चातुर्मासाच्या निमित्ताने श्री सांस्कृतिक भवन येथे आज कलश स्थापना ! – विजय पाटील, प्रतिमा विद्या प्रतिष्ठान
कोल्हापूर – जैन धर्मियांचे पवित्र पर्व चातुर्मास २ जुलैपासून चालू झाले आहे. या निमित्ताने आचार्य भगवान श्री विद्यासागरजी महाराज यांचे परमप्रभावक शिष्य प.पू. १०८ निर्यापक श्रमण मुनीश्री नियमसागरजी महाराज आर्.के.नगर येथील आदिनाथ दिगंबर जैन येथे उपस्थित आहेत. तरी त्यांच्या प्रमुख उपस्थितीत १६ जुलैला श्री सांस्कृतिक भवन, आर्.के.नगर येथे दुपारी १ वाजता चातुर्मास कलश स्थापना करण्यात येणार आहे, अशी माहिती ‘प्रतिमा विद्या प्रतिष्ठान’चे अध्यक्ष श्री. विजय पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. या प्रसंगी उपाध्यक्ष श्री. सुरेश भोजकर, कार्याध्यक्ष श्री. अमर मार्ले उपस्थित होते.
श्री. विजय पाटील पुढे म्हणाले, ‘‘चातुर्मास काळात जैन मुनी एका ठिकाणी राहून तप-साधना करतात. वरील कार्यक्रमात मुख्य कलशासमवेत ९ कलशांची स्थापना होणार आहे. त्याचसमवेत सर्व श्रावकांसाठी सामान्य कलशांची स्थापना होणार आहे. तरी सर्व श्रावक-भाविक यांनी उपस्थित राहून पुण्यसंपादन करावे, असे आवाहन प्रतिष्ठानच्या वतीने आम्ही करत आहोत.’’
या प्रसंगी प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. विजय पाटील म्हणाले, ‘‘कर्नाटकात जैन मुनी १०८ कामकुमारनंदी महाराज यांची हत्या करण्यात आली. या हत्येचा आम्ही निषेध करतो. यापुढील काळात जैन मुनींना, तसेच कोल्हापुरातही जैन मुनींना शासनाने पोलीस संरक्षण उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी आम्ही करतो.’’ |