सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपाशीर्वादाने श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी वर्ष २०१६ मध्ये प्रारंभ केलेल्या भक्तीसत्संगांचे आध्यात्मिक महत्त्व !
भाव हा मायेपासून दूर नेऊन भगवंताशी जोडणारा दुवा आहे. त्यामुळे भावसत्संगाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. जेव्हा भावाची उत्कटता वाढते, तेव्हा त्याचे व्यष्टी स्वरूपातील सगुणत्व संपुष्टात येऊन समष्टी स्तरावरील निर्गुणत्व जागृत होते. या प्रक्रियेमुळे भावऊर्जेचे रूपांतर भक्तीमय शक्तीत होते. त्यामुळे आधीच्या भावसत्संगाच्या स्वरूपाचे रूपांतर आता भक्तीसत्संगात झाले आहे. जेवढी भक्तीमध्ये आर्तता अधिक असते, तितके ईश्वरी तत्त्वाचे प्रागट्य अधिक प्रमाणात होत असते. त्यामुळे ईश्वरेच्छेने काळानुसार आवश्यक असणारे भक्तीसत्संग प्रत्येक गुरुवारी चालू आहेत. १३ जुलै २०२३ या दिवशी या भक्तीसत्संगाच्या शृंखलेतील ३०० वा भक्तीसत्संग झाला. त्या निमित्ताने आपण प्रत्येक गुरुवारी होणार्या या दिव्यस्वरूप भक्तीसत्संगांचे ‘आध्यात्मिक महत्त्व’ या लेखाद्वारे जाणून घेऊया.
१. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी वर्ष २०१६ मध्ये भावसत्संगाला प्रारंभ करणे
येणार्या आपत्काळात साधकांची साधना वाढण्यासाठी त्यांच्यामध्ये भाव आणि भक्ती यांची वृद्धी होण्यासाठी श्रीविष्णूच्या कृपेनेच श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी वर्ष २०१६ मध्ये भावसत्संगाला प्रारंभ केला. त्यामुळे भावसत्संगाला ईश्वरी अधिष्ठान प्राप्त झाले. त्यामुळे हे भावसत्संग भाव, चैतन्य आणि आनंद या स्तरांवर, म्हणजे आध्यात्मिक स्तरावर चालू झाले. त्यामुळे या भावसत्संगांना उपस्थित असणार्या साधकांवर भाव, चैतन्य आणि आनंद या लहरींचा वर्षाव होऊन त्यांच्या सूक्ष्म देहांची आणि सूक्ष्म कोषांची शुद्धी होऊन त्यांच्यावर आध्यात्मिक स्तरावरील उपाय होऊन त्यांचे त्रास न्यून झाले. त्यामुळे भावसत्संग हे साधकांसाठी वरदानच ठरले आहेत.
२. भक्तीसत्संगाच्या वेळी श्री गणेश आणि श्री सरस्वतीदेवी यांच्यासह त्रिदेवांचे कृपाशीर्वाद लाभणे !
२ अ. संहिता लिखाण करतांना श्री गणेश आणि ब्रह्मदेव यांनी साहाय्य करणे : भावसत्संगाची संहिता सिद्ध करणार्या साधिकेच्या (६५ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कु. वैष्णवी वेसणेकर यांच्या) माध्यमातून साक्षात् बुद्धीची देवता श्री गणेशाचे तत्त्व कार्यरत झाल्यामुळे भावसत्संगाची संहिता ज्ञानाने परिपूर्ण असते. त्यामुळे यामध्ये ब्रह्मदेवाची चैतन्यदायी ज्ञानशक्ती कार्यरत असते. त्यामुळे संहिता लिखाण करणार्या साधिकांना नवनवीन सूत्रे आणि उदाहरणे सुचतात अन् ईश्वराकडून संहितेच्या विषयांचा ओघ आल्याने त्याचे लिखाण भावमय स्थितीत होते. तसेच या लिखाणाला अनुसरून असणारी चित्रे, भक्तीगीते किंवा स्तोत्रे त्यांना सापडतात. त्यामुळे भक्तीसत्संग परिपूर्ण होतो.
२ आ. भक्तीसत्संगामुळे श्रीविष्णूने प्रसन्न होऊन साधकांना आशीर्वाद दिल्यामुळे त्यांच्या साधनेची गुणवत्ता वाढणे : जेव्हा श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ भक्तीसत्संग घेतात, तेव्हा त्यांच्या वाणीवर ‘वाक्देवी’, म्हणजे वाणीची देवी श्री सरस्वती साक्षात् प्रगट होते. श्री सरस्वतीदेवीची दिव्य आणि मधुर वाणी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या माध्यमातून कार्यरत झाल्यामुळे ती श्रवण करणार्या साधकांकडून श्रवणभक्ती होते. त्याचप्रमाणे या सुमधुर अशा विष्णुवाणीतून सांगितलेल्या सूत्रांचा खोलवर परिणाम श्रोत्या साधकांवर होऊन त्यांचा भगवंताप्रतीचा भक्तीभाव जागृत होण्यास साहाय्य होते. तसेच भगवंतही समस्त देवीदेवता आणि ऋषिमुनी यांच्यासह प्रत्येक गुरुवारी होणारा हा भक्तीसत्संग ऐकण्यास आतूर झालेला असतो. जेवढी भक्तीमध्ये आर्तता अधिक असते, तितके ईश्वरी तत्त्वाचे प्रागट्य अधिक प्रमाणात होत असते. त्यामुळे प्रत्येक भक्तीसत्संगामध्ये श्रीविष्णूच प्रसन्न होऊन सनातनच्या साधकांवर कृपा करतो. अशा प्रकारे भक्तीसत्संगामुळे साधकांवर श्रीविष्णूची कृपा प्रत्येक गुरुवारी होऊन त्यांच्या साधनेची गुणवत्ता वृद्धींगत होते.
२ इ. भक्तीसत्संगाच्या वेळी शिवाची कृपा होऊन साधकांमधील वैराग्यभाव जागृत होणे : भाव हा मायेपासून दूर नेऊन भगवंताशी जोडणारा दुवा आहे. त्यामुळे जेव्हा भक्तीसत्संग चालू असतो, तेव्हा शिवाच्या दक्षिणामूर्ती या ज्ञानस्वरूप रूपातील ज्ञानलहरी कार्यरत होतात. त्यामुळे साधकांच्या मनावरील मायेचा प्रभाव दूर होऊन त्यांच्यामध्ये साधनेसाठी पोषक असणारा वैराग्यभाव जागृत होतो.
३. भक्तीसत्संग घेणार्या साधिकांकडून नारदाप्रमाणे कीर्तनभक्ती आणि भक्तीसत्संग ऐकणार्या साधकांकडून राजा परीक्षिताप्रमाणे श्रवणभक्ती या भक्तींद्वारे साधना होऊन श्रीगुरूंसह समस्त देवीदेवता प्रसन्न होणे
या दिव्य ज्ञानातून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची यशोगाथा उलगडते. त्याचप्रमाणे या दिव्य ज्ञानातून ऋषिमुनींचे माहात्म्य कळते आणि विविध भक्तांचा भगवंताप्रतीचा भक्तीभाव उमजतो. त्याचप्रमाणे श्रीमद्भागवताप्रमाणे या भक्तीसत्संगांतून भगवंत आणि श्रीगुरु यांच्या अनेक लीलांचे भावाच्या स्तरावर वर्णन केल्यामुळे त्यांतून भगवंताला प्रसन्न करणार्या कीर्तनभक्तीची प्रचीती येते. अशा प्रकारे भक्तीसत्संग घेणार्या साधिकांकडून नारदाप्रमाणे कीर्तनभक्ती आणि भक्तीसत्संग ऐकणार्या साधकांकडून राजा परिक्षिताप्रमाणे श्रवणभक्ती या भक्तींद्वारे संपूर्ण सप्ताहात साधना होऊन श्रीगुरूंसह समस्त देवीदेवता प्रसन्न होतात. त्याचप्रमाणे ईश्वरेच्छेने साधकांकडून नवविधा भक्तींपैकी जी भक्ती आवश्यक असते ती साधकांमध्ये जागृत होते. अशा प्रकारे प्रत्येक गुरुवारचा भक्तीसत्संग हा नवविधा भक्तीरूपी पुष्पमालेने सजलेला आणि नटलेला असल्याने तो परिपूर्ण असतो.
४. भक्तीसत्संगरूपी भावसोहळ्याच्या ठिकाणी वैकुंठाचेच वातावरणात सूक्ष्मातून निर्माण झाल्याचे जाणवणे, विविध देवता आणि ऋषिमुनी आश्रमातील वायूमंडलात सूक्ष्मातून उपस्थित असणे अन् त्यांनी साधकांवर कृपावर्षाव करणे
भक्तीसत्संगाच्या ठिकाणी निर्गुण स्तरावरील विष्णुतत्त्व कार्यरत असून भक्तीसत्संगातील भावमय लहरींमुळे श्रीविष्णूची तारक शक्ती सत्संगात कार्यरत होते. त्यामुळे भक्तीसत्संगरूपी भावसोहळ्याच्या ठिकाणी वैकुंठाचेच वातावरणात सूक्ष्मातून निर्माण झाल्याचे जाणवते. हा भावसोहळा पहाण्यासाठी विविध देवता आणि ऋषिमुनी आश्रमातील वायूमंडलात सूक्ष्मातून उपस्थित असल्याचे जाणवते. ते साधकांचा भाव, तळमळ आणि चिकाटीने केलेले प्रयत्न पाहून साधकांवर कृपावर्षाव करतात.
५. साधकांना भक्तीसत्संगाची गोडी लागण्यामागील मर्म
श्री सरस्वतीदेवीची दिव्य आणि मधुर वाणी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या माध्यमातून कार्यरत झाल्यामुळे त्यांचा आवाज निरागस बालिकेप्रमाणे गोड होतो. त्या प्रत्येक भक्तीसत्संगात ऐकवण्यात आलेल्या भक्तीगीताचा अर्थ अत्यंत सुलभ आणि सोप्या भाषेत उलगडून सांगतात. तसेच विषयाशी संबंधित असणारी चित्रे पडद्यावर दाखवण्यात येतात. विषयाला अनुसरून असणारे चित्ररूपी भावदृश्य पाहिल्याने सगुण स्तरावरील भावाची आणि भक्तीगीतमय संगीताचे श्रवण केल्यामुळे निर्गुण स्तरावरील भक्तीची अनुभूती येऊन हा भक्तीभाव पुढील अनेक दिवस टिकून रहातो. भक्तीसत्संगाच्या वेळी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या कृपेने साधकांना भक्तीचे ज्ञान मिळते आणि त्यानंतर त्यांच्या हृदयातील श्रीगुरूंप्रतीचा भाव जागृत होतो. त्यामुळे ज्ञानाचे रूपांतर भक्तीरसामध्ये होऊन हा मधुर भक्तीरस ओघळू लागतो. त्यामुळे साधकांना भक्तीसत्संगाचे श्रवण केल्यावर भक्तीरसरूपी मधुर असणार्या आनंदाची अनुभूती येते आणि भक्तीसत्संगाची गोडी लागते. अशा प्रकारे साधकांना भक्तीसत्संगाचे श्रवण केल्याने भागवतकथेचेच श्रवण केल्याचे दिव्य फळ लाभते. तसेच विशेष भक्तीसत्संगांमुळे सणांचे माहात्म्य, शिवमाहात्म्य, देवीमाहात्म्य, विष्णुमाहात्म्य, गुरुमाहात्म्य इत्यादी माहात्म्य साधकांच्या अंतर्मनावर सुवर्ण अक्षरांमध्ये कायमस्वरूपी कोरले जाते. त्यामुळे साधकांच्या चित्तावर भक्तीचा संस्कार दृढ होऊन त्यांचे जीवन भक्तीमय होत आहे.
६. त्रिदेवींचे मूर्तीमंत स्वरूप असणार्या श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ
श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ या सर्व साधकांची माता, म्हणजे समष्टी माताच आहेत. त्यांच्या माध्यमातून कधी श्रीलक्ष्मीदेवी साधकांसाठी भक्तीभावाची जागृती करण्यासह जे जे आवश्यक असते, ते ते देऊन त्यांच्यावर कृपा करत असते. तसेच त्यांच्या माध्यमातून श्री सरस्वतीदेवीचे तत्त्व कार्यरत होऊन साधकांना व्यष्टी आणि समष्टी साधना करण्यासाठी साहाय्य करत असते. तसेच त्यांच्यातील श्री कालीमाता कठोर रूप धारण करून साधकांनी चुका केल्यास त्यांना कठोर शब्दांत जाणीव करून देऊन त्यांचे गर्वहरण करत असते.
७. भक्तीसत्संगातून प्रक्षेपित होणारे विविध घटकांचे प्रमाण आणि महत्त्व !
८. भक्तीसत्संगामुळे साधकांना होणारे विविध लाभ :
अ. मन, बुद्धी आणि चित्त यांची शुद्धी झाल्यामुळे ईश्वरी चैतन्य अधिक प्रमाणात ग्रहण करता येणे
आ. साधनेतील बुद्धीचा अडथळा दूर होण्यास साहाय्य होणे
इ. संत, श्री गुरु, ऋषिमुनी आणि देवता यांच्या प्रतीचा भक्तीभाव वाढल्यामुळे साधकांची साधना मानसिक आणि बौद्धिक स्तरावर न होता आध्यात्मिक स्तरावर होणे
ई. साधकांना संत, श्री गुरु, ऋषिमुनी आणि देवता यांचे दुर्लभ असणारे कृपाशीर्वाद भक्तीसत्संगात सांगिल्याप्रमाणे प्रयत्न केल्यामुळे सहजरित्या प्राप्त होतात. त्यामुळे साधकांचा सर्वंकष उद्धार होतो.
उ. साधकांच्या मनातील भक्तीभाव वृद्धींगत झाल्यामुळे साधकांवर ईश्वराची भरभरून कृपा होते आणि त्यांच्याभोवती संरक्षककवच निर्माण होते.
ऊ. अनेक जन्मांची पापे नष्ट होणे.
अशा प्रकारे भक्तीसत्संग हे साधकांना आपत्काळातून तारून नेणारी संजीवनीच आहे आणि आध्यात्मिक उन्नती करवून देणारे भगवंताचे वरदानस्वरूपच आहेत.
कृतज्ञता
श्री गुरूंच्या कृपेनेच भक्तीसत्संगांच्या विविध पैलूंतून आध्यात्मिक महत्त्व उमजले आणि श्रीमहालक्ष्मीस्वरूप श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्याप्रतीचा कृतज्ञताभाव जागृत झाला. ही लेखरूपी भावपुष्पांजली श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या चरणी सविनय अर्पण करत आहे.’
– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान),(आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
(५.७.२०२३)
|