भरपूर पावसानंतर अचानक काही दिवस कडक ऊन पडल्यास पुढील काळजी घ्यावी !
निरोगी जीवनासाठी आयुर्वेद : लेखांक २१५
‘काही वेळा पावसाळ्यात काही दिवस भरपूर पाऊस पडतो आणि नंतर अचानक काही दिवस कडक ऊन पडते. भरपूर पावसानंतर अचानक कडक ऊन पडल्याने शरिरात अचानक पित्त वाढते आणि डोळे येणे, तोंड येणे, अंगावर पुरळ येणे, ताप, गळू (केसतोड) होणे, हातापायांची आग होणे, मूत्रमार्गाची जळजळ होणे, यांसारखे पित्ताचे विकार होऊ शकतात. असे वातावरण असल्यास पुढील दक्षता घ्यावी.
१. आंबट, खारट, तिखट, तेलकट, तसेच चटपटीत खाणे टाळावे.
२. दही खाऊ नये. (दही घुसळून बनवलेले ताक चालते.)
३. पोटभर न जेवता थोडी भूक शिल्लक ठेवून जेवावे.
४. उन्हात जाणे टाळावे. जायचेच झाल्यास ऊन टाळण्यासाठी छत्रीचा वापर करावा.
५. दुपारी किंवा दिवसा झोपू नये. झोपायचेच झाल्यास बसल्याबसल्या झोप घ्यावी.
६. सततचा जोराचा पंख्याचा वारा टाळावा. (मंद गतीवर पंखा चालेल.)’
– वैद्य मेघराज पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१०.७.२०२३)
लेखमालिकेतील सर्व लेख एकत्र वाचण्यासाठी मार्गिका : bit.ly/ayusanatan