‘इवलेंसें रोप लावियलें द्वारीं ..।’ ही उक्ती सार्थ करणारा ‘भक्तीसत्संग’ आणि त्याद्वारे साधकांच्या जीवनात भक्तीधारा प्रवाहित करून त्यांचे जीवन भक्तीमय करणारे सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव !
१३.७.२०२३ या दिवशी ३०० भक्तीसत्संग पूर्ण (‘त्रिशतकपूर्ती’) झाले. त्या निमित्ताने व्यक्त केलेली कृतज्ञता !
साक्षात् विष्णुस्वरूप सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपाशीर्वादाने भावसत्संगांना आरंभ झाला. तेव्हापासून श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ साधकांना भाववृद्धीसाठी मार्गदर्शन करत आहेत. साधकांना भक्तीसागरात डुंबवणार्या या भक्तीसत्संगरूपी दिव्य सत्संग शृंखलेतील ३०० वा सत्संग १३ जुलै २०२३ या दिवशी झाला. भक्तीसत्संगाची त्रिशतकपूर्ती झाली. त्या निमित्ताने गुरुमाऊलींच्या चरणी कृतज्ञता !
१. रामनाथी, गोवा येथील आश्रमात ‘भावसत्संग’ चालू करण्याचे कारण आणि सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या संकल्पाने व्यापक स्तरावर सत्संग चालू करण्याची घडलेली प्रक्रिया !
‘वर्ष २०१५ मध्ये सनातनच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमात ‘भावसत्संगां’ना आरंभ झाला. स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवण्यासाठी, तसेच पूर्णवेळ साधना करण्यासाठी आश्रमात आलेल्या साधकांसाठी हे सत्संग होऊ लागले. ‘साधकांना साधनेचे प्रयत्न करण्यासाठी भावाच्या स्तरावर दिशा मिळावी आणि त्यांच्या साधनेतील शुष्कता न्यून होऊन त्यांची साधना जलद गतीने व्हावी’, या उद्देशांनी भावसत्संग चालू झाले. प्रतिदिन १ घंटा हा भावसत्संग असायचा.
‘भावसत्संगांमुळे साधकांना लाभ होऊन त्यांच्यात पालट होऊ लागले. भाववृद्धीचे प्रयत्न केल्याने त्यांच्यात आलेली शुष्कता न्यून झाली. भगवंताशी अनुसंधान साधण्याची दिशा मिळाल्याने त्यांच्या प्रयत्नांची गती वाढली आणि त्यांचा उत्साहही वाढू लागला. सप्टेंबर २०१६ मध्ये माझ्या मनात विचार आला, ‘आश्रमातील साधकांना भावसत्संगांमुळे झालेले लाभ इतरत्रच्या साधकांनाही व्हावेत, यासाठी रामनाथी आश्रमासह भारतभरातील साधकांसाठीही भावसत्संग चालू करावा !’ खरेतर मनात येणारा प्रत्येक विचार सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांचाच विचार असतो. माझ्या मनातील हा विचार मी गुरुदेवांना सांगितला आणि त्यांनीही सर्व साधकांसाठी भावसत्संग चालू करण्यास सांगितले. अशा प्रकारे गुरुदेवांनी दिलेल्या अंतःप्रेरणेने आणि त्यांच्या संकल्पाने ५.१०.२०१६ पासून सर्वत्रच्या साधकांसाठी भाववृद्धी सत्संगांना आरंभ झाला.’ – श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ
२. भाववृद्धी सत्संगांमुळे साधकांच्या जीवनात आमूलाग्र पालट होऊन सत्संगांचे ‘भक्तीसत्संगां’त रूपांतर होणे
‘या सत्संगांमुळेे सर्वत्रच्या साधकांना भाववृद्धीसाठी दिशा मिळू लागली. ‘रामनवमी’, ‘हनुमान जयंती’, ‘गुरुपौर्णिमा’, ‘श्रीकृष्ण जन्माष्टमी’, ‘नवरात्री’ आदी सण-उत्सवांचे औचित्य साधून साधकांसाठी विशेष सत्संगही आयोजित केले जाऊ लागले. सत्संगांतील सर्वांगस्पर्शी विषयांमुळे आणि त्यानुसार प्रयत्न केल्यामुळे साधकांच्या व्यक्तीगत, कौटुंबिक आणि आध्यात्मिक जीवनात अंतर्बाह्य परिवर्तन होऊ लागले. त्यांना विविध अनुभूती येऊ लागल्या, उदा. सत्संगात देवतांचे दर्शन होणे, सणांच्या आधीच संबंधित देवतेचे तत्त्व कार्यरत झाल्याची अनुभूती येणे. ‘महाशिवरात्री’च्या निमित्ताने घेतलेल्या एका सत्संगाच्या वेळी अनेक साधकांना ‘सभागृहात जणू वातानुकूलित यंत्रच लावले आहे’, अशी शीतलता अनुभवता आली. अनेकांना कापराचा घमघमाटही आला. (‘भीमसेनी कापरामध्ये शिवतत्त्व असल्याने साधकांना कापराचा सुगंध आला.’ – संकलक)
आध्यात्मिक स्तरावरील अशा अनुभूतींमुळे साधकांची भाववृद्धी होऊ लागली.
‘भावसत्संगांमुळे साधकांमध्ये होणारे पालट, लाभ आणि त्यांना येणार्या अनुभूती’ यांविषयी सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव यांना सांगितले आणि भावसत्संगांचे नामकरण ‘भक्तीसत्संग’ असे करण्याचा विचारही त्यांना सांगितला. तेव्हा त्यांनी ‘भक्तीसत्संग’ असे नामकरण करण्यास त्वरित अनुमती दिली. अशा प्रकारे साक्षात् श्री गुरूंच्याच आशीर्वादाने भावसत्संगाच्या पंचवार्षिक पूर्तीच्या वेळी (भावसत्संगांना ५ वषेर्र् पूर्ण होत असतांना) ३०.९.२०२१ या दिवशी ‘भाववृद्धी सत्संगां’चे परिवर्तन ‘भक्तीसत्संगां’मध्ये झाले.’
२ अ. श्री सिद्धिविनायकाने ‘भक्तीसत्संग’ असे नामकरण करण्यास कौल दिल्याची श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांना आलेली अनुभूती : ‘या नामपरिवर्तनाला श्री गुरूंनी अनुमती दिलीच, त्याचसमवेत श्री सिद्धिविनायकानेही कौल दिल्याची अनुभूती मला आली. ‘भावसत्संगाचे भक्तीसत्संगामध्ये परिवर्तन होण्याच्या आदल्या दिवशी मी खोलीत आलेल्या साधकांशी बोलत होते. त्या वेळी केवळ ‘भक्तीसत्संग’ असा उल्लेख करताच खोलीत असलेल्या श्री सिद्धिविनायकाच्या मूर्तीला वाहिलेले लाल फूल खाली पडले. कोणतेही बाह्य कारण नसतांना फूल पडल्यामुळे जणू ‘दैवी कौल’ मिळाला’, असे मला वाटले. अशा प्रकारे आमचे बोलणे जणू साक्षात् श्री सिद्धिविनायकाने ऐकले आणि पुष्परूपी प्रसाद देऊन त्या विघ्नहर्त्याने भक्तीसत्संगाला आशीर्वादच दिला. देवतांच्या आशीर्वादाची ही स्थुलातून मिळालेली प्रचीती आहे. यावरून हे लक्षात येते की, ‘भावसत्संगांचे भक्तीसत्संगांमध्ये परिवर्तन होणे’, ही एक दैवी लीलाच आहे आणि त्याला देवतांचे आशीर्वाद प्राप्त झाले आहेत.’
– श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ
३. भक्तीसत्संगांच्या माध्यमातून कार्यरत असलेली सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांची संकल्पशक्ती आणि दैवी ऊर्जा यांमुळे साधकांच्या जीवनात भक्तीमय परिवर्तन होणे
‘आरंभी केवळ रामनाथी आश्रमातील साधकांपुरता मर्यादित असणारा भावसत्संग पुढे सर्वत्रच्या साधकांसाठी घेतला जाऊ लागला आणि संत ज्ञानेश्वर माऊलींनी वर्णिलेल्या ‘इवलेंसें रोप लावियलें द्वारीं । त्याचा वेलू गेला गगनावेरी ॥’ या उक्तीचे स्मरण झाले.
आज सर्वत्र ‘भक्तीसत्संगरूपी’ भक्तीधारा प्रवाहित होत आहे. या भक्तीधारेने साधकांच्या जीवनाला स्पर्श करून त्यांचे रोमरोम भगवद़्भक्तीमय आणि गुरुभक्तीमय केले आहे. भक्तीसत्संगांमागे सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांची संकल्पशक्ती आणि दैवी ऊर्जा असल्यामुळे साधकांना सत्संगांचा पुष्कळ लाभ होऊन त्यांच्या जीवनात भक्तीमय परिवर्तन होत आहे. साधकांचे जीवन अनेक अनुभूतींनी भरून गेले आहे. यासाठी सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या चरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अत्यल्पच आहे.
४. कृतज्ञता
‘हे सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवा, या ऐतिहासिक सत्संगांचा ‘भावसत्संग ते भक्तीरसमय भक्तीसत्संग’ येथपर्यंतचा प्रवास केवळ आपल्याच कृपेने झाला आहे. विष्णुस्वरूप गुरुदेवा, या घोर कलियुगामध्ये आपणच सर्व साधकांना ‘भक्तीसत्संगा’ची अमूल्य भेट दिली आहे. ही भक्तीधारा साधकांपर्यंत पोचवण्याची सेवाही आपणच करवून घेत आहात. दिव्य भक्तीसत्संगांच्या शृंखलेतील ३०० सत्संग आपण पूर्ण करून घेतले, यासाठी आपल्या श्री चरणी अनंत कोटी कृतज्ञतेची पुष्पांजली समर्पित करत आहोत.
‘हे गुरुनाथा, ही भक्तीसत्संगरूपी भक्तीधारा निरंतर प्रवाहित होऊ दे, तिचा प्रवाह उत्तरोत्तर वाढत जाऊन सर्वत्रच्या साधकांचे अवघे जीवन भगवद़्भक्तीमय आणि गुरुभक्तीमय होऊ दे’, अशी आपल्या श्री चरणी प्रार्थना !’
– श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि कु. वैष्णवी वेसणेकर (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१३.७.२०२३)
साधकांना ‘भक्तीसत्संगा’त येणार्या पंचमहाभूतांच्या स्तरावरील व्यापक अनुभूती‘भावसत्संगां’चे ‘भक्तीसत्संगां’मध्ये परिवर्तन झाल्यावर साधकांना आणखी उच्च आध्यात्मिक स्तरावरील अनुभूती येऊ लागल्या. १. पृथ्वीतत्त्ववर्ष २०२२ मध्ये ‘गुरुपौर्णिमे’च्या निमित्ताने घेतलेल्या सत्संगात प.पू. भक्तराज महाराज यांच्याविषयी सांगतांना त्यांना प्रिय असलेल्या गुलाबपुष्पांचा सुगंध अनेक साधकांना आला. (‘सुगंध येणे’, ही पृथ्वीतत्त्वाच्या स्तरावर आलेली अनुभूती आहे.’ – संकलक) २. आपतत्त्ववर्ष २०२३ मधील ‘गुरुपौर्णिमे’च्या निमित्ताने घेतलेल्या सत्संगाच्या वेळी साधकांवर असलेल्या गुरुकृपेचे माहात्म्य सांगत असतांना जोरदार पाऊस आला. त्या वेळी ‘साधकांवर जणू गुरुकृपेचा वर्षावच झाला’, असे जाणवले. (‘पाऊस येणे’, ही आपतत्त्वाच्या स्तरावर आलेली अनुभूती आहे.’ – संकलक) ३. तेजतत्त्वबर्याच सत्संगांत देवतांचे माहात्म्य सांगतांना अनेक साधकांना त्या देवतेच्या ठिकाणी आणि देवतांच्या रूपात सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांचे दर्शन होते. (‘दर्शन होणे’, ही तेजतत्त्वाच्या स्तरावर आलेली अनुभूती आहे.’ – संकलक) ४. वायुतत्त्ववर्ष २०२२ मध्ये सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या ८० व्या जन्मोत्सवाच्या वेळी भक्तीसत्संगात गीते लावल्यावर आश्रमाच्या समोरच्या परिसरातील झाडे एका लयीत डोलू लागल्याचे अनेकांनी अनुभवले. (‘झाडे एका लयीत डोलणे’, ही वायुतत्त्वाची अनुभूती आहे.’ – संकलक) सत्संग चालू असतांना साधकांना अनेकदा शीतल वार्याची झुळुक आल्याचे जाणवते. त्या वेळी ‘जणू वायुदेवताच साधकांना स्पर्श करून चैतन्य प्रदान करते’, अशी साधकांना अनुभूती येते. या अनुभूतींतून ‘सत्संगांना निसर्गदेवतेचा प्रतिसाद आणि आशीर्वादही मिळत आहे’, हे आम्ही अनुभवले.’ ५. आकाशतत्त्व१. ‘बर्याच सत्संगांमध्ये मी बोलत असतांना ‘माझा आवाज जणू ब्रह्मांड पोकळीतून येत आहे’, असे मला जाणवते. २. एकदा एका सत्संगात लावलेली ‘जय गुरुदेव’ ही नामधून ऐकतांना ‘संपूर्ण ब्रह्मांडात तो आवाज घुमत आहे’, असे मला जाणवले. ‘सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या कृपेने सत्संगांचा स्तर अधिकाधिक प्रमाणात व्यापक होत आहे’, याचीच अनुभूती यातून येत आहे.’ – श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ |
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |