राजूर घाटात (जिल्हा बुलढाणा) महिलेवर सामूहिक बलात्कार
पतीला मारहाण करून ४५ सहस्र लुटले
बुलढाणा – जिल्ह्यात मलकापूर राज्य मार्गावरील राजूर घाटातून खडकीकडे चाललेल्या एका दांपत्याला ८ जणांच्या टोळक्याने अडवून त्यांच्याकडून ४५ सहस्र रुपये लुटले. तसेच पतीला मारहाण करून ३५ वर्षीय पत्नीवर चाकूचा धाक दाखवून ८ जणांनी बलात्कार केला. याविषयीचा गुन्हा नोंद करण्यासाठी शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड पोलीस ठाण्यात पोचले तेव्हा त्यांना ३ घंटे पोलीस ठाण्यात थांबावे लागले. राजूर घाटात देवीच्या मंदिराच्या परिसरात हे दांपत्य थांबले होते. आरोपींपैकी एक घटनास्थळाच्या जवळच असलेल्या मोहेगावचा रहिवासी असल्याचे समजते. इतर ७ आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.
या संदर्भात पवार गटाचे रोहित पवार यांनी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर टीका केली आहे. ‘राज्यातील महिला आणि मुली यांची सुरक्षा करता येत नसेल, तर या सरकारला एक क्षणभरही सत्तेत रहाण्याचा अधिकार नाही’, असे त्यांनी म्हटले आहे.