समान नागरी कायद्याच्या विरोधात विधी आयोगाला संदेश पाठवण्यासाठी मशिदीबाहेर लावण्यात आले ‘बार कोड’ !

मशिदीबाहेर लावण्यात आले ‘बार कोड’

नवी देहली – भारतात समान नागरी कायदा करण्याविषयी केंद्र सरकारच्या विधी आयोगाकडून सूचना मागवण्यात आल्या होत्या. त्याला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. ६० लाखांहून अधिक जणांनी त्यांचे अभिप्राय पाठवल्याची माहिती आहे. या कायद्याला मुसलमान संघटनांकडून विरोध केला जात आहे. या पार्श्‍वभूमीर काही ठिकाणी मशिदीबाहेर विशेष ‘बार कोड’ असलेले फलक लावून त्याद्वारे विधी आयोगाकडे विरोध नोंदवण्यासाठी आवाहन करण्यात आल्याचे दिसून येत आहे. उत्तरप्रदेशातील बरेली, तसेच मुंबईसारख्या शहरातही तसे दिसून आले.

१. बरेली येथे जमियत उलेमा-ए-हिंदच्या कार्यकर्त्यांनी मशिदीबाहेर हा ‘बार कोड’ लावला आहे. मशिदीमध्ये नमाजपठण करण्यासाठी येणारे मुसलमान ‘बार कोड’ भ्रमणभाषद्वारे स्कॅन करून निषेधाचा संदेश पाठवत आहेत. येथील मुसलमानांचे म्हणणे आहे की, समान नागरी कायदा शरीयत कायद्याच्या विरोधात आहे. त्यामुळे मुसलमान तो सहन करणार नाहीत. मुसलमानांना स्वातंत्र्यापासूनच काही अधिकार मिळाले आहेत. त्याचे पालन आम्ही करत आहोत.

२. मुंबईच्या मालाडमधील पठाणवाडी येथील नूरानी मशिदीबाहेरही बार कोड लावून त्याद्वारे निषेधाचे संदेश पाठवले जात आहेत. याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक पोलिसांनी मशिदीच्या व्यवस्थापकांना चौकशीसाठी बोलावले होते. येथील माजी नगरसेवक अहमद जमाल यांनी सांगितले की, मुसलमानांना समान नागरी कायदा मान्य नाही.

संपादकीय भूमिका

किती हिंदू आणि त्यांच्या संघटना समान नागरी कायद्याला समर्थन देण्यासाठी अशा प्रकारचे प्रयत्न करत आहेत ?