या एकत्रिकरणातील फोलपणा !
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी इस्लामच्या आक्रमकतेच्या आणि फाळणीच्या वेळी झालेल्या अत्याचारांच्या संदर्भात अतिशय स्पष्ट शब्दांत लिहिले आहे. त्यांनी म्हटले आहे, ‘इस्लाम विभाजनवादी आहे. तो मनुष्याला मुसलमान आणि गैर-मुसलमान अशा दोन गटांत विभाजित करतो. इस्लाममधील बंधुत्व हे वैश्विक बंधुत्व नसून मुसलमानांचे केवळ मुसलमानांच्याच संदर्भात असणारे बंधुत्व आहे आणि त्यात गैर-मुसलमानांच्या संदर्भात केवळ द्वेषच असतो.’ इतकी स्पष्ट भूमिका त्यांनी व्यक्त केलेली असूनही आजचे स्वतःला आंबेडकरवादी म्हणवणारे सर्वच नेते इस्लामच्या मतपेढीसाठी त्यांच्या या शिकवणीकडे दुर्लक्ष करून मुसलमानांची ‘हांजी, हांजी’ करतांना दिसतात. त्यातूनच दिल्या जाणार्या ‘जय भीम-जय मीम’च्या घोषणा केवळ हिंदूंमध्ये फूट पाडण्यासाठीच दिल्या जात आहेत, हे लक्षात घ्यायला हवे. वर्ष २०२२ मध्ये नगर जिल्ह्यातील भिंगार येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीवर काही धर्मांध मुसलमानांनी आक्रमण केले होते. त्या वेळी दोन्ही गटांमध्ये हाणामारी आणि दगडफेकही झाली; परंतु साम्यवादी आणि निधर्मीवादी त्या संदर्भात एक-दुसर्याच्या विरोधात कोणतेही वक्तव्य न करता मूग गिळून शांत बसले.
अफगाणिस्तानात बामियानच्या ऐतिहासिक बुद्ध मूर्ती तालिबान्यांनी फोडल्या; मात्र त्या संदर्भात कोणतीही बौद्ध-आंबेडकरवादी संघटना बोलत नाही. आज पाकिस्तानमध्ये हिंदूंवर, तसेच हिंदु दलितांवर मोठ्या प्रमाणात अत्याचार होत आहेत. हिंदु महिलांचे-मुलींचे अपहरण करणे, त्यांच्यावर बलात्कार करणे, त्यांना बळजोरीने इस्लाम धर्म ‘कबूल’ (मान्य) करायला भाग पाडणे, या घटना नित्याच्या झाल्या आहेत. पाकिस्तानमधील मानवाधिकार संघटनांनीही याविषयी आवाज उठवून पाकिस्तानात अल्पसंख्यांकांवर अन्याय-अत्याचार होत असल्याचा अहवाल दिला आहे; पण याविषयी भारतातील आंबेडकरवादी-पेरियारवादी संघटना चकार शब्द काढत नाहीत. भारतात स्वतःला शोषित-वंचित म्हणवून घेणारे घटक पाकिस्तानात अल्पसंख्य हिंदु दलितांवर होणार्या अत्याचारांच्या संदर्भात आरोप करण्यापासून मात्र स्वतःला वंचित ठेवतात.
थोडक्यात ‘जय भीम-जय मीम’चे नारे दिले जातात; पण ते केवळ राजकीय असून ‘मीम’ला कधीच ‘भीम’शी देणे-घेणे नाही, हेच यातून दिसून येते.
३. ‘ब्राह्मण विरोधात आंबेडकरवादी’ असा वाद पेटवण्याचे षड्यंत्र
पुण्यातील कोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीच्या वेळी राष्ट्रीय पातळीवरील षड्यंत्र रचून त्यात हेतूपुरस्सर श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी, तसेच समस्त हिंदु आघाडीचे श्री. मिलिंद एकबोटे यांचे नाव घेण्यात आले. त्यातून राज्यातील ब्राह्मणांना लक्ष्य करण्याचे आणि ‘ब्राह्मण विरोधात आंबेडकरवादी’ असा वाद पेटवण्याचे त्यांचे षड्यंत्र होते. पू. भिडेगुरुजी यांनी दगडफेक केल्याचे सांगितले; पण प्रत्यक्षात पू. भिडेगुरुजी घटनास्थळी उपस्थितच नव्हते. या प्रकरणी दबाव निर्माण करून पू. भिडेगुरुजी यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला. प्रत्यक्षात त्या प्रकरणात पू. भिडेगुरुजींचा सहभाग नसल्याचे समोर आले. तेव्हा हिंदुद्रोही राजकीय पक्षांनी क्षमायाचना करण्याचे सौजन्यही दाखवले नाही.
हिंदु धर्माला लक्ष्य करतांना ब्राह्मणवादावर टीका केली जाते. ‘ब्राह्मणवाद म्हणजे मनुवाद, मनुवादी वृत्ती’, असे हिणवले जाते; पण प्रत्यक्षात मनुस्मृती लिहिणारे महर्षि मनु ब्राह्मण नव्हते, तर क्षत्रिय होते.
४. पाकिस्तानातून भ्रमनिरास होऊन भारतात परतलेले जोगेंद्रनाथ मंडल !
आज हिंदू आणि ब्राह्मण यांना शिव्या देणार्या आंबेडकरवाद्यांनी या संदर्भात जोगेंद्रनाथ मंडल यांचे उदाहरण लक्षात घेतले पाहिजे. भारताच्या फाळणीची मागणी करतांना त्या काळी अशाच प्रकारे ‘जय भीम-जय मीम’चे स्वप्न दाखवण्यात आले होते. त्यामुळे पाकिस्तानमध्ये दलितांचे भविष्य उज्ज्वल असेल, असे मानून त्या काळातील दलित नेते आणि डॉ. आंबेडकरांचे सहकारी जोगेंद्रनाथ मंडल यांनी मुस्लिम लीगला पाठिंबा दिला. ते दलित कार्यकर्त्यांसोबत पाकिस्तानात गेले आणि स्वतंत्र पाकिस्तानचे पहिले कायदामंत्री बनले. त्यांना पाकिस्तानच्या संविधान सभेच्या पहिल्या अधिवेशनाच्या अध्यक्षपदाचे दायित्व मिळाले; पण ते एका दिवसापुरतेच. दुसर्या दिवशीच महंमद अली जिना यांची संविधान सभेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. पाकिस्तानात दलितांवर मोठ्या प्रमाणात अन्याय-अत्याचार चालू झाले. जोगेंद्रनाथ मंडल जे स्वप्न रंगवून पाकिस्तानात गेले होते, ते स्वप्न पूर्ण होण्याची सुतरामही शक्यता नाही, असे लक्षात आल्यानंतर २-३ वर्षांतच जोगेंद्रनाथ मंडल यांना त्यागपत्र देऊन अखेर पुन्हा भारतात यावे लागले. त्यांच्यासह पाकिस्तानात गेलेल्या सामान्य दलित कार्यकर्त्यांना मात्र परतणे इतके सोपे नसल्याने तेथेच अडकून पडावे लागले.
‘जय भीम-जय मीम’चे नारे देत मुसलमानांच्या गळ्यात गळे घालून फिरणार्या आंबेडकरवाद्यांना याविषयी काय म्हणायचे आहे ? केवळ हिंदु धर्माला विरोध करण्यासाठी, हिंदूंमध्ये फूट पाडण्यासाठी आणि भारताच्या विरोधातील षड्यंत्रात त्यांचा हत्यार म्हणून वापर करण्यात येत आहे, हे त्यांनी लक्षात घ्यायला हवे. किमान त्यांच्या नेत्यांच्या प्रत्यक्ष अनुभवावरून तरी शिकायला हवे.
५. फुटीरतावादाचा परिणाम राष्ट्रद्रोह !
फुटीरतावादात फसलेले काही शीख आज वेगळ्या खलिस्तानची मागणी करत आहेत. फुटीरतावादाचे पेरलेले बीज कसे अंकुरते, ते यातून दिसून येते. मॅक्स आर्थर मॅकऑलिफ या ब्रिटीश अधिकार्याने भारतात फुटीरतावादाचे विष पेरले. ‘एशियाटिक सोसायटी’ने वर्ष १८६४ मध्ये हा मॅक्स नावाचा माणूस पंजाब प्रांतात पाठवला. त्यांनी उपायुक्त पदावर ३० वर्षे काम केले. पंजाबमध्ये गेल्यानंतर त्यांनी प्रथम शीख धर्म स्वीकारण्याची घोषणा केली आणि स्वतःचे नाव पालटून मॅक्स सिंग असे ठेवले. डोक्यावर शीख पगडी घालून शिखांमध्ये राहून त्यांनी समाजात आदराचे स्थान प्रस्थापित केले आणि नंतर ‘शीख धर्म हा हिंदु धर्मापेक्षा वेगळा आहे’, हे तत्त्व प्रस्थापित केले.
वर्ष १८७१ मध्ये जेव्हा पहिली जनगणना झाली, तेव्हा सर्व शिखांनी ते हिंदु असल्याचे नोंदवले; परंतु नंतरच्या जनगणनेत हिंदूंची संख्या न्यून नोंदवली गेली आणि शिखांची संख्या अधिक नोंदवली गेली. ब्रिटिशांनीच पहिल्यांदा जनगणनेत शीख धर्म म्हणून वेगळी योजना केली. आज पंजाबमध्ये बहुसंख्य शीख समुदाय स्वतःला हिंदु मानत नाहीत. इतकेच काय, तर आता खलिस्तानचा भस्मासुर त्यांनी उभा केला आहे. ते हिंदु नेत्यांच्या हत्या करत आहेत. हिंदूंच्या मंदिरांना लक्ष्य केले जात आहे. भारताच्या विरोधात जागतिक स्तरावर आंदोलने करून पुन्हा एकदा भारताचे तुकडे करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशा प्रकारे फुटीरतावादाचा परिणाम राष्ट्रद्रोहामध्ये होतो; म्हणून फुटीरतावादाची कीड वेळीच ठेचणे आवश्यक आहे.
६. अन्य आक्रमणे
अशाच प्रकारे आर्य आक्रमणाचा तथाकथित सिद्धांत मांडून आर्य आणि द्रविड यांच्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न चालू आहे. दक्षिण भारतातील राजकीय पक्ष आणि काही संघटना स्वतःला हिंदू नसल्याचे घोषित करत आहेत. त्याच प्रकारे पूर्व-ईशान्य भारतातील आदिवासी जमातींना भडकावून त्यांना हिंदु धर्मापासून तोडले जात आहे. आदिवासींकडून वेगळ्या प्रदेशांची मागणी केली जात आहे. त्यातूनच मणीपूरसारखे राज्य आज जळत आहे. भारतात अशा प्रकारे अंतर्गत युद्ध चालू राहिल्यास देशाच्या विरोधातील शत्रूंना ती एक चांगली संधी म्हणून उपलब्ध होऊ शकते.
७. उपाययोजना
या पार्श्वभूमीवर फुटीरतावादाच्या विषवल्लीपासून हिंदु समाजाला वाचवण्यासाठी हिंदु विरोधकांच्या अपप्रचाराचे खंडण करणे, हिंदु धर्माचा प्रसार-प्रचार करणे आवश्यक आहे. हिंदु समाज धर्मशिक्षणापासून वंचित राहिल्याने धर्माविषयी केल्या जाणार्या खोट्या प्रचारात तो फसतो. जसे सूर्य उगवला की, अंधार नाहीसा होतो, त्याप्रमाणे हिंदु धर्माचे ज्ञान प्रसारित झाले, तर धर्माविषयी केल्या जाणार्या चुकीच्या प्रचाराला तो फसणार नाही. त्यामुळे हिंदूंनी धर्मशिक्षण घेणे महत्त्वाचे आहे. त्या जोडीला जे विचारवंत, अभ्यासक आहेत, त्यांनी धर्माविषयी होणार्या अपप्रचारांचे खंडण करणे आणि त्याचा व्यापक स्तरावर प्रसार होणे आवश्यक आहे.
– श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती (१.६.२०२३)