जेजुरी (पुणे) येथील ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रम मंत्री येणार नसल्याने रहित झाल्यामुळे प्रशासनाचे २ कोटी रुपये वाया !
या पैशांचे दायित्व कुणाकडे ?
जेजुरी (जिल्हा पुणे) – ३ वेळा कार्यक्रमाचा दिनांक पालटूनही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे उपस्थित राहू न शकल्याने पुरंदर जिल्ह्यातील जेजुरी येथे १३ जुलै या दिवशीचा ‘शासन आपल्या दारी’ हा कार्यक्रम अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी जिल्हा प्रशासनाकडून जय्यत सिद्धता करण्यात आली होती. त्यासाठी दीड ते २ कोटी रुपये व्यय करण्यात आले होते. अचानक कार्यक्रम रहित केल्याने प्रशासनाचे २ कोटी रुपये वाया गेले आहेत.
#शासन_आपल्या_दारी अभियानांतर्गत जेजुरी येथे १३ जुलै रोजी आयोजित करण्यात आलेला पंडित दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळावा प्रशासकीय कारणास्तव रद्द करण्यात आला आहे. महारोजगार मेळाव्याची पुढील तारीख यथावकाश कळविण्यात येईल. सहायक आयुक्त एस. बी. मोहिते
— DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE (@Info_Pune) July 12, 2023
याविषयी १२ जुलै या दिवशी दुपारी मंत्रालयातून जिल्हा प्रशासनाला पत्राद्वारे कळवण्यात आले. त्यामध्ये कार्यक्रम पुढे ढकलण्याची कारणे स्पष्ट देण्यात आली नाहीत. विविध शासकीय योजनांचा लाभ एकाच ठिकाणी मिळावा, या उद्देशाने ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. जिल्ह्यातील १३ तालुक्यांच्या तहसीलदारांना २५ सहस्र लाभार्थी घेऊन येण्याचे उद्दिष्ट दिले होते.