युवकांना हिंदु संस्कृतीच्या दृष्टीकोनातून इतिहास आणि भूगोल शिकवला जावा ! – निधीश गोयल, संचालक, ‘जम्बू टॉक्स’, जयपूर, राजस्थान
विद्याधिराज सभागृह (रामनाथी, गोवा) – ‘जम्बूद्वीपे भरतखण्डे आर्यावर्ते भारतवर्षे, एक नगरी है विख्यात अयोध्या नाम की…’ हे गीत ऐकल्यानंतरही आपण केवळ अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश, म्यानमार, भूतान, नेपाळ एवढीच मागणी का करतो ? जर जम्बूदीपची संरचना एवढी मोठी आहे, ज्यात आजचे चीन, रशिया आणि मध्य पूर्वेतील सर्व देश सहभागी आहेत, तर आपण काहीतरी मोठी मागणी केली पाहिजे, असे मत जयपूर, राजस्थान येथील ‘जम्बू टॉक्स’ या ‘यू ट्यूब वाहिनी’चे संचालक श्री. निधीश गोयल यांनी व्यक्त केले. ते १६ ते २२ जून या कालावधीत पार पडलेल्या ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’त बोलत होते. या वेळी व्यासपिठावर ‘संगम टॉक्स’ ‘यू-ट्युब वाहिनी’च्या संपादिका तान्या मनचंदा, हिंदु विधीज्ञ परिषदेच्या देहली येथील सदस्या अधिवक्त्या अमिता सचदेवा आणि समितीचे श्री. आनंद जाखोटिया यांनी उपस्थितांना संबोधित केले.
या वेळी श्री. निधीश गोयल पुढे म्हणाले, ‘‘सध्याच्या चीनमध्ये मेरू (सुमेरू) पर्वत आहे आणि तो या विश्वाचा मध्य आहे’, असे म्हटले जाते. ही गोष्ट हिंदूंना किती वेळा सांगितली गेली ? आमच्या वाहिनीने ‘क्यों छिपाया जम्बूद्वीप ?’ असा कार्यक्रम केला. आपण अखंड भारताची गोष्ट का करतो ? जम्बूद्वीपाविषयी का बोलत नाही ? आपण काश्मीरला महर्षि कश्यप यांची भूमी म्हणतो, तर ‘कॅस्पियन’ समुद्राला कश्यप सागर का म्हणत नाही? हा तोच कश्यप समुद्र आहे, जेथून पुढे मध्य पूर्व आणि अन्य देश आहेत. जम्बूद्वीपविषयी आम्ही केलेला कार्यक्रम २ लाख लोकांनी पाहिला. यावरून भारताच्या युवकांना आपल्या इतिहासाविषयी जिज्ञासा आहे, हे लक्षात आले. युवकांशी त्यांच्या भाषेत संवाद साधला पाहिजे. आद्यशंकराचार्यांनी म्हटले होते की, मी शंख वाजवणार आहे आणि हा शंखध्वनी जेथे जेथे पोचेल, तो प्रदेश सनातन राहील. भारत कधीही गुलाम राहिलेला नाही, उलट आपला समाज संघर्षशील राहिला आहे. असे असले, तरी आपल्याला ‘भारत गुलाम देश होता’, असे शिकवण्यात आले आणि आपण ते मान्य केले. अर्जुन दिग्विजयी मोहिमेवर निघाला होता. तो आजच्या सायबेरियापर्यंतही गेला होता. मग आपल्याला हिंदु संस्कृतीच्या दृष्टीकोनातून भौगोलिक इतिहास शिकवण्यापासून कुणी थांबवले आहे ? आम्ही जेव्हापासून ‘जम्बू टॉक्स’ ही वाहिनी चालू केली, तेव्हापासून आम्ही केवळ अशा विषयांवर २०० कार्यक्रम, तर अन्य विषय मिळून आतापर्यंत ७०० भाग केले आहेत. आमचा हा प्रवास थांबणार नसून सतत चालू रहाणार आहे. कोणत्याही कार्याचा प्रारंभ सात्त्विक भावाने केल्यास आपल्याला श्रीकृष्ण साहाय्य करतो. त्याचे साहाय्य लाभल्यास आपल्याला कुणीही थांबवू शकत नाही.’’
अधिवक्ता म्हणून धर्मकार्य करतांना भगवंतच कार्य करून घेत आहे ! – अधिवक्त्या अमिता सचदेवा, हिंदु विधीज्ञ परिषद, देहली
श्रीकृष्ण जन्मभूमीच्या खटल्यात अधिवक्ता म्हणून काम करण्याची मला संधी मिळाली. मथुरा येथे जिल्हा सत्र न्यायालयामध्ये हा खटला लढवत आहे. त्या वेळी विरोधी पक्षाकडून ४ वरिष्ठ अधिवक्ते होते; मात्र मला न घाबरता हिंदूंची भूमिका मांडता आली. या प्रसंगात भगवंताचा आशीर्वाद समवेत असल्याचे जाणवत होते. या खटल्याचा निर्णय हिंदूंच्या बाजूने लागला. देहली येथे हिंदुत्वासाठी कार्य करण्यासाठी अधिवक्ते पुढे येत आहेत, ही भगवंताचीच लीला आहे. ईश्वरच सर्व करतो आणि आपल्याला आनंद देतो.
हिंदु युवतींना गौरवशाली सांस्कृतिक इतिहास सांगितल्यास ‘लव्ह जिहाद’ला विरोधच नाही, तर प्रतिकारही होईल ! – आनंद जाखोटिया, राज्य समन्वयक, मध्यप्रदेश आणि राजस्थान, हिंदु जनजागृती समिती
‘द केरल स्टोरी’ या सिनेमाने भारतातील ‘लव्ह जिहाद’चे षड्यंत्र आणि त्याचा ‘इस्लामिक स्टेट’च्या जागतिक आतंकवादाशी संबंध सिद्ध करून दाखवला; मात्र तथाकथित निधर्मीवाद्यांकडून या सिनेमाला अनेक ठिकाणी विरोध करण्यात आला, कुठे बंदी घालण्यात आली, तर कुठे सिनेमागृहांनी दाखवण्यास नकार दिला. भारताच्या मुलींना कुणी तरी प्रेमाच्या जाळ्यात अडकवून, त्यांचा धर्म, आई-वडील, संस्कृती, अस्तित्व सर्वकाही हिरावून घेऊन, त्यांनाच स्वतःच्या देशाच्या-धर्माच्या-कुटुंबाच्या विरोधात ‘जिहाद’ करण्यासाठी सिद्ध केले जाते, ही सामान्य गोष्ट नव्हे ! मात्र मुसलमान मतपेढी टिकवून ठेवण्यासाठी सिनेमाला विरोध करण्यात आला. येथे आपण लक्षात घेतले पाहिजे की, जे निधर्मीवादी हा सिनेमा स्वीकारायला सिद्ध नाहीत, ते प्रत्यक्षातील लव्ह जिहादची भयानकता कशी स्वीकारतील ? ते हिंदु मुलींच्या रक्षणासाठी प्रयत्न करतील का ? याचाच परिणाम म्हणून देशभरात लव्ह जिहादच्या घटनांनी थैमान घातले आहे. हे संकट थांबवण्यासाठी आपल्या मुलींना छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणा प्रताप यांचे जीवन, तसेच छत्रपती संभाजी महाराज, राणी लक्ष्मीबाई, राणी पद्मावती यांनी धर्मासाठी केलेला गौरवपूर्ण त्याग सांगावा लागेल. हिंदु युवतींपर्यंत पराक्रमाचा इतिहास पोचवला, तर लव्ह जिहादचा केवळ विरोधच नाही, तर प्रतिकारही होईल. यासमवेतच हिंदु युवतींमध्ये लव्ह जिहादच्या संदर्भात जागृती करणे, त्यांना हिंदु धर्मशास्त्रांच्या संदर्भात शिक्षण देणे, विविध समाजघटकांमध्ये जाऊन प्रबोधन आणि संघटन करणे, त्यांना स्वसंरक्षण प्रशिक्षण देणे, ज्या हिंदु मुलींना पुन्हा हिंदु धर्मात प्रवेश घ्यायचा आहे, त्यांच्यासाठी ‘घरवापसी’ची योजना आखणे, लव्ह जिहादच्या विरोधात बनवलेले कायदे कठोर करण्यासाठीचे प्रयत्न करणे आणि आंदोलन करणे अशा विविध उपाययोजना कराव्या लागतील.
‘संगम टॉक्स’च्या माध्यमातून आम्ही हिंदु धर्मावरील आघातांना वाचा फोडत आहोत ! – तान्या मनचंदा, संपादक, संगम टॉक्स
आमच्या पिढीला विशेषतः शहरी युवकांना धर्मशिक्षण दिले गेले नाही, हे आमचे दुर्भाग्य आहे; परंतु ‘संगम टॉक्स’ या यू ट्यूब वाहिनीच्या (‘चॅनेल’च्या) माध्यमातून युवकांना आम्ही हिंदुत्वाविषयी विविध कार्यक्रमांचे आयोजन करत आहोत. आम्ही या माध्यमातून युवकांना हिंदु धर्मकार्याकडे आकर्षित करत आहोत. लव्ह जिहाद आणि हिंदी चित्रपटसृष्टी यांचे खरे स्वरूप आम्ही उघड केले. ख्रिस्त्यांच्या हिंदु धर्मविरोधी कारवाया आम्ही ‘संगम टॉक्स’च्या माध्यमातून उघड केल्या. कलियुगातूनच सत्ययुगाची निर्मिती होणार आहे; पण त्यासाठी आपण प्रयत्न करायला हवेत. मंदिरे सरकारी नियंत्रणातून मुक्त होण्यासाठी आम्ही जागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन केले. शीख हिंदूंपासून वेगळे असल्याचे ‘नॅरेटिव्ह’ (कथानक) निर्माण केले जात आहे. याचे स्वरूपही आम्ही चॅनलद्वारे उघड केले. ‘संगम टॉक्स’च्या माध्यमातून हिंदूंना दिशादर्शन केले जात आहे.
संपादकीय भूमिकायुवा पिढीला हिंदु संस्कृतीच्या दृष्टीकोनातून भौगोलिक इतिहास शिकवण्यासाठी गुरुकुल शिक्षणपद्धत हवी ! |