अजित पवार यांच्याकडे अर्थ खात्याचा पदभार !
राज्य मंत्रीमंडळाचा विस्तार
मुंबई – शिवसेना-भाजप युती सरकारला पाठिंबा देणार्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील ९ आमदारांनी २ जुलै या दिवशी मंत्रीपदाची शपथ घेतली होती; मात्र मागील १२ दिवस त्यांना खातेवाटप करण्यात आले नव्हते. १४ जुलै या दिवशी या सर्व मंत्र्यांची खाती घोषित करण्यात आली. यासह पूर्वीच्या काही मंत्र्यांच्या खात्यांमध्ये पालट करण्यात आला.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अर्थ आणि नियोजन खाते, छगन भुजबळ यांना अन्न अन् नागरी पुरवठा, तसेच ग्राहक संरक्षण, दिलीप वळसे पाटील यांना सहकार, धनंजय मुंडे यांना कृषी, हसन मुश्रीफ यांना वैद्यकीय शिक्षण अन् विशेष साहाय्य, धर्मारावबाबा आत्राम यांना अन्न आणि औषध प्रशासन, कु. आदिती तटकरे यांना महिला आणि बाल विकास, संजय बनसोडे यांना क्रीडा आणि युवक कल्याण, तर अनिल पाटील यांना मदत पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन खाते देण्यात आले. एकनाथ शिंदे यांचे निकटवर्ती समजले जाणारे दादा भुसे यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) हे खाते देण्यात आले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सामान्य प्रशासन, नगरविकास, माहिती आणि तंत्रज्ञान, माहिती अन् जनसंपर्क, परिवहन, सामाजिक न्याय, पर्यावरण अन् वातावरणीय पालट, खनीकर्म यांसह अद्याप वाटप न झालेली सर्व खाती आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह, विधी आणि न्याय, जलसंपदा अन् लाभक्षेत्र विकास, ऊर्जा आणि राजशिष्टाचार ही खाती आहेत.