पुणे येथे बसचालकांच्या उद्दामपणाचा स्वतः पी.एम्.पी.एम्.एल्.च्या अध्यक्षांनीच घेतला अनुभव !
पुणे – शहरातील काही पी.एम्.पी.एम्.एल्. (पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड)चे चालक बसथांब्यावर बस थांबवत नसल्याच्या तक्रारी अनेक वेळा आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतो. याचाच अनुभव प्रत्यक्ष पी.एम्.पी.एम्.एल्.चे अध्यक्ष सचिंद्र सिंह यांना आला. पी.एम्.पी.एम्.एल्.च्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर सचिंद्र सिंह यांनी एक दिवसाचा पास काढून बस संचलन कसे चालते ? प्रवाशांना सेवा कशी मिळते ? यांसह अन्य गोष्टींची प्रत्यक्ष पहाणी बसने प्रवास करून केली. त्यांनी पहिल्यांदा शिवाजीनगर येथे बसमध्ये बसून महापालिका ते आळंदी असा प्रवास केला. विश्रांतवाडी येथे उतरल्यानंतर पुन्हा शिवाजीनगरला जाण्यासाठी त्यांनी विश्रांतवाडी ते पुणे या बसला हात केला; मात्र नेहमीप्रमाणे बसचालक बसथांब्याला बस न थांबवता पुढे निघून गेला. मात्र ज्यांनी हात केला ते पी.एम्.पी.एम्.एल्.चे नवीन अध्यक्ष होते, असे समजताच चालक अणि वाहक दोघे घाबरले.
या प्रकरणी चालकाला नोटीस बजावण्यात आली आहे. त्याच्यावर आता कारवाई केली जाणार आहे. ‘प्रवाशांनी विनंती केल्यावर चालकांनी सर्व थांब्यांवर बस थांबवाव्यात’, अशा सूचनाही सर्वांना देण्यात आल्या आहेत.