केंद्रीय आयुषमंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या हस्ते एकात्मिक आयुष उपचारपद्धती सेवांचे गोव्यात उद्घाटन

एकात्मिक आयुष उपचारपद्धती सेवा पुरवणारे गोवा हे देशातील पहिले केंद्र !

एकात्मिक आयुष उपचारपद्धती सेवांचे उद्घाटन करतांना केंद्रीय आयुषमंत्री सर्बानंद सोनोवाल, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, राज्यमंत्री श्रीपाद नाईक आणि इतर

पणजी, १४ जुलै (पसूका) – केंद्रीय आयुष मंत्रालयांतर्गत १४ जुलैला गोव्यात एकात्मिक आयुष उपचारपद्धतींचे केंद्रीय आयुषमंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय पर्यटन आणि बंदरे, नौवहन आणि जलमार्ग राज्यमंत्री श्रीपाद नाईक, राज्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे आदींची उपस्थिती होती.

देशात अशा प्रकारच्या एकात्मिक सुविधा देणारे गोवा हे पहिले केंद्र असल्याचे  केंद्रीय आयुषमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी सांगितले. पंतप्रधानांच्या दृष्टीकोनानुसार आयुष मंत्रालय देशाचे नाही, तर जगाचे आरोग्य सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने प्रयत्नरत आहे, असे सोनोवाल म्हणाले. गेल्या ९ वर्षांत स्वतंत्र आयुष मंत्रालय स्थापन करण्यापासून ते आंतरराष्ट्रीय योग दिनापर्यंत भारताच्या पारंपरिक उपचारपद्धतींना आज जगमान्यता मिळत आहे. सध्या आयुष बाजारपेठेचा विस्तार ४ लाख कोटी एवढा झाला असल्याची माहिती सोनोवाल यांनी दिली.

भारताने जगाला सर्वोत्तम उपचारपद्धती दिल्या आहेत. त्यामुळे जगात आयुषची विश्वासार्हता वाढली आहे. गोवा पर्यटन राज्य असल्यामुळे राज्यात एकात्मिक आयुष उपचारपद्धतींचा स्थानिकांबरोबरच पर्यटकांनाही लाभ होईल, अशी आशा केंद्रीय मंत्री सोनोवाल यांनी व्यक्त केली.

केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी याप्रसंगी बोलतांना गोव्यात एकात्मिक आयुष उपचारपद्धती दिल्याबद्दल आयुष मंत्रालयाचे आभार मानले. धारगळ, पेडणे येथे अखिल भारतीय आयुर्वेद संस्था आणि आता एकात्मिक आयुष उपचारपद्धती यांचा गोव्याच्या नागरिकांना नक्कीच लाभ होईल, असे ते म्हणाले.