गोवा सरकारने म्हादई अभयारण व्याघ्र क्षेत्र घोषित करावे ! – ‘म्हादई बचाव अभियान’
म्हादई जलवाटप तंटा
पणजी, १४ जुलै (वार्ता.) – गोवा सरकारने म्हादई अभयारण व्याघ्र संरक्षित क्षेत्र घोषित करावे, अशी मागणी ‘म्हादई बचाव अभियान’ने १४ जुलै या दिवशी येथे घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत केली. पत्रकार परिषदेला अभियानच्या अध्यक्षा तथा माजी वीजमंत्री निर्मला सावंत आणि प्रा. प्रजल साखरदांडे यांची उपस्थिती होती.
म्हादई नदीचे पाणी कर्नाटकने वळवू नये, यासाठी ‘म्हादई बचाव अभियान’ राज्यव्यापी आंदोलन छेडण्यात अग्रेसर आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या राज्य वन्यजीव मंडळाने म्हादई अभयारण्यासह अन्य परिसर व्याघ्र संरक्षित क्षेत्र घोषित करण्याचा राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाचा प्रस्ताव फेटाळला आहे. या पार्श्वभूमीवर ‘म्हादई बचाव अभियान’ने ही मागणी केली.
निर्मला सावंत पुढे म्हणाल्या, ‘‘गोवा सरकारने म्हादई अभयारण्य व्याघ्र संरक्षित क्षेत्र घोषित केल्यास म्हादई जलवाटप तंटा प्रकरणी न्यायालयात कर्नाटकच्या विरोधात आपली बाजू भक्कम झाली असती. या एकाच निर्णयाने म्हादई जलवाटप तंटासंबंधीचा प्रश्न पूर्णपणे निकालात निघाला असता, तसेच दीर्घ काळपर्यंत पश्चिम घाट संरक्षित राहिले असते. सरकारला याची चिंता नाही, असे वाटते. म्हादई अभयारण्य व्याघ्र संरक्षित क्षेत्र घोषित करण्याचा प्रस्ताव नाकारून मोठी चूक केली आहे. पर्यावरणाचे रक्षण केल्यास सर्व समस्या सुटू शकतात.’’
(सौजन्य : Goan Reporter News)
हे ही वाचा –
♦ राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या व्याघ्र प्रकल्प निकषात गोवा बसत नाही ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत |