३२ दिवसांचा प्रवास करत पालखी सोहळा आळंदीत परतला !
आळंदी (जिल्हा पुणे) – माऊलीनामाचा जयघोष करत माऊलींचा पालखी सोहळा ३२ दिवसांचा प्रवास करून पंढरपूरहून आळंदीत परतला आहे. आळंदी आणि पंचक्रोशीतील भाविकांनी माऊलींच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. सायंकाळी पालखी सोहळा वडमुखवाडी, चहोली, धाकट्या पादुकामार्गे आळंदीत साडेसहा वाजता पोचला. येथील पालिका चौकात सोहळा आल्यावर भाविकांनी टाळ्या वाजवत माऊलीनामाचा गजर केला. पालिका चौकात पालखी रथातून खाली उतरवत आळंदीकरांनी खांद्यावर घेत मंदिरात आणली. मंदिरात प्रदक्षिणा घालून माऊलींच्या पादुका समाधीजवळ नेत आरती करण्यात आली. या वेळी मानकर्यांना नारळप्रसाद देण्यात आला. १३ जुलै या दिवशी एकादशीनिमित्त दुपारी पालखी नगरप्रदक्षिणा करून, तसेच हजेरी मारुति मंदिर येथे दिंड्यांची हजेरी घेऊन सोहळ्याची सांगता झाली.