चिपळूण येथील नवीन वाशिष्ठी पुलाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे ! – निहार कोवळे, युवासेना तालुकाप्रमुख
चिपळूण – मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाशिष्ठी नदीवरील नवीन पुलाचा खालील भाग ढासळण्याची शक्यता असल्याने भविष्यात अपघात होऊन मोठी दुर्घटना घडू शकते, अशी भीती युवासेना तालुकाप्रमुख (शिंदे गट) निहार कोवळे यांनी व्यक्त केली आहे. त्यांनी त्यांच्या सहकार्यांसह या पुलाची पहाणी केल्यानंतर त्यांनी वरील वक्तव्य केले. येत्या ८ दिवसांत या भागाची डागडुजी न केल्यास महामार्ग रोखून आंदोलन करण्यात येईल, अशी चेतावणी त्यांनी या वेळी दिली.
शहरातील वाशिष्ठी नदीवरील पूल हा मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरचा महत्त्वाचा पूल आहे. आरंभीपासून या दोन्ही पुलांची कामे वादग्रस्त ठरलेली आहेत. जुना पूल वाहतुकीला बंद ठेवण्याची नामुष्की प्रशासनावर ओढवल्यानंतर पुलांची रखडलेली कामे उजेडात आली होती. येथील नागरिक आणि लोकप्रतिनिधींनी आवाज उठवल्यानंतर या पुलांची कामे मार्गी लागली.
पुलाचे काम चालू असतांना एका पुलाचा जोडरस्ता खचल्याचाही प्रकार घडला होता; मात्र संबंधित ठेकेदाराने या जोडरस्त्याची डागडुजी केली होती. त्यानंतर पुलावरचे काँक्रिटीकरण उखडून आतील लोखंडी सळ्याही बाहेर पडल्या होत्या आणि आता या पुलाचा खालील भाग ढासळण्याच्या स्थितीत असल्याची धक्कादायक गोष्ट उघड झाली आहे.
युवासेनेचे आदित्य जोशी यांच्या पुलाच्या खालील काही भाग खचलेला दिसला. त्यांनी ती माहिती तात्काळ कोवळे यांना कळवली. त्यानंतर या पुलाची कोवळे यांनी पहाणी केली होती.
राष्ट्रीय महामार्ग विभागशाखा अभियंता शाम खुणेकर यांनी याविषयी म्हटले आहे की, वाशिष्ठीच्या नवीन पुलास कोणताही धोका नाही. पुलाचा मुख्य ‘स्लॅब’ खचलेला नाही. स्लॅबला आधार दिलेल्या (सपोर्टिव्ह) भागात किरकोळ दुरुस्ती करावी लागणार असून ती केली जाईल.