सिंधुदुर्ग : दोडामार्ग तालुक्यातील रस्त्यांची दयनीय स्थिती
ग्रामस्थांची आंदोलनाची चेतावणी
दोडामार्ग – तालुक्यातील शिरवल नदी ते कोलझर नदी हा रस्ता आणि पडवे, माजगाव ते कुब्रंल या रस्त्यांची पावसामुळे दयनीय स्थिती झाली आहे. या रस्त्यांची त्वरित दुरुस्ती करावी, या मागणीसाठी ग्रामस्थांनी आंदोलन करण्याची चेतावणी दिली आहे.
शिरवल नदी ते कोलझर नदी या रस्त्यावर भले मोठे खड्डे पडले आहेत. यामुळे रस्त्यात खड्डे कि खड्ड्यात रस्ता ? हाच प्रश्न निर्माण होत आहे. या रस्त्यामुळे वाहनचालक, पादचारी, शालेय विद्यार्थी, तसेच दिव्यांग वयोवृद्ध यांना या रस्त्यावरून प्रवास करतांना त्रास सहन करावा लागतो. या त्रासाला कंटाळून दिव्यांग संघटना अध्यक्ष साबजी उमाकांत देसाई यांनी जिल्हा परिषद बांधकाम विभागाला ‘रस्ताबंद’ आंदोलन करण्याची चेतावणी दिली आहे.
दुसर्या घटनेत पावसाळ्यापूर्वी २० लाख रुपये खर्च करून खडीकरण आणि डांबरीकरण करण्यात आलेला पडवे, माजगाव ते कुंब्रल हा रस्ता खड्डेमय बनला आहे. त्यामुळे ‘या रस्त्याची डागडुजी करण्यात यावी, अन्यथा आंदोलन करू’, अशी चेतावणी तेथील सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र सावंत यांनी बांधकाम विभागाला दिली आहे.