गोवा : पुरातत्व कार्यालयात कागदपत्रे असलेल्या खोलीत प्रवेशासाठी सर्वसामान्य नागरिकांना कडक निर्बंध लागू

भूमीसंबंधी जुन्या कागदपत्रांचा गैरवापर करून भूमी बळकावल्याची शेकडो प्रकरणे उघडकीस आल्याचे प्रकरण

पणजी, १३ जुलै (वार्ता.) – राज्यातील पुरातत्व खात्याने कार्यालयातील भूमीसंबंधी कागदपत्रांची पडताळणी करणे किंवा त्या भागात सर्वसामान्यांना प्रवेश करण्यासाठी १३ जुलैपासून कडक निर्बंध लागू केले आहेत. भूमीसंबंधी जुन्या कागदपत्रांचा गैरवापर करून भूमी बळकावल्याची शेकडो प्रकरणे राज्यात उघडकीस आल्यानंतर सरकारने हा निर्णय घेतला आहे. (‘बैल गेला अन् खोपा केला’, ही म्हण सार्थ ठरवणारे पुरातत्व खाते ! – संपादक)

खात्याच्या या नवीन नियमानुसार यापुढे पुरातत्व कार्यालयात सर्वसामान्य सेवा प्रदान करणार्‍या जागेत नागरिकांना केवळ पेन आणि कागद यांच्यासह प्रवेश दिला जाईल आणि त्यांचा भ्रमणभाष बंद ठेवावा लागेल. सार्वजनिक कागदपत्रांमधील माहिती लिहून घेता येणार नाही. कागदपत्रांचे छायाचित्र काढता येणार नाही. या वेळी नोंदींच्या मागणीसाठी अर्ज करतांना सरकारने दिलेले ‘आय.डी.’ ओळखपत्र जोडावे लागणार आहे. केवळ संशोधकांना या ठिकाणी भ्रमणसंगणक घेऊन जाता येणार आहे.