परात्पर गुरु डॉ. आठवले यांची भेट झाल्यावर आनंदी जीवनाची गुरुकिल्ली सापडून पू. शिवाजी वटकर यांच्या जीवनात फुलू लागलेला आनंद !

१४ जुलै या दिवशी प्रसिद्ध झालेल्या भागात आपण ‘पू. शिवाजी वटकर यांचे बालपण, शिक्षण, नोकरी करतांना त्यांना आलेले अनुभव आणि शाश्वत सुखाचा शोध घेण्यासाठी त्यांचे चालू झालेले प्रयत्न’, हे सर्व भाग पाहिले. या भागात पू. वटकर यांची परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी झालेली भेट आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली साधना चालू केल्यावर त्यांना मिळू लागलेला आनंद यांविषयीची सूत्रे दिली आहेत.

पू. शिवाजी वटकर

भाग १ : https://sanatanprabhat.org/marathi/701250.html

३. विविध ठिकाणी केलेली नोकरी 

३ इ. वर्ष १९८० ते २००६ पर्यंत ‘शिपिंग कॉर्पाेरेशन ऑफ इंडिया लि.’ येथे केलेली नोकरी      

३ इ १. व्यवस्थापनाचे शिक्षण आणि नोकरीतील अनुभव यांमुळे आस्थापनात सहव्यवस्थापकाची नोकरी मिळणे : वर्ष १९७७ मध्ये मी ‘माझगाव डॉक’ येथे नोकरी करत असतांना ‘डिप्लोमा इन ऑपरेशन्स मॅनेजमेंट’चे शिक्षण घेतले. व्यवस्थापनाचे (डिप्लोमा इन ऑपरेशन्स मॅनेजमेंट) शिक्षण आणि माझा नोकरीतील १० वर्षांचा अनुभव यांमुळे मला ‘शिपिंग कॉर्पाेरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (भारतीय नौवहन निगम लिमिटेड)’ या आस्थापनात सहव्यवस्थापकाची नोकरी लागली. मी पुष्कळ कष्ट घेऊन आणि प्रामाणिकपणे नोकरी केली. वर्ष २००६ मध्ये वयाच्या ६० व्या वर्षी मी या आस्थापनातून ‘उपमहाप्रबंधक’ (‘डेप्युटी जनरल मॅनेजर’) या पदावरून निवृत्त झालो.

३ इ २. व्यवस्थापनाचे कार्य सहजतेने आणि लवकर होऊन साधना अन् सेवा करण्यास वेळ मिळणे : आस्थापनात शनिवारी आणि रविवारी सुटी मिळत असल्यामुळे मला साधना आणि सेवा करता आली. मी कुलदेवतेचे नामस्मरण, सत्संग आणि सत्सेवा करत असल्यामुळे माझ्या जीवनात आमूलाग्र पालट झाला होता. व्यवस्थापनाचे कार्य माझ्याकडून सहजतेने आणि लवकर होत होते. त्यामुळे मला मोकळा वेळ मिळून साधना आणि सेवा करण्यास पुष्कळ वेळ मिळाला. ही नोकरी करतांना मला पुष्कळ आनंद मिळत होता. परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने माझी अध्यात्मातही पदोन्नती, म्हणजे प्रगती झाली.

३ इ ३. गुरुकृपेने व्यसनांपासून दूर रहाता येणे : आस्थापनात मी उच्च अधिकारी पदावर होतो. तेथे वेगवेगळ्या अधिकार्‍यांचे गट होते. ते ‘मद्य पिणे, मेजवान्या करणे, हॉटेलमध्ये जाणे, विविध मार्गांनी पैसे कमवणे’, असे करत होते; मात्र देवाच्या कृपेने मला या सर्व व्यसनांपासून दूर रहाता आले. श्री गुरूंनी मला कुठल्याच व्यक्तीत किंवा व्यसनात अडकू दिले नाही. ‘प्रामाणिकपणे आणि तत्त्वनिष्ठ राहून काम करणे’, हे माझे कर्तव्य आहे’, असे मला वाटत असे.

४. कौटुंबिक जीवन

४ अ. विवाह : १७.११.१९७३ या दिवशी माझा विवाह झाला. मला एक मुलगा (डॉ. नितीन वटकर (वय ४७ वर्षे)) आणि एक मुलगी (श्रीमती स्वाती अटवाल (वय ४४ वर्षे)) आहे. मुलगा दंतवैद्य आहे आणि मुलगी शिक्षिका आहे.

४ आ. संसारातील समस्यांवर उपाय मिळवण्यासाठी मंदिरात किंवा ज्योतिषांकडे जाणे : माझ्या संसारात काही समस्या निर्माण झाल्या होत्या. कौटुंबिक समस्यांवर उपाय मिळवण्यासाठी मी ज्योतिषी किंवा मंदिरात केवळ व्यावहारिक आणि मायेतील गोष्टींसाठी जात असे.

४ इ. समाधान आणि शांती यांच्या शोधात मृगजळामागे धावणे : वयाच्या ४३ व्या वर्षापर्यंत मी सुख मिळवण्यासाठी मृगजळाच्या मागे धावलो. मला शाश्वत सुख किंवा आनंद कुठेही मिळत नव्हता. मी समाधान, शांती, प्रेम आणि आनंद यांच्या शोधात होतो.

५. जीवनात दुःखच अधिक आल्याने मनाला ऊर्जा आणि आधार मिळवण्यासाठी प्रयत्न करणे

मी हुशार आणि उच्च-शिक्षित असल्याने ‘माझे जीवन पुष्कळ आनंदात जाईल’, असा माझा भ्रम होता; पण उच्च शिक्षण घेऊन आणि पैसा मिळवूनही माझ्या जीवनात दुःखच अधिक आले. मनाला ऊर्जा आणि आधार देण्यासाठी मी स्वामी विवेकानंद किंवा इतर संत यांचे ग्रंथ वाचत होतो. मी समाजसेवा करून किंवा एखाद्या आध्यात्मिक केंद्रात जाऊन मनःशांतीसाठी ठिकाण शोधत राहिलो; मात्र मला हवे ते मिळत नव्हते.

६. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी झालेली भेट आणि साधना करू लागल्यावर आलेल्या अनुभूती

६ अ. परात्पर गुरु डॉक्टरांच्या चिकित्सालयात लावलेले चित्र पाहून स्वतःच्या स्थितीची जाणीव होणे आणि त्यांनी सांगितलेल्या साधनेमुळे मनावरील ताण न्यून होऊन आनंद मिळू लागणे : वर्ष १९८९ मध्ये माझी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी प्रथम भेट झाली. तो दिवस माझ्या जीवनातील अविस्मरणीय दिवस होता. मी परात्पर गुरु डॉक्टरांच्या चिकित्सालयात गेलो होतो. तेथील भिंतींवर बरीच बोधचित्रे आणि सुवचने लावली होती. तिथे ‘एक चिमणी गवताची एक एक काडी आणून उंटाच्या पाठीवर टाकते आणि शेवटच्या एका काडीच्या ओझ्यामुळे उंट खाली बसतो’, अशा आशयाचे एक चित्र लावले होते. चित्राखाली ‘द स्ट्रॉ दॅट ब्रोक द कॅमल्स बॅक (‘The straw that broke the camel’s back’) ’, असे लिहिले होते. याचा अर्थ होता, ‘उंटावर एवढे ओझे झाले होते की, चिमणीने त्याच्यावर टाकलेल्या गवताच्या एका काडीच्या ओझ्याने उंट खाली बसला.’

माझी स्थितीही त्या उंटासारखीच झाली होती. मी त्या वेळच्या तणावाच्या स्थितीत तसाच राहिलो असतो, तर पुढे थोडासा ताण आणणार्‍या प्रसंगानेही माझ्या मनाचे संतुलन बिघडून ‘मला वेड लागेल कि काय’, अशी मला काळजी वाटत होती. परात्पर गुरु डॉक्टरांशी भेट झाल्यावर त्यांनी सांगितलेल्या साधनेमुळे माझ्यावरील ताण न्यून होत गेला आणि मला आनंद मिळू लागला. परात्पर गुरु डॉक्टरांच्या आधाराचा पावन हात मला मिळाला. आजपर्यंत तोच हात माझ्या डोक्यावर ‘वरदहस्त’ म्हणून राहिला आहे.

६ आ. परात्पर गुरु डॉक्टरांनी कुलदेवतेचा नामजप करायला सांगितल्यावर पुष्कळ आश्चर्य वाटणे आणि नामजप केल्यावर अनुभूती येऊन मनावरील ताण न्यून होणे : परात्पर गुरु डॉक्टरांकडे गेल्यावर ‘ते मानसिक ताण जाण्यासाठी उपचार करतात’, असे मला कळले. काही दिवस मी त्यांनी सांगितल्यानुसार उपचार आणि स्वयंसूचना घेतल्या. त्यांनी मला माझ्या कुलदेवतेचा नामजप करण्यास सांगितला. ‘आंतरराष्ट्रीय कीर्तीचे मानसोपचार तज्ञ’ असे कसे सांगतात ?’, याचे मला पुष्कळ आश्चर्य वाटले. मला मानसिक दुःखातून मुक्त व्हायचे असल्यामुळे मी ‘श्री खंडोबाय नमः ।’, हा माझ्या कुलदेवतेचा नामजप आर्त भावाने करायला आरंभ केला. तेव्हा लगेचच मला श्री खंडोबाच्या भंडार्‍याच्या (हळदीच्या) सुगंधाची अनुभूती आली. नामजपामुळे हळूहळू माझ्या मनावरील ताण न्यून होत गेला आणि माझे मन स्थिर झाले. या अनुभूतीमुळे माझा अध्यात्म आणि साधना यांवर विश्वास बसला.

६ इ. ‘विज्ञानापेक्षा अध्यात्म श्रेष्ठ आहे’, असे शिकवणारे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे संमोहन उपचारतज्ञ परात्पर गुरु डॉक्टर आठवले ! : मी अभियंता असल्याने आरंभी मला विज्ञानाचा व्यर्थ अभिमान होता; मात्र ‘जीवनात आनंदी रहाता येण्यासाठी त्याचा काही उपयोग होत नाही’, याचा मला अनुभव येत होता. परात्पर गुरु डॉक्टरांची ‘आंतरराष्ट्रीय कीर्तीचे संमोहन उपचारतज्ञ’ म्हणून ख्याती होती. ते विदेशात राहून शोधनिबंध लिहिणारे संशोधक होते. असे असतांना त्यांनी आम्हाला मुंबई येथे होणार्‍या अभ्यासवर्गात अध्यात्म आणि विज्ञान यांची तुलना करून ‘अध्यात्मच कसे श्रेष्ठ आहे ?’, हे शिकवले.

६ ई. परात्पर गुरु डॉक्टरांच्या वाणीतील चैतन्यामुळे त्यांनी शिकवलेले ज्ञान अंतर्मनात जाऊन त्याचा मनावर संस्कार होणे : मी परात्पर गुरु डॉक्टर घेत असलेले अभ्यासवर्ग आणि प्रवचने यांसाठी जाऊ लागलो. त्यांच्या चैतन्यमय वाणीमुळे त्यांनी शिकवलेले ज्ञान माझ्या अंतर्मनापर्यंत जाऊन त्यांचा मनावर संस्कार होऊ लागला. त्यांनी ‘बाह्यमन, अंतर्मन आणि त्यांतील संस्कारकेंद्रे कशी कार्य करतात ? अंतर्मनातील लाखो संस्कार घालवण्यासाठी स्वयंसूचना घेणे आणि नामस्मरण करणे का आवश्यक आहे ?’, हे सर्व शिकवले. त्यांनी शिकवलेले आणि त्यांच्याच संकल्पाने सिद्ध झालेले ज्ञान मी कृतीत आणण्याचा प्रयत्न करत असे. त्यातून मला शिकण्याचा खरा आनंद मिळू लागला.

६ उ. परात्पर गुरु डॉक्टरांनी लिहिलेला ‘अध्यात्मशास्त्र’ हा ग्रंथ वाचतांना आलेली अनुभूती : परात्पर गुरु डॉक्टरांची भेट झाल्यावर मी त्यांनी लिहिलेल्या ‘अध्यात्मशास्त्र’ या ग्रंथाचा अभ्यास केला आणि थोडीफार तशी कृती करायला आरंभ केला. तेव्हा मला शिकण्यातील आनंद मिळायला लागला. हा ग्रंथ वाचतांना ‘कोणतीतरी दैवी शक्ती मला हे सांगत असून ते ऐकून मी कृती करत आहे’, असे मी अनुभवत होतो.

परात्पर गुरु डॉक्टरांशी भेट झाल्यावर माझा शाश्वत आनंदाचा शोध संपला आणि मला समाधान, आत्मीयता, प्रेम, आनंद अन् शांती यांचा अखंड ठेवा सापडला. परात्पर गुरु डॉक्टरांच्या भेटीनंतर मला नैराश्य किंवा नकारात्मता कधीच आली नाही.

६ ऊ. परात्पर गुरु डॉक्टरांच्या भेटीनंतर जीवनात चालू झालेला सुवर्णकाळ !

६ ऊ १. परात्पर गुरु डॉक्टरांनी वेळोवेळी दिलेल्या दृष्टीकोनामुळे कठीण प्रारब्ध भोगण्यासाठी शक्ती मिळणे : घरी कधी कौटुंबिक कठीण प्रसंग घडल्यास माझ्या मनात टोकाचे विचार येत. याविषयी परात्पर गुरु डॉक्टरांना सांगितल्यावर ते मला म्हणाले, ‘‘कौटुंबिक आणि व्यावहारिक जटील प्रश्न हे आपल्या प्रारब्धाचे भोग आहेत. ‘साधना वाढवणे’ हाच त्यावरील एक उपाय आहे.’’ असे दृष्टीकोन देऊन त्यांनी माझे कठीण प्रारब्ध भोगण्यासाठी मला शक्ती दिली. माझे स्वभावदोष आणि अहं न्यून करून मला आनंद दिला अन् माझी साधनेत प्रगतीही करून घेतली.

६ ऊ २. ‘साधना करणे, हीच आनंदी जीवनाची गुरुकिल्ली आहे’, हे समजणे : लहानपणापासून माझ्या जीवनात एक पोकळी होती. परात्पर गुरु डॉक्टर माझ्या जीवनात आल्यावर ती पोकळी भरून निघाली आणि स्थिरता आली. माझ्या जीवनातील खडतर काळ संपून सुवर्णकाळ चालू झाला. मला जीवनात खरा आनंद मिळू लागला आणि ‘साधना करणे, हीच आनंदी जीवनाची गुरुकिल्ली आहे’, हे शिकता आले.

६ ऊ ३. परात्पर गुरु डॉक्टरांसारखे गुरु लाभल्यामुळे जीवनाचे परम कल्याण होणे : मी ज्या आनंदाच्या शोधात होतो, तो आनंद मला परात्पर गुरु डॉक्टरांच्या रूपात मिळाला. त्यांच्या रूपात मला प्रत्यक्ष देवच भेटला होता. माझे श्रद्धास्थान मिळाल्याने चिरंतन सुखाच्या शोधासाठी चाललेली माझी भटकंती बंद झाली. ‘अशा श्रद्धास्थानाला ‘गुरुतत्त्व’ म्हणतात’, हे मला नंतर समजले. असे ‘मोक्षगुरु’ माझ्यासारख्या सर्वसाधारण साधकाच्या केवळ व्यावहारिक अडचणी सोडवून सुख मिळवून देत नाहीत, तर साधकाला जन्म-मृत्यूच्या रहाटगाडग्यातून सोडवून हात धरून मोक्षाच्या मार्गावरून चालवतात. त्याच्याकडून साधना करून घेऊन त्याला ‘सक्षम शिष्य’ बनवतात. त्याला ‘गुरुकृपा हि केवलं शिष्यपरममङ्गलम् ।’ म्हणजे ‘गुरुकृपा शिष्याचे परम कल्याण करते’, याची अनुभूती देतात.

६ ऊ ४. ‘संसार असार आहे’, असे वाटत असतांना प.पू. भक्तराज महाराज आणि परात्पर गुरु डॉक्टर यांच्या भेटीनंतर संसारातही सार आहे’, असे वाटणे : समर्थ रामदासस्वामी यांनी सांगितले आहे, ‘ज्यातून सार निघून गेले आहे, त्याला ‘संसार’ म्हणतात.’ समर्थांनी सांगितल्यानुसार मला रज-तम संसाराचा अनुभव येऊन उबग आला होता; मात्र ‘प.पू. भक्तराज महाराज, परात्पर गुरु डॉक्टर आणि इतर अनेक संत माझ्या जीवनात आल्यावर संसारामध्येही सार, म्हणजे रस आहे’, असे मला अनुभवता आले.

सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार ‘गुरुकृपायोगानुसार’ साधना केल्यामुळे माझे स्वभावदोष आणि अहं उणावले. माझे मन स्थिर होऊ लागले. ‘प्रारब्धभोग भोगून संपवणे आणि मोक्षप्राप्ती (आनंद) करणे’, हेच मनुष्यजन्माचे ध्येय आहे’, हे मला शिकता आले. परात्पर गुरु डॉक्टरांनी माझ्याकडून साधना आणि सेवा करून घेऊन मला आनंदात ठेवले. वर्ष २००८ मध्ये माझी आध्यात्मिक पातळी ६० टक्के झाल्याचे घोषित केले. त्यानंतर माझ्या साधनेची स्थिती दोलायमान असल्याने पातळी खाली-वर होत होती. नंतर वर्ष २०१९ मध्ये परात्पर गुरु डॉक्टरांनी माझी आध्यात्मिक पातळी ७१ टक्के झाली असल्याचे सांगून समष्टी संतपद गाठल्याचे घोषित केले. मी यापेक्षा मोठा चमत्कार किंवा अनुभूती यांची कल्पनाही करू शकत नाही. हे केवळ परात्पर गुरु डॉक्टरांनी माझ्याकडून करून घेतलेल्या साधनेमुळे शक्य झाले. त्याबद्दल मी त्यांच्या चरणी कोटीश: कृतज्ञता व्यक्त करतो.

(क्रमशः)

– (पू.) शिवाजी वटकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२.५.२०२०)

भाग ३ वाचण्यासाठी येथे क्लिक करा. https://sanatanprabhat.org/marathi/702253.html

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक