‘भारतीय अवकाश संशोधन संस्थे’ची (‘इस्रो’ची) महत्त्वपूर्ण मोहीम ! – ‘चंद्रयान-३’
आज १४ जुलै २०२३ या दिवशी ‘चंद्रयान-३’चे अंतराळात प्रक्षेपण होणार आहे. त्या निमित्ताने…
‘भारताची ‘अवकाश संशोधन संस्था’ असलेल्या ‘इस्रो’ची बहुचर्चित तिसरी चंद्रयान मोहीम अवघ्या काही घंट्यांवर येऊन ठेपली आहे. ‘चंद्रयान-३’ १४ जुलै २०२३ या दिवशी दुपारी २ वाजून ३५ मिनिटांनी आंध्रप्रदेशातील श्रीहरिकोटा येथील ‘सतीश धवन अंतराळ केंद्रा’वरून अंतराळात झेप घेईल आणि भारतीय अवकाश भरारीचा एक नवा अध्याय लिहिला जाईल. ‘इस्रो’च्या ‘एल्.व्ही.एम्.-३’ या रॉकेटच्या साहाय्याने हे यान चंद्राकडे पाठवण्यात येईल. येत्या २३ ऑगस्टला हे ‘चंद्रयान-३’ चंद्रभूमीवर अवतरेल आणि ‘इस्रो’च्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला जाईल. प्रत्येक भारतियाला अभिमान वाटावा, अशीच ही घटना आहे.
१. ‘चंद्रयान’ मोहीम काय आहे ?
अनादि काळापासून मानवाचे चंद्राविषयी असणारे आकर्षण वैज्ञानिक प्रगतीच्या काळातही टिकून आहे. चंद्रभूमीवर मानवाने पहिले पाऊल टाकल्यानंतर ते अधिकच वाढीस लागले आहे. महासत्तेच्या उंबरठ्यावर असणार्या आपल्या भारत देशानेही प्रगत राष्ट्रांच्या तुलनेत अवकाश संशोधन क्षेत्रात तोडीस तोड कामगिरी बजावली आहे. दोन चंद्रयान मोहिमांनंतर आता तिसर्या मोहिमेसाठी भारत पुन्हा सज्ज झाला आहे.
‘चंद्रयान’ मोहीम’ हा भारताचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. या अंतर्गत चंद्रयान-१, २ आणि आता ३ ही मोहीम राबवली जात आहे. चंद्राभोवती कक्षा उपग्रह (ऑर्बिटर) फिरत ठेवणे, चंद्रभूमीवर अवतरक (लँडर) उतरवणे, त्या भूमीवर बग्गी (रोव्हर) चालवणे, अशा काही प्रयोगांचा यात समावेश आहे. चंद्रयान-३, चंद्रयान-२ ची ‘फॉलोअप मिशन’ म्हणता येईल. तिचा उद्देश चंद्रभूमीवर एक अंतरिक्ष यान सुरक्षित उतरवणे आणि एक रोव्हर किंवा बग्गी चंद्रपृष्ठावर सतत फिरती ठेवून स्वतःची या क्षेत्रातील क्षमता सिद्ध करणे असेल. याच समवेत हा रोव्हर चंद्रभूमीची संरचना आणि इतर भूवैज्ञानिक माहिती (डेटा) एकत्र करील.
अंतराळ संशोधन क्षेत्रात यशस्वी प्रगती करणार्या भारताने पहिली चंद्रयान मोहीम यशस्वी केली. २२ ऑक्टोबर २००८ या दिवशी भारताने पहिले चंद्रयान अवकाशात प्रक्षेपित केले आणि सार्या जगाचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले. या मोहिमेचे बरेचसे उद्देश यशस्वी झाले. चंद्राच्या रासायनिक आणि भूगर्भिक चित्रणाचे दायित्व या मोहिमेने पार पाडले. या यानाने चंद्रापासून १०० कि.मी. अंतरावर चंद्राच्या सभोवती प्रदक्षिणा घातली होती. अमेरिका, ब्रिटन, जर्मनी, बल्गेरिया इत्यादी देशांची जवळपास ११ उपकरणे या यानावर होती. मे २००९ च्या कालावधीत चंद्राभोवती फिरण्याची कक्षा २०० कि.मी.ने वाढवल्यानंतर या यानाने चंद्राभोवती अनुमाने ३ सहस्र ५०० प्रदक्षिणा घातल्या आणि दुर्दैवाने २९ ऑगस्ट २००९ या दिवशी या यानाचा संपर्क तुटला.
यशस्वी रितीने मोहीम पूर्ण करणारी ‘इस्रो !’‘इस्रो’चे अल्प खर्चात गुणवत्तापूर्वक आणि यशस्वी रितीने मोहीम पूर्ण करणे, हे वैशिष्ट्य आहे. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर आरंभीच्या काळात आपल्या देशात साधी सुईही बनत नसे. तोच देश आज प्रगत राष्ट्रांच्या मांडीला मांडी लावून अवकाश संशोधन क्षेत्रात दैदिप्यमान यश मिळवत आहे आणि नवी क्षितिजे पादाक्रांत करत आहे. ‘चंद्रयान-३’चे ‘लँडर’ चंद्रावर अवतरण्यात यशस्वी झाले, तर अशी मोहीम करणारा भारत हा जगातील चौथा देश ठरणार आहे. या आधी अमेरिका, रशिया आणि चीन या देशांनी चंद्रावर त्यांची याने उतरवली आहेत. |
२. भारताने यशस्वी केलेली ‘मंगळयान’ मोहीम
यानंतरही भारताने मागे वळून न पहाता अमेरिका, चीन यांनाही थक्क करून सोडणारी ‘मंगळयान’ मोहीम यशस्वी करून दाखवली. ५ नोव्हेंबर २०१३ या दिवशी मंगळयानाचे यशस्वी प्रक्षेपण झाले आणि अंतर्ग्रहीय मोहिमा राबवणार्या देशांच्या सूचीत भारताने मानाचे स्थान पटकावले. मंगळयान मोहीम हा भारताच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आणि आत्मविश्वास वाढवणारा टप्पा होता. मंगळयानाने स्वतःचे उत्तरदायित्व उत्कृष्ट पार पाडले. या मोहिमेतून मिळणारी माहिती आंतरराष्ट्रीय संशोधनात मोलाची भर घालत आहे.
३. ‘चंद्रयान-२’ या दुसर्या महत्त्वाकांक्षी मोहिमेची माहिती
मंगळयान मोहिमेच्या यशानंतर ‘इस्रो’ने ‘चंद्रयान-२’ ही दुसरी महत्त्वाकांक्षी मोहीम हाती घेतली. २२ जुलै २०१९ या दिवशी श्रीहरिकोटा अवकाश केंद्रातून हे चंद्रयान प्रक्षेपित करण्यात आले. यानात कक्षा-भ्रमक (ऑर्बिटर) आणि रोव्हर यांचाही समावेश होता. विशेष म्हणजे ही सर्व यंत्रे भारतीय बनावटीचीच होती; मात्र ७ सप्टेंबर २०१९ या दिवशी भारतीय प्रमाण वेळेनुसार १ वाजून ५२ मिनिटांनी हे चंद्रतलापासून २ सहस्र १०० मीटर उंचीवर असतांना या यानाशी संपर्क तुटला; परंतु ही मोहीम एका अर्थाने यशस्वी झाली, असेच म्हणता येईल. चंद्रयान-२ च्या अंतिम टप्प्यात चंद्रभूमीपासून केवळ २.१ किलोमीटर उंचीवर असतांना ‘विक्रम लँडर’ जे चंद्रावर अवतरित होणार होते, त्याचा संपर्क तुटला; परंतु ‘ऑर्बिटर’च्या माध्यमातून विक्रम लँडरची काही छायाचित्रे मिळाली. दुर्दैवाने नंतर काही आशादायक घडले नाही; मात्र त्यानंतर ‘इस्रो’ने नियोजित ‘चंद्रयान-३’ मोहीम हाती घेऊन ती यशस्वी करण्याची सिद्धता चालू केली आहे. चंद्रावर अंतराळ यान उतरवण्याचा भारताचा दुसरा हा प्रयत्न आहे.
४. चंद्रयानाचे ३ महत्त्वाचे भाग
४ अ. ‘प्रोपल्शन मॉड्यूल’ : हे स्वतःच एका छोट्या उपग्रहासारखे काम करील. ‘प्रोपल्शन मॉड्यूल’ हे स्वत: चंद्राभोवती फिरत राहील. प्रथम ते चंद्राजवळ १०० कि.मी. अंतरावरून घिरट्या घालत लँडरला वर्तुळाकार ध्रुवीय चंद्राच्या कक्षेत आणेल आणि वेगळे करील. हे ‘प्रोपल्शन मॉड्यूल’ संदेशवहन आणि दळणवळण यांचे काम करीत राहील. तसेच काही निरीक्षणे करण्यासाठी यावर एक ‘स्पेक्ट्रोमेट्रिक’ उपकरणही बसवण्यात आले आहे, ज्याचे ‘शेप’ असे नाव आहे. तद़्नंतर ‘लँडर’ चंद्रभूमीकडे प्रवास करील.
४ आ. ‘लँडर’ आणि ‘रोव्हर’ यांवर बसवण्यात आलेल्या उपकरणांची माहिती : चंद्रावर सुरक्षित आणि विनाहानी उतरणे, हे सर्वांत मोठे आव्हान आहे. या वेळी काही गडबड होऊ नये, यासाठी ‘इस्रो’ने अधिक क्षमतेची इंजिने ‘चंद्रयान-३’मध्ये जोडली आहेत, तसेच त्यात कोणताही बिघाड होऊ नये, अशी खबरदारी घेण्यात आली आहे. अवतरक चंद्राच्या दक्षिण ध्रुवीय प्रदेशात पूर्वनियोजित स्थानावर उतरेल. तो सुरक्षित उतरण्यासाठी यात अनेक संवेदक उपकरणे (सेन्सर) बसवण्यात आली आहेत. ‘एक्सिलरोमीटर’, ‘अल्टिमीटर’, ‘डॉपलर व्हेलोसीमीटर’, ‘टचडाउन सेन्सर’ यांसारख्या संवेदकांमुळे अपघात न होता उतरणे शक्य होईल. चंद्राच्या पृष्ठ भागापासून काही अंतरावर विरुद्ध दिशेत रेटा देण्यासाठी यातील २ इंजिने काम करतील. अवतरकाची गती न्यून करत तो अलगद उतरवला जाईल. यानंतर या अवतरकातून ६ चाकी बग्गी चंद्रभूमीवर संचार करण्यासाठी उतरेल. यावर संचार करतांना माहिती मिळवण्यासाठी ‘नेव्हिगेशन कॅमेरे’ आणि ऊर्जा मिळवण्यासाठी एक सोलर पॅनलही बसवलेले आहे. अवतरकावर ४ वैज्ञानिक उपकरणेही आहेत, जे वेगवेगळे प्रयोग करतील. चंद्राच्या पृष्ठभागाचे तापमान मोजण्यासाठी ‘चंद्राज सरफेस थर्मोफिजिकल एक्सपेरिमेंट (ChaSTE)’ कार्य करील. ‘इन्स्ट्रुमेंट फॉर लूनर सिस्मिक अॅक्टिव्हिटी (ILSA)’ हे उपकरण चंद्राच्या भूगर्भीय हालचालींवर लक्ष ठेवून असेल. या सगळ्या उपकरणातून चंद्राविषयी महत्त्वपूर्ण माहिती आपल्याला मिळेल.
बग्गी किंवा रोव्हरवर चंद्राच्या पृष्ठभागाच्या मूलभूत रचनांचा अभ्यास करण्यासाठी ‘अल्फा पार्टिकल एक्स-रे स्पेक्ट्रोमीटर (APXS)’ आणि ‘लेझर इंड्यूस्ड ब्रेकडाऊन स्पेक्ट्रोस्कोप (LIBS)’, अशी काही उपकरणे आहेत. या उपकरणांच्या साहाय्याने चंद्राच्या भूमीचे कोणते रासायनिक घटक आहेत ? हे अभ्यासात येईल. खडकामधील विविध घटकही शोधता येतील.
४ इ. भारतीय बनावटीचे ‘एल्.व्ही.एम्.-३’ क्षेपणयान : ‘चंद्रयान-३’ मोहिमेत ‘चंद्रयान’ अवकाशात प्रक्षेपित करण्यात येणार असून पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणावर मात करून अंतराळात जाण्यासाठी ‘एल्.व्ही.एम्.-३’ हे क्षेपणयान किंवा रॉकेट वापरण्यात येणार आहे. ‘इस्रो’चे हे आतापर्यंतचे सर्वाधिक शक्तीशाली क्षेपणयान आहे. या यानाची उंची अनुमाने ४३.५० मीटर आणि वजन ६४० टन इतके आहे. ‘एल्.व्ही.एम्.-३’ या शक्तीशाली प्रक्षेपण यानामध्ये ८ ते ९ सहस्र. कि.ग्रॅ. इतके वजन पेलण्याची क्षमता आहे. हे यान ‘देशातील सर्वाधिक वजन असलेले प्रक्षेपण यान’ म्हणून ओळखले जाते. यालाच ‘जी.एस्.एल्.व्ही.-एम्.के.३’ (GSLV-Mk3) या नावानेही संबोधले जाते. हे रॉकेट चंद्रयानाला १७० x ३६५०० कि.मी. अशा लंबवर्तुळाकार कक्षेमध्ये (‘जिओ ट्रान्सफर ऑर्बिट’ (GTO) मध्ये) नेऊन सोडील. या ‘एल्.व्ही.एम्.-३’ रॉकेटने यापूर्वी एकाच प्रक्षेपणात अनेक उपग्रह सोडण्याची जटील कामगिरीही पार पाडली आहे. सर्वांत मोठे आणि वजनदार लाँच वाहन भारतीय बनावटीचे असणे, हेही निश्चित अभिमानाचे आहे.
‘लँडर’ केला आणखी मजबूत !‘चंद्रयान-३’ हे यान २३ आणि २४ ऑगस्टला चंद्राच्या पृष्ठभागावर ‘लँडिंग’ करण्याचा प्रयत्न करील. वर्ष २०१९ मध्ये ‘चंद्रयान-२’ वरील ‘विक्रम लँडर’ उतरवण्याच्या प्रयत्नात चंद्राच्या पृष्ठभागावर आदळला (क्रॅश झाला) होता. ‘चंद्रयान-२’ ‘लँडर’च्या रचनेतील पालटांमध्ये ‘लँडर’साठी मजबूत ‘पाय’, अधिक उतरत्या वेगाला तोंड देण्याची क्षमता आणि इंजिनांची संख्या ४ पर्यंत न्यून केली आहे. इंधन क्षमतेसह ‘सोलर पॅनेल’ची व्याप्ती वाढवण्यात आली आहे. नवीन ‘सेन्सर’ही जोडण्यात आले आहेत. |
५. चंद्रयान मोहिमेची काही ठळक वैशिष्ट्ये
५ अ. सुरक्षित आणि हळूवार अवतरण : प्रयोगशाळेत साध्य केलेल्या गोष्टी प्रत्यक्ष पडताळणे, हा अवकाश मोहिमांचा महत्त्वाचा भाग असतो. या मोहिमेत ‘चंद्रयान चंद्रपृष्ठावर अलगद उतरवणे आणि सुरक्षित उतरवणे’, हा मुख्य उद्देश आहे. या प्रकारच्या तंत्रज्ञातील भारताची क्षमता यामुळे सिद्ध होईल.
५ आ. चंद्रभूभागावर काही प्रयोग करणे आणि भूभागाची माहिती मिळवणे : या मोहिमेचे आणखी एक लक्ष्य म्हणजे चंद्रभूभागवर काही प्रयोग करणे आणि भूभागाची माहिती मिळवणे. यासाठी एक ‘रोव्हर’ (बग्गी) वापरण्यात येणार आहे. चंद्रभूमीवर फिरून ही बग्गी चंद्रभूमीचा अभ्यास करणार आहे. ही बग्गी सुरक्षित उतरवणे आणि तीद्वारे संशोधनाचे काम करून घेणे, हा सुद्धा या मोहिमेचा महत्त्वाचा टप्पा आहे. या संशोधनामुळे चंद्रभूमीची संरचना आणि भूवैज्ञानिक विशेषता लक्ष्यात येण्यास साहाय्य होईल.
५ इ. आंतर्ग्रहीय मोहिमांसाठी वापरण्यात येणार्या नवीन संशोधनाची चाचणी : या चंद्रयान मोहिमेत आपण आंतर्ग्रहीय मोहिमांसाठी वापरण्यात येणारे बरेचसे नवीन संशोधन केले आहे. यामुळे अंतरीक्ष यानांचे नवीन तंत्रज्ञान, लँडींगसाठी लागणार्या विविध टप्प्यांची माहिती आणि आंतर्ग्रहीय वस्तूंच्या विविध गुणधर्मांचा अभ्यास करण्याची आपली क्षमता सिद्ध होणार आहे.
५ ई. चंद्राच्या दक्षिण ध्रुवाचा विशेष अभ्यास : ‘चंद्रयान-३’ मोहिमेचा आणखी एक महत्त्वाचा उद्देश म्हणजे चंद्राच्या दक्षिण ध्रुवाचा विशेष अभ्यास करणे, हा आहे. खरे तर आतापर्यंतच्या मोहिमांमधील ही मोहीम अशा प्रकारची दक्षिण ध्रुवाचा शोध घेणारी पहिलीच मोहीम आहे. या ठिकाणी बहुतांश काळोख आणि बर्फ स्वरूपात पाणी असण्याची शक्यता आहे. त्यामुळेच ही मोहीम महत्त्वाची आहे. यात भविष्यातील चंद्र अवतरणाविषयी कोणती स्थाने योग्य आहेत ? याचाही अभ्यास होईल.
‘चंद्रयान-३’ मोहिमेत महत्त्वाची भूमिका बजावणारे ‘रोव्हर’ आणि ‘लँडर’ !‘चंद्रयान-३’ मोहिमेसाठी वापरल्या जाणार्या यानामध्ये ‘रोव्हर’ (चंद्रभूमीवर फिरणारी बग्गी), ‘लँडर’ (अवतरक) अणि ‘प्रोपल्शन मॉड्यूल’ यांचा समवोश आहे. यांना स्वत: अंतराळात प्रवेश करता येत नाही. याकरता ‘एल्.व्ही.एम्.-३’ या प्रक्षेपकाच्या साहाय्याने यांना अंतराळात प्रक्षेपित केले जाणार आहे. ६ चाकांची बग्गी चंद्रावर उतरून संचार करेल आणि सर्व माहिती गोळा करून ती पाठवेल. |
६. अवकाश संशोधनाचा मार्ग सुकर करण्याचा प्रयत्न
चंद्रावर भविष्यात, म्हणजे अगदी अलीकडच्या काळात कायमस्वरूपी मानव वसाहत निर्माण करण्याचा ‘अमेरिकी अंतराळ संस्थे’चा (‘नासा’चा) मानस आहे. ‘आर्टेमिस-III’ या प्रकल्पांतर्गत ‘नासा’ने कामाला प्रारंभही केला आहे. भारत ‘आर्टेमिस-III’ या प्रकल्पाला ‘चंद्रयान-३’ मोहिमेतून मिळणारी माहिती पाठवून सहकार्य करणार आहे. साहजिकच आंतरराष्ट्रीय व्यासपिठावरही ‘चंद्रयान-३’ या मोहिमेचा मोलाचा वाटा असणार आहे, किंबहुना अंतर्ग्रहीय मोहिमा, दूरस्थ ग्रहांवर मानवी वसाहतीसाठीचे संशोधन इत्यादी अवकाश संशोधनांनाचा मार्ग सुकर करणार्या प्रयत्नात ही मोहीम मैलाचा दगड ठरणार आहे.
७. पूर्वीच्या त्रुटींचा अभ्यास करुन यंदाच्या मोहिमेची आखणी
पूर्वीच्या त्रुटींचा अभ्यास करून या मोहिमेची आखणी करण्यात आली आहे. ही मोहीम यशस्वी होण्यासाठी ‘इस्रो’च्या शास्त्रज्ञांनी अतिशय मेहनत घेतली आहे. ‘पूर्वीच्या त्रुटीवर आधारित आखणी केल्यामुळे मोहीम अपयशी होण्याची वेळ आली, तरीही चंद्रावर उतरणारा ‘लँडर’ (अवतरक) सुरक्षित उतरेल आणि ‘रोव्हर’ही (बग्गी) यशस्वी काम करील, अशी काळजी घेण्यात आली आहे’, असे ‘इस्रो’चे प्रमुख श्री. सोमनाथ यांचे म्हणणे आहे. ‘चंद्रयान-२’ मध्ये अवतरणाची जागा ५०० x ५०० मीटर होती. त्याऐवजी आता ती ४ x २.४ कि.मी. करण्यात आली आहे, जेणेकरून ‘लँडर’ सहजतेने कोणत्याही ठिकाणी उतरेल, तसेच ‘चंद्रयान-३’मध्ये इंधन क्षमताही वाढवली आहे, जेणेकरून उतरण्यासाठी वेळ लागला, तरी इंधन पुरवठा होत राहील.
‘चंद्रयान-३’ या मोहिमेसाठी केलेले आर्थिक प्रावधान तब्बल ६५१ कोटी रुपये इतके आहे. पाश्चिमात्य चित्रपटांपेक्षा आपल्या चंद्रयान मोहिमा अल्प खर्चात होतात !आणखी एक अभिमानास्पद उल्लेख म्हणजे इस्रोच्या अध्यक्षांपासून सर्वांत शेवटच्या टप्प्यावर काम करणारे सर्व शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ आणि कर्मचारी इथपर्यंत हे सर्व जण भारतीय शाळा-महाविद्यालयांमध्येच शिकलेले आहेत.
चला, तर मग १४ जुलै या दिवशी भारताच्या या अभूतपूर्व मोहिमेला शुभेच्छा देण्यासाठी सज्ज होऊया !’
– प्रा. बाबासाहेब सुतार, साहाय्यक प्राध्यापक, गोगटे-जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी (१२.७.२०२३)