‘लोकमान्य टिळक’ पुरस्कार देण्यावरून वाद निर्माण !
पुणे – पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकशाहीची मूल्ये पायदळी तुडवत असून त्यांची विचारधारा हुकूमशहासारखी आहे. त्यांना पुरस्कार देणे हा लोकमान्य टिळकांच्या कार्याचा अवमान आहे, असे विरोध करणार्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे ‘लोकमान्य टिळक’ राष्ट्रीय पुरस्कार मोदींना देण्यास काँग्रेस, सेवा दल, इंटक या संघटना, तसेच आम आदमी पक्ष आणि युवक क्रांती दलाने विरोध दर्शवला आहे. लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने दिला जाणारा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार यंदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घोषित झाला आहे. टिळक पुण्यतिथीनिमित्त १ ऑगस्ट या दिवशी टिळक महाराष्ट्र विद्यापीठ ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. दीपक टिळक यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि ट्रस्टचे विश्वस्त हे कार्यक्रमाला उपस्थित रहाणार आहेत. काँग्रेसचे माजी प्रदेश सरचिटणीस रोहित टिळक यांनी या पुरस्काराची घोषणा केली होती; मात्र अप्रसन्न कार्यकर्त्यांनी प्रदेशाध्यक्षांकडे यासंदर्भात लेखी तक्रार केली आहे. ‘लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्ट स्वतंत्र असला, तरी वैचारिक भूमिका ही काँग्रेसचीच आहे. काही वैयक्तिक लाभ मिळवण्याच्या हेतूने पंतप्रधानांना हा पुरस्कार घोषित केला असावा’, असा आरोप आम आदमी पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष विजय कुंभार यांनी केला आहे.